भोवतालच्या घटनांबद्दल बॉलीवूडमधील अनेक कलाकार अलिप्त असतांना, नसिरुद्दीन शहा मात्र आपल्या मतांबाबत सातत्य राखीत वेळोवेळी हेच सिद्ध करत आले आहेत की, त्यांचे पाय मातीचे नाहीत.
जमावाकडून होत असलेल्या हिंसेच्या वाढत्या घटना आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येपेक्षा एका गायीच्या मृत्यूला मिळालेले अधिक महत्त्व यांच्याबाबत नसिरुद्दीन शहा ह्यांनी अलिकडेच केलेल्या टिप्पणीमुळे उजव्यांना क्रोध अनावर झाला याबद्द्ल अजिबात आश्चर्य वाटायला नको. आज घडीला देशात जे काही घडते आहे त्यावर टीका करणारी कोणतीही टिप्पणी म्हणजे, आपले आदर्श असलेले नरेंद्र मोदी ह्यांच्यावर केलेला दोषारोप असेच हिंदुत्ववाद्यांना वाटत असते. ही टीका हिंदुत्वविरोधी असल्याचा त्यांचा ठाम समज असतो, आणि पुन्हा त्यात गोवंशाचा मुद्दा येताच ह्या रागाला अधिकच विखारी स्वरूप प्राप्त होते. शिवाय शहा हे मुस्लीम. एका मुस्लिमाने आपल्या मनातील असे काही व्यक्त करणे म्हणजे फितुरीच!
शहा ह्यांनी आपली मते कधीही लपवून ठेवलेली नाहीत. आपली मते खुलेआम व्यक्त करतांना त्यांनी आपल्या व्यवसायाला आणि त्यातील नामवंतांनाही कधी सोडले नाही. ८० च्या दशकात, त्यावेळी समांतर चित्रपटात काम करीत असलेल्या शहा ह्यांनी, कलात्मक म्हणवणारे चित्रपट सुमार दर्जाचे आणि ढोंगी असल्याचे मत व्यक्त करीत सिनेसृष्टीचा रोष ओढवून घेतला. आपल्या मुलाखतींमधून त्यांनी राजेश खन्नाचा अभिनय आणि अमिताभ बच्चनचे चित्रपट ह्या दोन्हींना मोडीत काढले आहे. अलिकडेच “विराट कोहली जगातील सर्वाधिक वाईट वर्तन करणारा खेळाडू” असल्याच्या काही लोकांच्या मताला त्यांनीही दुजोरा दिला आहे.
राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असते, त्यांचे वाचन उत्तम आहे आणि ताज्या घडामोडींवर विचारपूर्वक मत मांडण्याबाबत त्यांचा लौकिक आहे. ते संपूर्णत: धर्मनिरपेक्ष आहेत. आपल्या मुलांवर त्यांनी कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याची सक्ती न करता स्वत:चा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात शत्रुत्वाची वागणूक मिळते, भारतीय कलाकारांना मात्र अशा प्रश्नांचा सामना पाकिस्तानमध्ये करावा लागत नाही ह्या त्यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे २०१५ साली त्यांना शिवसेनेच्या निदर्शनांना सामोरे जावे लागले होते. आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते असे त्यावेळी त्यांनी म्हटले होते.
ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच वागले आहेत. आणि अशा मतांबाबत असहिष्णू असलेल्या उजव्या हिंदुत्ववाद्यांनीही ते नेहेमी जे करतात त्याचीच पुनरावृत्ती केली, अजमेर मध्ये होत असलेल्या साहित्य महोत्सवामधील शहा ह्यांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला. त्यावेळी, राजस्थान मधील अशोक गेहेलोत सरकारने घेतलेली मुळमुळीत भूमिका ही एका अर्थाने भविष्याची नांदीच होती. मग हा कार्यक्रम पुष्कर मधील एका जेमतेम गर्दीच्या कार्यक्रमात हलवला गेला. तिथे शहा ह्यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर आपल्या चाहत्यांना त्यांनी एक व्हिडीओ मेसेज पाठवला.
ही कृती करून ते हिंदुत्ववाद्यांपेक्षा सरस ठरले आहेत. आपल्या वक्तव्यावरुन माघार न घेता त्यावर ते ठाम राहिले. “कोणाच्या तरी भावना दुखावल्याबद्दल” वगैरे माफी मागणारे पोकळ निवेदन त्यांनी प्रसृत केले नाही, शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणा वजनदार व्यक्तीची मदत पण मागितली नाही, आणि ते गप्पही बसले नाहीत. सहसा, वादाचा धुरळा उठला की एखाद्या वजनदार, बड्या माणसाकडे धाव घ्यायची, सपशेल शरणागती घेणारा माफीनामा जाहीर करायचा आणि त्यानंतर पुन्हा कधीही तोंड सुद्धा न उघडण्याची शपथ घ्यायची अशा वाटेने जाणाऱ्या त्यांच्या व्यवसायबंधूंपेक्षा म्हणूनच ते वेगळे ठरतात. अमिताभ बच्चन सारख्या काही कलाकारांनी तोंड न उघडण्याची कला अशा सफाईने साध्य केली आहे की जणू ते एका वेगळ्याच अशा समांतर दुनियेत वावरत आहेत, जिथे भोवताली घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा स्पर्श सुद्धा होत नसावा. एरवी कमालीचा संवेदनशील असणारा आमीर खान सारखा कलाकार एखादा फटका बसताच एक शब्द सुद्धा न उच्चारण्याची जणू शपथ घेतो. आणि करण जोहरसारखे काही असेही आहेत, ज्यांना धमकीचे केवळ संकेत मिळाले तरी ते लाचार होऊन माफी मागतात.
