जेव्हा जेव्हा स्त्रिया पुरुषसत्तेच्या स्वीकार्य मानकांच्या बाहेर जाऊन काही करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर हल्ले, बलात्कार केले जातात, त्यांच्या शरीराची मोडतोड केली जाते. जाती-आधारित वर्चस्वाच्या लढायांमध्ये स्त्रियांचा उपयोग प्याद्यासारखा केला जातो आणि त्यांचा अपमान करून त्यांच्या घरच्यांना संदेश दिला जातो: “आपल्या पायरीनं रहा.”
चेहऱ्यावरच का ऍसिड फेकले जाते, शरीराच्या अन्य भागावर का नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
वेदना तर वेगवेगळ्या प्रकारे दिल्या जाऊ शकतात. पण जेव्हा जेव्हा पीडिता (जर वाचलीच तर) आरशात पाहील तेव्हा तेव्हा तिला अपमानित करण्यासाठी, आणि हे पुन्हा पुन्हा घडावे, कायमच घडत रहावे यासाठीच हे केले जात नाही का? चेहरा हाच आपल्यापैकी प्रत्येकाची ओळख असते, आणि जेव्हा कुणीतरी तुमचा चेहराच बिघडवून टाकते त्याचा अर्थ काय असतो? ते करणाऱ्या माणसाला वर्चस्वाची जी जाणीव होते ती आपण समजून घेतली पाहिजे आणि ध्वस्त केली पाहिजे.
एखाद्याला दररोज जगाशी लढावे लागत असेल तर ती लढाई आणि ते व्रण सहन करण्याकरिता किती धैर्य लागत असेल?
छपाकला ही सत्ये माहीत आहेत, आणि तो तिथून आपली कहाणी सांगतो.
चित्रपट विषयाची हाताळणी खूपच सहानुभूतीने करतो आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी विषय फार नाट्यमय होऊ न देता त्याचे खूप सुरेख संतुलन राखले आहे. चित्रपटाच्या कथेची रचना अशी आहे, की चित्रपट तुम्हाला शांत बसू देत नाही – पुन्हा पुन्हा झटके देत राहतो आणि त्यातल्या रक्ताळलेल्या वस्तुस्थितीकडे डोळ्यात डोळे घालून पाहायला लावतो. आणि हे करत असतानाच भविष्य शक्य आहे याची आशाही जागृत करण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपट आपल्याला आठवण करून देतो, की स्त्रीच्या शारीरिकतेवर आपला किती भर असतो. यातले संवाद आपल्याला आपल्या आजूबाजूला रोज घडणाऱ्या, लिंगाधारित भेदभावांनी भरलेल्या संभाषणांची आठवण करून देतात.
मी हे लिहीत असताना ट्विटर इंडियावर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेन्ड होणारा शब्द आहे ‘Ugly’. खाली स्क्रोल केले असता मला या हॅशटॅगबरोबर चेहऱ्यावर व्रण असलेल्या, चिडलेल्या, लठ्ठ, केस विरळ झालेल्या स्त्रियांची छायाचित्रे दिसत आहेत. का?
स्त्रियांना कायमच त्यांच्या शारीरिकतेसाठी हल्ल्यांना तोंड द्यावे लागते. पारंपरिक सौंदर्याच्या कल्पनांचा स्वीकार केल्याबद्दलही, किंवा करायचे नाकरले असले तरीही. त्यांचा लढा प्रदर्शित केला म्हणून किंवा तो लपवून ठेवला म्हणूनही. त्यांच्या जखमा, व्रण आणि पीडेच्या कहाण्या सांगितल्या तरीही आणि दडवल्या तरीही – टीका सतत होत असते. पण या अशा मानहानीच्या विरोधात अधिकाधिक मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. आपण बोलले पाहिजे शरीराच्या सकारात्मकतेबद्दल, हिंसेबद्दल, स्त्रियांच्या स्वातंत्र्यांबद्दल – अवकाशात्मक, शारीरिक, भावनिक आणि मानसिक – अंतर्गत आणि बाह्य.
