‘सीसीडी’चे संचालक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

‘सीसीडी’चे संचालक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

मंगळुरु : देशातील लोकप्रिय अशा ‘कॅफे कॉफी डे’ (सीसीडी) या कॉफी रेस्तराँचे संचालक व संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह आज सकाळी (बुधवारी) हॉज बाजार, मंगळुरू येथे नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर सापडला आहे.

मंगळुरूचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आम्हाला सकाळी मृतदेह सापडला असून, त्याची माहिती नातेवाईकांना दिली आहे. मृतदेह वेनलोक रुग्णालयात नेणार असून, पुढील तपास सुरु आहे.”

सोमवार रात्रीपासून सिद्धार्थ बेपत्ता होते. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आहेत. मंगळवारी दिवसभर पोलिस त्यांचा शोध घेत होते. पण त्यांचा ठावठिकाणा समजू शकला नव्हता. त्यांनी आत्महत्या केल्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती.

सिद्धार्थ सोमवारी रात्री ८ वाजता त्यांच्या कारमधून सकलेशपूर येथे जात होते. पण प्रवासात मध्येच त्यांनी आपल्या वाहन चालकाला मंगळुरूकडे कार नेण्यास सांगितले. त्यांची गाडी द. कन्नड जिल्ह्यातील कोटेपुरा येथील नेत्रावती नदीच्या पुलावर आली असता सिद्धार्थ यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले व ते कारमधून बाहेर पडले.

सुमारे दोन तास सिद्धार्थ परत न आल्यानंतर वाहन चालकाने पोलिसांशी संपर्क साधून ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती.

पोलिसांनी नंतर सुमारे २५ नौका व २०० हून अधिक कर्मचाऱ्यांसह पुलाच्या परिसरात शोध घेतला, पण त्यांना सिद्धार्थ यांचा काही ठावठिकाणा लागू शकला नव्हता. पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांचीही मदत घेतली होती.

आर्थिक विवंचनेचा त्रास

दरम्यान सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यांनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना लिहिलेले एक पत्र उघडकीस आल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा कयास लावला जात होता. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात सिद्धार्थ व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने तणावात असल्याचे म्हटले आहे. २७ जुलैला सिद्धार्थ यांनी आपल्या कंपनीच्या मंडळाना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी कंपनीला कर्जाच्या गर्तेतून वर आणण्याचे अनेक व्यावसायिक मार्ग अपयशी ठरल्याची कबुली दिली होती.

‘मी कंपनीला वाचवण्यासाठी खासगी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले होते, पण हे गुंतवणूकदार आता पैसे मागू लागले आहेत. माझ्या मित्राकडूनही मी सहा महिन्यापूर्वी पैसे घेतले होते. तसेच अन्य कर्जदाते माझ्यावर पैशासाठी दबाव आणत आहे. मी अनेक काळ लढलो पण आता माझी सहनशक्ती संपली आहे. मी तुम्हा सर्वांना निराश केले याबद्दल मला माफी द्यावी’, असे सिद्धार्थ यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

सिद्धार्थ यांनी या पत्रात प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पैशासाठी आपल्या छळले असाही आरोप केला. माझी कंपनी माइंडट्रीचा करार प्राप्तीकर खात्याने रोखून धरला होता. सीसीडीचे समभाग अँटॅच केले. त्यामुळे पैसे उभे करण्यात खूप अडचणी आल्या. पण कंपनीतील सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी माझी असल्याने ही माहिती अन्य कोणाला माहिती नव्हती, असे सिद्धार्थ यांनी या पत्रात म्हटले आहे.

माझा कोणताही उद्देश कंपनीला धोका देण्याचा नव्हता किंवा अंधारात ठेवण्याचा नव्हता. मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे व हे मी इमानदारीत सांगत आहे. त्यामुळे मला तुम्ही माफ कराल, अशी माझी अपेक्षा आहे, असे सिद्धार्थ यांनी पत्रात म्हटले आहे.

सीसीडीच्या समभागात घसरण

मंगळवारी सिद्धार्थ यांच्या बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने शेअरबाजारात सीसीडीचे समभाग २० टक्क्यांनी घसरले. ही घसरण गेल्या ५२ आठवड्यातील सर्वात निच्चांकी असून हा समभाग १५४.०५ रु.वर स्थिरावला होता, तर बुधवारी सकाळी हा समभाग १२३ रुपयांवर आला आहे.

COMMENTS