कासिम सोलेमानी यांना अमेरिकन ड्रोननी बगदाद विमानतळाबाहेर ठार मारलं. मेजर जनरल सोलेमानी इराणचं दोन नंबरचं व्यक्तिमत्व असल्यानं इराण सूड घेणार आणि अमेरिका प्रतीसूड घेणार असं जगाला वाटलं.
कासिम सोलेमानी यांना अमेरिकन ड्रोननी बगदाद विमानतळाबाहेर ठार मारलं. मेजर जनरल सोलेमानी इराणचं दोन नंबरचं व्यक्तिमत्व असल्यानं इराण सूड घेणार आणि अमेरिका प्रतीसूड घेणार असं जगाला वाटलं. तिसरं महायुद्ध सुरु होतंय की काय अशी भीती जगभर पसरली. इराणनं दंडातल्या बेंडकुळ्या दाखवण्या पलिकडं मोठी हाणामारी केली नाही. ट्रंप यांनी इराणला तोंडी धमक्या दिल्या. येवढ्यावर तूर्तास तरी प्रकरण निभावलंय.
इराण हा दहशतवादी देश आहे, सोलेमानी हा एक भयंकर दहशतवादी होता, सोलेमानी हज्जारो अमेरिकनाना मारू पहात होता असं ट्रंप म्हणाले. अमेरिका हा इस्लाम विरोधी सैतान आहे, तो नष्ट केल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असं इराणचे हसन रुहानी म्हणाले.
कोण होते सोलेमानी? या इराणी माणसाचा खून इराक या देशात बगदादमधे कां झाला? इराण आणि अमेरिका बगदादमधे काय करत होते? कोण दहशतवादी आणि कोण मानवतेचे संरक्षक?
सोलेमानी इराणच्या कुड्स दलाचे प्रमुख होते. कुड्स दल हे इराणच्या क्रांतीकारी गार्ड्स या दलाचा एक खासमखास भाग. लोकांना माहित असलेल्या नेव्ही सील्स किवा कमांडो यासारख्या दलाची इराणी कॉपी. कुड्स म्हणजे जेरूसलेम. जिवाची बाजी मारत जेरुसलेम काबीज करण्यासाठी उत्सूक सैनिकांचं हे दल अयातुल्ला खोमेनी यांनी तयार केलं.
१९५० नंतर इराणवर महंमद रेझा पहेलवी शहेनशहा यांची राजवट होती. या राजवटीला अमेरिकेचा पाठिंबा होता कारण इराणमधल्या तेलाचा उपयोग अमेरिकेला होत असे. पहेलवी यांची राजवट राजघराण्याच्या कल्याणासाठी होती, इराणी जनता सुखापासून वंचित होती, जनता उठाव करत असे. अमेरिकेच्या मदतीनं शहेनशहा उठाव दडपत असे. इराणी असंतोष अयातुल्ला खोमेनी या शिया गुरुनं संघटित केला. त्यांच्यावर शहांचा राग. खोमेनी परागंदा झाले, पॅरिसमधे मुक्काम करून ते इराणी जनतेचं आंदोलन चालवत. फ्रान्स हा अमेरिकेचा दोस्त देश.
१९७९ मधे खोमेनी यांचं आंदोलन निर्णायक स्थितीत पोचलं. खोमेनी यांचे क्रांतीकारक इस्लामी गार्ड संघटित झाले, त्यांनी शहाना हाकललं. शहा परागंदा झाले, खोमेनी इराणमधे परतले.शहांचे समर्थक, लोकशाहीवादी आणि खोमेनी समर्थक अशा तीन गटात सत्तास्पर्धा सुरु झाली. त्याचा फायदा घेऊन इराण ताब्यात घेण्याचं शेजारच्या इराकचे लष्करशहा सद्दाम हुसेन यांनी ठरवलं. सद्दाम हुसेन सुन्नी. इराकमधे शिया लोकसंख्या सुन्नींपेक्षा अधिक. तरीही सुन्नी सद्दाम सत्ता ताब्यात ठेवत असत.या काळात सोलेमानी हे गरीब घरातले शेतकरी तरूण क्रांतीकारी गार्डच्या संघटनेत सामिल झाले.