गुलजार आणि अतिका चौहान यांनी लिहिलेली छपाकची पटकथा पीडितेच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचे परीक्षण करते. आपण तिची दुर्दशा पाहतो, लढा पाहतो, आणि रोजच्या जीवनातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पाहतो ज्यांच्यामुळे सगळा फरक पडतो – अशा प्रकारच्या खोल विषयासाठी आवश्यक ते सर्व आपण पाहतो. स्वप्न पाहणे म्हणजे काय ते आपण पाहतो. एक क्षण जेव्हा आयुष्य बदलतो तेव्हा एखाद्या आवडत्या गाण्याच्या आवडत्या ओळी किती अर्थपूर्ण असू शकतात ते आपण पाहतो; केवळ तुम्ही एकत्र वेदना अनुभवता आहात, पीडित आहात म्हणून लढण्याचा अर्थ काय होतो; इतरांना मदत करण्यासाठी स्वतःची सुखदुःखे बाजूला ठेवणे काय असते हे सगळे आपण पाहतो.
आणि सर्वात महत्त्वाचे, म्हणजे स्वतःसाठी आनंद शोधणे आणि आनंदावर हक्क सांगणे काय असते तेही आपण अनुभवतो.
मेघना गुलजारचे संवेदनशील दिग्दर्शन नेहमीच्या अवडंबराचा वापर न करता सरळ साधेपणाने नायिका आणि तिच्या लढ्यावर लक्ष केंद्रित करतो. माझ्या मते या विषयाचे सूक्ष्मभेद जिवंत राखण्यासाठी हा चित्रपट असाच केला जाऊ शकत होता.
दीपिका पदुकोणसाठी अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करणे, मुख्य प्रवाहातील आघाडीची अभिनेत्री असूनही स्वतःला अशा प्रकारे सादर करणे ही धैर्याची गोष्ट आहे. अशा प्रकारचा चित्रपट तयार करण्यासाठी, त्याला हा असा आकार देण्यासाठी संवेदनशील स्त्रियांची एक मजबूत टीम गरजेची आहे, ज्यांना आपली जबाबदारी माहिती आहे.
आणि चित्रपटकर्त्यांचे विशेष कौतुक आम्हाला ज्या प्रकारचे पुरुष हवे आहेत तसे दाखवल्याबद्दल, ज्यांच्याशी आम्हाला रोज सामना करावा लागतो तसे नाहीत. विक्रांत मसेचा वावर सुखद आहे, आनंद तिवारी प्रसन्न आहे, देवास दिक्षित आनंददायी आहे. तिघेही स्त्रीवादी आहेत, स्त्रियांना मदत करतात, त्यांच्यासोबत उभे राहतात आणि अनेकदा त्यांच्या मागे उभे राहतात. आपल्या मुलीचे केस तिच्या आईपेक्षा चांगले विंचरणारा बाप, पीडितांच्या बरोबरीने लढणारे संवेदनशील कार्यकर्ते – हे आज सर्वात जास्त गरजेचे आहेत. वर्षानुवर्षे लोकप्रिय चित्रपटातून दाखवले जाणारी विखारी पुरुष पात्रे नव्हेत.
या पुरुषांना स्त्रियांचे स्वातंत्र्य, यश किंवा प्राधान्यक्रम या कल्पनांनी असुरक्षित वाटत नाही – उलट याच कारणांमुळे त्यांना या स्त्रिया प्रिय आहेत.
आपल्याला छपाक आणि आर्टिकल १५ यासारख्या आणखी चित्रपटांची नितांत गरज आहे.
हे चित्रपट आपल्याला शोषितांच्या कथा सांगतात आणि शोषकांना उघडे करतात. ते आपल्याला सांगतात की पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे लढण्याचा, आणि रोजच्या रोज लढण्याचा. ही लढाई केवळ एका घटनेपुरती नाही. ही लढाई आपल्याला रोजच्या रोज आपल्या आयुष्यात करावी लागणारी लढाई आहे –लिंगाधारित भेदभाव, वर्चस्वाच्या संरचना, स्पर्श, आणि उजळ माथ्याने फिरणारे गुन्हेगार या सगळ्यांशी आपण करत असलेला हा संघर्ष आहे. आपण लिंगभाव, राजकारण आणि लिंगभावावर आधारित राजकारण या सगळ्या संदर्भांमध्ये ही लढाई लढत असतो. ती अगदी निरुपद्रवी वाटते तेव्हाही आपण लढत असतो.
कारण आपण लढले पाहिजे.
सौम्या बैजल यांचे आणखी लिखाण त्यांच्या ब्लॉगवर saumyabaijal.blogspot.com वाचता येईल.
COMMENTS