चंद्रावर पाऊल ठेवण्यास ‘चांद्रयान-२’ सज्ज

चंद्रावर पाऊल ठेवण्यास ‘चांद्रयान-२’ सज्ज

इस्रोचे ‘चांद्रयान-२’ हे चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन तेथील जमिनीच्या चाचण्या व भूगर्भीय हालचालींची नोंद करणार आहे.

चंद्र (अजूनही) आहे साक्षीला … नव्या शीतयुद्धाच्या !
इस्रो चंद्रावर, पण कर्मचाऱ्यांची वेतनकपात
चांद्रयान-२ घेऊन जाणाऱ्या रॉकेटच्या प्रक्षेपणात बाधा

येत्या १५ जुलै रोजी इस्रोचे ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या दिशेने झेपावत आहे. ही मोहीम इस्रोच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेत एकाच वेळी प्रत्येकी ३.८ टन वजनाचे १३ उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर इस्रोने तयार केलेली बग्गी उतरेल व ती चाचण्या घेईल, अशी माहिती इस्रोचे संचालक डॉ. के. शिवन यांनी बुधवारी दिली. आजपर्यंत ज्या देशांनी चांद्रमोहिमा हाती घेतल्या त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन संशोधन केले नव्हते पण इस्रोचे ‘चांद्रयान-२’ हे चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन तेथील जमिनीच्या चाचण्या व भूगर्भीय हालचालींची नोंद करणार आहे. हे प्रयोग अत्यंत जटील असतील असे इस्रोचे म्हणणे आहे. दरम्यान गुरुवारी डॉ. के. शिवन यांनी भारत स्वत:चे अवकाश स्थानक उभे करणार असून हा प्रकल्प प्रस्तावित ‘गगनयान’ मोहिमेचा भाग असेल असे त्यांनी सांगितले.

चंद्राचा दक्षिण धुव्र निवडण्याचे कारण असे की, या प्रदेशात पाण्याचे कण मिळतील असा इस्रोचा अंदाज आहे. एकदा पाण्याचे अवशेष मिळाल्यास तेथे मानवी वस्तीचे प्रयत्न करता येतील, हा उद्देश या एकूण मोहिमेचा आहे.

तीन टप्प्यांची मोहीम

‘चांद्रयान-२’ मोहिमेचे ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रग्यान) असे तीन मॉड्यूल्स असतील. यापैकी ऑर्बिटर व लँडर मॉड्युल जीएसएलव्ही एमके-III या अग्निबाणाद्वारे सोडले जातील. यातील बग्गी (रोव्हर-प्रग्यान) ही ‘विक्रम’मध्ये असेल. जीएसएलव्ही एमके-III  अवकाशात चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर ‘विक्रम’ हे ऑर्बिटरपासून विलग होईल आणि ते अत्यंत सावकाश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर निश्चित केलेल्या प्रदेशात उतरेल. त्यानंतर ‘विक्रम’मधून ‘प्रग्यान’बग्गी बाहेर पडेल व ती चंद्राच्या पृष्ठभागाच्या चाचण्या घेण्यास सुरवात करेल. ही बग्गी ८ किंवा ९ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केली आहे. ‘प्रग्यान’ बग्गी १४ (पृथ्वीचे) दिवस चंद्राचा अभ्यास करेल. नंतर पुढे वर्षभर ‘विक्रम’कडून चंद्राची माहिती मिळवली जाईल. असा प्रयत्न आजपर्यंत एकाही देशाने केलेला नसल्याची माहिती इस्रोने दिली.

२००८मध्ये यूपीए-१ सरकारच्या काळात ‘चांद्रयान-१’ मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी या मोहिमेद्वारे भारताचे पाच, युरोपचे तीन, अमेरिकेचे दोन व बल्गेरियाचा एक उपग्रह अवकाशात यशस्वी सोडण्यात आले होते. पण या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचे उद्दिष्ट नव्हते. त्यावेळी १.४ टन वजनाचा उपग्रह चंद्राच्या कक्षेत १०० किमी अंतरावर सोडण्यात आला होता. एक वर्षाने मात्र ही मोहीम काही तांत्रिक कारणाने सोडून देण्यात आली होती. ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यापर्यंतची कामगिरी डॉ. वनिता व डॉ. रितू या दोन शास्त्रज्ञांकडे सोपवण्यात आली आहे आणि असा इस्रोच्या इतिहासातला पहिला प्रयत्न आहे.

मोहीमेचा खर्च ९७८ कोटी रु.

‘चांद्रयान-१’, ‘मंगलयान-१’ नंतर इस्रोची ‘चांद्रयान-२’ ही तिसरी महत्त्वाकांक्षी मोहीम असून तिचा खर्च ९७८ कोटी रुपये आहे. सुमारे ५४ दिवसांचा ३ लाख ८४ हजार किमी. प्रवास करून ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या कक्षेत पोहचेल. एवढे अंतर पार करण्यासाठी या यानाला द्रवयुक्त इंधन पुरवठा केला जाईल.

भारताच्या अवकाश इतिहासात पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून पहिल्यांदा ‘चांद्रयान-१’ चंद्राच्या कक्षेत झेपावले होते. आता ही दुसरी किमया साधण्यासाठी ‘चांद्रयान-२’ सज्ज झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0