इराकचं सैन्य इराणमधे घुसलं, इराक-इराण युद्ध सुरु झालं. सोलेमानी या युद्धात एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाले. सैनिकांना पाणी वाटप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. उत्साही आणि बलदंड सोलेमानी पाणी वाटत असतानाच इराकच्या हद्दीत जाऊन तिथून माहिती काढत, इराणी अधिकाऱ्याना पुरवत. या माहितीचा फार उपयोग इराणी सैन्याला होत असे. इराकमधून माहिती गोळा करून परतत असताना सोलेमानी एक बकरा घेऊन येत असत. त्या बकऱ्याची पार्टी इराणी सैनिक करत. सोलेमानी यांना इराणी सहकारी प्रेमानं बकरा चोर म्हणत. सोलेमानी लोकप्रिय होत गेले. यथावकाश दोन तीन आठवड्यांचं प्रशिक्षण घेऊन सोलेमानी क्रांतीकारी गार्डमधे अधिकारी झाले.
इराण-इराक युद्ध साताठ वर्षं चाललं. दोन्ही बाजूनी लाखो सैनिक मेले. इराणी तरूण डोक्याला इस्लामचं मोठेपण सांगणारी कापडी पट्टी बांधून जवळपास निःशस्त्र अवस्थेत आघाडीवर जात आणि किडा मुंगीसारखे मरत. या गाढवपणाला इराणी धर्मयुद्ध म्हणत. या युद्धात अमेरिकेनं इराकला मदत केली, सद्दाम हुसेन यांना शस्त्रं, पैसा आणि युद्धाचं कसब पुरवलं.सद्दाम अमेरिका दोस्ती सुरु झाली.
खोमेनींच्या आधी अमेरिकेनं इराणमधे राय रोवले होते, सद्दामच्या आक्रमणानंतर अमेरिकेनं इराकमधे मुक्काम ठोकला.
दुसऱ्या महायुद्धानंतर वेगानं वाढलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला तेलाची जरूर होती, इराक आणि इराण हे तेलाचे मोठ्ठे स्त्रोत होते.
इराक इराण युद्धात सोलेमानी आपल्या कर्तृत्वानं वर वर चढत गेले आणि कुड्स या दलात सर्वोच्च पाच अधिकाऱ्यांत पोचले, त्या काळात विकसीत होत अहसलेल्या हसन रोहानी यांच्या निकट पोचले.
सोलेमानी शाळा कॉलेजमधे शिकलेले नव्हते,त्यांचं शिक्षण लढाईच्या मैदानात झालं. सद्दाम हुसेन आणि अमेरिका या बलाढ्य शत्रूशी पारंपरीक लढाई करण्यात अर्थ नाही हे त्याना कळलं. रणगाडे, तोफा, बंदुका, विमानं यांचा वापर करून अमेरिकेशी मुकाबला होऊ शकत नाही हे त्याना कळलं. पारंपरीक लढाईच्या नादात लाखो इराणी तरूण नाहक मारले गेल्याचं त्यानी अनुभवलं होतं.
सोलेमानी यांनी शक्तीच्या नव्हे तर युक्तीच्या लढाईचं तंत्रं विकसित केलं. कमीत कमी माणसं, कमीत कमी शस्त्रं यांचा वापर करून शत्रूच्या नाजूक भागावर हल्ला करून शत्रूला हैराण करणं. शत्रूचा निर्णायक पराभव न करता शत्रूला जीव नकोसा करणं जेणेकरून शत्रू पळून जाईल. हे तंत्र सोलेमानीनी अफगाणिस्तानात वापरलं, विकसित केलं.
सद्दाम हुसेन यांना इराकमधे मदत करत असताना तिकडं अमेरिका अफगाणिस्तानात रशियाशी लढत होती. रशियाशी लढण्यासाठी अमेरिकेनं तालिबान उभं केलं. रशियानं अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला पण त्यांच्या जागी आलेला तालिबान हा भस्मासूर झाला. तालिबाननं अल कायदा, ओसामा यांना थारा दिला. ओसामाही काही काळ अमेरिकेचा मित्रच होता. पण ओसामानं जागतीक जिहादचा भाग म्हणून न्यू यॉर्कमधले जुळे मनोरे अकरा सप्टेंबरला उडवले. झालं.आता अमेरिका तालिबान आणि ओसामाचा नायनाट करण्यामागं लागली.
तालिबान आणि अल कायदा या दोन्ही संघटना सुन्नी, दोन्ही संघटना शियांची हत्या करत असल्यानं इराणच्या शत्रू होत्या.सोलेमानी अमेरिकेला तालिबानचा ठावठिकाणा सांगत, तालिबानच्या अड्ड्यावर बाँबहल्ले करत. इराक आणि अफगाणिस्तान दोन्ही ठिकाणी अमेरिका आणि सोलेमानी एकत्रितपणे आखणी करत, माहितीची देवाण घेवाण करत, नको असलेली माणसं मारत.
