नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्यातील आरोपी माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्यातील आरोपी माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे चिदंबरम यांची रवानगी १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात झाली असून तेथे ते न्यायालयीन कोठडीत असतील.
२१ ऑगस्ट रोजी अटक झाल्यानंतर गेले १५ दिवस चिदंबरम सीबीआयच्या कोठडीत आहेत. गुरुवारी त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांच्या चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीची मागणी विशेष सीबीआय न्यायालयात केली. ती न्यायालयाने मान्य केली.
त्यापूर्वी चिंदबरम यांच्या पोलिस कोठडीला त्यांचे वकील कपिल सिबल यांनी विरोध केला. चिदंबरम हे तपास यंत्रणेला पूर्ण साह्य करत असून ते पुरावे नष्ट करतील असे त्यांच्याविरोधात कोणताही पुरावे नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम हे ताकदवान नेते असल्याने जामीनावर सुटल्यावर ते साक्षीदारावर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद केला.
चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेचच त्यांच्या वकिलांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र कोठडी, औषधे, पाश्चात्य पद्धतीचा संडास व झेड सुरक्षेची मागणी केली.
COMMENTS