शहा ह्यांनी ह्यापैकी काहीही केले नाही. उलट शांतपणे हे सारे झुगारून देत, एक नागरिक आणि सृजनशील कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आपल्या हक्काचे त्यांनी समर्थन केले आहे. ते वादग्रस्त विधाने करणाऱ्यांपैकी किंवा अधिकार नसलेल्या एखाद्या विषयावर भाष्य करणारेही नाहीत. त्यांचा प्रतिसाद विचारपूर्वक, प्रश्नांवर दीर्घकाळ विचार करून मग दिलेला असतो.
ह्या वेळीही, त्यांनी काढलेले उद्गार हे एखाद्या वार्ताहराने आपला सवंग राजकीय मुद्दा सिध्द करण्यासाठी जाहीरपणे हातात माईक खुपसल्यावर काढलेले उत्स्फूर्त उद्गार नव्हते. एके काळी सरकारी सेवेत असलेले हर्ष मांदेर ह्यांनी सुसंवादाचा संदेश पसरवण्यासाठी सुरू केलेल्या ‘कारवाँ-ए-मोहब्बत’ या संपूर्ण देशभरच्या प्रवासासाठी तयार केल्या जात असलेल्या दृक्श्राव्य चित्रफितीसाठी ते अतिशय संयत स्वरात बोलले आहेत.
आणि कोणती सूज्ञ व्यक्ती शहा यांच्याशी सहमत होणार नाही? निरपराध व्यक्तींची हत्या करणारे संघटित गट ज्या तऱ्हेने त्यातून सहज सुटून जातात ती बाब कोणत्याही भारतीयाला चिंता वाटावी अशीच आहे. ज्या देशात ‘अयोग्य’ आहार घेतल्याबद्दल एखाद्याला मारहाण केली जाते किंवा फेसबुकवर लिहिलेल्या एखाद्या निरुपद्रवी कॉमेंटबद्दल अटक केली जाते अशा देशात आपली मुले वाढत आहेत याबाबत आज अनेक पालक चिंतित आहेत. अशा वेळी, ज्याला व्यासपीठ उपलब्ध आहे, आणि स्वतःचा असा आवाज आहे अशा नागरिकांनी ठाम उभे राहणे आणि आपली दखल घ्यायला भाग पाडणे हे त्यांचे कर्तव्यच आहे.
भारतात मात्र अगदी उलट गोष्टी घडत आहेत. माध्यमांनी गुळमुळीत भूमिका घेतलेली आहे, उद्योगपती दबक्या आवाजात कुजबुज करीत आहेत. सत्ताधारी किंवा त्यांची विचारसरणी यांच्यावर अगदी दूरान्वयानेही टीका असलेल्या गोष्टी ऐकू येईल-न येईल अशा स्वरात बोलल्या जातात आणि त्यासोबत आपली ही मते निनावी ठेवण्याची विनंती पण केली जाते ! एरवी अतिशय मातब्बर पण परिणामांच्या भीतीने कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर बोलण्याचे टाळणाऱ्या कितीतरी व्यक्ती आजूबाजूला दिसत नाहीत का?
चित्रपट उद्योगाबाबत बोलायचे तर, या कृत्रिम झगमगत्या दुनियेत सर्वांचेच पाय मातीचे आहेत हेच वास्तव आहे. काहींनी आनंदाने सत्तेशी सोयरिक जमवली आहे आणि ते त्यांच्या बाजूने बोलायला आणि उभे राहायला तयार आहेत आणि अन्य कलाकारांनी गप्प राहणे पसंत केले आहे.
ह्या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शहा ह्यांचा परखडपणा केवळ उल्हसित करणाराच नाही तर स्वागतार्ह आहे. ते एक सन्माननीय कलाकार आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आपल्या भूमिकेबाबत ते ठाम आहेत त्यामुळे त्यांच्या मतांना किंमत आहे. त्यांच्या मतांना असलेल्या ह्या प्रतिष्ठेमुळे उजव्या विचारसरणीच्या अनुयायांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या रागाचा पारा चढतो आहे. त्यांना शहा ह्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि सार्वजनिक वर्तुळात त्यांच्या म्हणण्याला असलेले वजन त्यांना ठाऊक आहे. त्यांना शहा यांचे भय वाटते. आणि म्हणूनच ते हात धुवून त्यांच्या मागे लागले आहेत.
आणि म्हणूनच, आज कधी नव्हे इतकी देशाला आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज आहे.
COMMENTS