सोलेमानी यांचं तंत्र यशस्वी झालं आणि त्यांचं इराणमधलं स्थान वरवर जात राहिलं. ते कुड्सचे प्रमुख झाले, इराणच्या राजकारणात दोन नंबरवर पोचले. त्यांना मागतील ते पैसै आणि परवाने मिळत गेले. सोलेमानी यांनी कुड्स या दलातल्या हस्तकांची संख्या अडीच हजारावरून पंचवीस हजारांवर नेली. इराक, सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, लेबनॉन, भारत, फिलीपीन्स, थायलंड इत्यादी विभागात त्यानी कुड्स पेरले. अपहरणं, खून, ट्रकस्फोट.
सोलेमानीनी सौदी राजदूतावर व्हाईट हाऊसपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खाणावळीत हल्ला घडवला. त्यासाठी मेक्सिकोतल्या ड्रग टोळीचा वापर केला.
सद्दामचा पाडाव करण्यात मदत केल्यानंतर अमेरिकेनं सोलेमानी यांना इराकमधलं पर्यायी सरकार उभं करायला मदत केली. इराक सरकारमधले शिया मंत्री अमेरिकेनं सोलेमानी यांच्याशी विचार विनिमय करून नेमले. इराक सरकारवर सोलेमानी यांचं नियंत्रण स्थापित झालं. अमेरिकेची पंचाईत झाली. अमेरिकेला इराकी सरकार आपल्या ताटाखाली हवं होतं.
झालं. आता अमेरिका आणि सोलेमानी यांच्यात मारामारी सुरु झाली. सोलेमानीनं इराकमधे सशस्त्र टोळ्या केल्या, त्यांच्या करवी अमेरिकेला छळायला सुरवात केली. तप्त तांब्याचे गोळे तयार करण्याचं तंत्रं त्यांनी विकसीत केलं आणि ते वापरून अमेरिकन रणगाडे फोडले, शेकडो अमेरिकन सैनिकांना मारलं. अमेरिका जाम हैराण झाली.
आता अमेरिका सोलेमानीची माणसं मारू लागलं, सोलेमानी अमेरिकन सैनिकांना मारू लागले. तरीही समांतर पातळीवर दोघंही आयसिसचा खातमा करण्यात गुंतले होते. इराक आणि इराणमधे आयसिसची माणसं मारणं असा समाईक उद्योग दोघं करत.
यथावकाश आयसिसनं इराकमधून काढता पाय घेतला आणि सीरियात बस्तान बसवलं. आयसिस पाठोपाठ सोलेमानी आणि अमेरिका सीरियात पोचले. पण तिथं गोची झाली. अमेरिकेला आसद यांना संपवायचं होतं पण सोलेमानी यांचा आसद यांना पाठिंबा होता. त्यामुळं तिथंही सोलेमानी आणि अमेरिका एकमेकांची माणसं मारत होते, समांतर पातळीवर दोघंही एकत्रितपणे आयसिसची माणसं मारत होते.
अगदी परवापरवापर्यंत सोलेमानी अमेरिका संगमनमत करत होते आणि एकमेकांची माणसं मारत होते. अत्यंत वैतागलेल्या अमेरिकेनं एकदा सोलेमानींना इराकमधल्या इरबिलमधे हेरलं होतं, त्याना मारण्याची सैनिक पाठवले होते. ही खबर सोलेमानीना मिळाली आणि सोलेमानी पळाले, अमेरिकनांच्या तावडीतून सुटले. खबर मिळाली नसती तर २०२० च्या जानेवारीत मरण्यापर्यंत ते शिल्लकच राहिले नसते.
सोलेमानी (इराण) आणि अमेरिका यांच्यातली लढाई इराक, इराण, अफगाणिस्तान अशा तिसऱ्याच देशात चालत होती. तिसऱ्याच देशातली माणसं मरत होती. अर्थात इराणी आणि अमेरिकन सैनिकही मरतच होते.
वर्चस्वाची लढाई. इराणला इस्लामचं वर्चस्व हवं आहे. इस्लामचं वर्चस्व म्हणजे शेवटी इराणचं आर्थिक आणि राजकीय वर्चस्व, धर्म हे निमित्त. अमेरिकेला बाजारवादी अर्थव्यवस्थेचं म्हणजे अमेरिकेचं वर्चस्व हवंय, लोकशाही आणि स्वातंत्र्य हे निमित्त.
कोण दहशतवादी? कोण सैतान? कोण भला देश आणि कोण सज्जन देश?
निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS