कोडींगः वाढलेले फॅड व पालकांची दिशाभूल

कोडींगः वाढलेले फॅड व पालकांची दिशाभूल

कोडींग शिकवणार्या इन्स्टिट्यूटनी जाहिराती करताना एक चलाखी केली आहे ती म्हणजे हे शिक्षण वय वर्षे ६ ते १८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आम्ही देत आहोत. प्रत्यक्षात नवीन शैक्षणिक धोरणात वय वर्षे सहा नसून इयत्ता सहावीपासूनच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सत्तास्थापनेचे व आमंत्रणाचे पत्र सादर करा – सर्वोच्च न्यायालय
तैवानचे कोरोना नियंत्रण
कोविड-१९मुळे सामाजिक कलंकीकरणाची नवी लाट!

आई मला खेळायला जायचय जाऊ दे ना..

निरागस भाबड्या आणि निष्पाप बालकाची ही आपल्या आईला केलेली लाडिक विनवणी परमोच्च सुखाचा परामर्ष करणारी एक अविट अनुभती. बालपण देगा देवा ही स्वप्नवत इच्छा पडणाऱ्या तमाम पालकांना आपलेच भविष्य तंत्रज्ञानाच्या महाजालात असणाऱ्या कोडिंगच्या कोंडवाड्यात जबरदस्तीने डांबून ठेवण्याची आसक्ती निर्माण झाली आहे. ज्या वयात मोकळ्या मैदानात मातीत माखून आलेले बालपण आता अबस्ट्रॅक्टच्या कोडींगमध्ये माखून कोडगे बनत आहे. आणि देशाची एक पिढी आरंभीच भावनाशून्य आणि तंत्रज्ञानाच्या महाजाळात अभिमन्यूसारखी अडकत चालली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात सहावीपासून संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पना यासाठी कोडींग विषय आवश्यक करण्याचे प्रस्तावित असल्याने याचा स्फोट हे धोरण लागू होण्यापूर्वीच झाला आहे.

कोणत्याही देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती ही तेथील तंत्रज्ञानाच्या आलेखावर अवलंबून असते. साधारण ९० च्या दशकाप्रारंभी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणकाच्या माध्यमातून देशात तंत्रज्ञानाची द्वारे उघडली आणि काही काळातच तंत्रज्ञानाने हातपाय पसरले. आता तळागाळात संपर्काचे तंत्रज्ञान घट्ट पाय रोवून उभे राहिले आहे. हातातील स्मार्ट फोनने जग जवळ केले खरे पण वास्तवाची सीमारेषा ओलांडून सगळेच आभासी दुनियेत वावरू लागले. ज्या वयात निसर्गाच्या संगतीत बागडायचे आणि आपल्या सवंगडी बरोबर मैदानात मनसोक्त खेळताना धूळ मातीत रंगून जाण्याचे दिवस असलेली ही भावी पिढी हातातील छोट्या चोकोनी यंत्रात हरवून गेली. मित्र मैत्रिणींपेक्षा आभासी दुनियेतील व्यक्तिरेखा त्याला जवळच्या झाल्या आणि एकलकोंडा वाढीस लागला. स्वतःच्याच भाव विश्वात हरवून गेलेले त्यांचे हे कोवळे बालपण आता तर पालकांच्या सक्तीच्या कोडींग रुपी कोंडवाड्यात अजून कोंडून जाऊ लागले आहे. वयाच्या पाचव्या आणि सहाव्या वर्षातच पालकांनी आपली मुले कोडींग शिक्षणाच्या नावाखाली कोंडवड्यात कोंडली असल्याचे चित्र घरोघरी दिसत आहे.

मित्र मैत्रिणीच्या संगतीत शाळेतील मुक्त वावरातील शिक्षण आता आभासी दुनियेत असणाऱ्या वावरात एकट्यालाच शिक्षण घेणारी ही चिमुकली या कोडींगच्या मोहमायेत पालकांच्या हट्टापायी अडकत आहेत. त्यातच असे शिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटनी जाहिरातीचा इतका भडिमार केला की असे वाटावे कोडींग शिकणे खूपच गरजेचे आहे. वर्क फ्रॉम होम करताना अनेक पालकांना आपले पाल्य कुठेतरी गुंतवून द्यायचे आहे या विचाराने या जाहिरातींना भुलूत आहे. कोरोनामुळे बाहेर जाऊन खेळणे जोखमीचे असल्याने मुलांना घरातच अशा पद्धतीने कार्यव्यस्त ठेवण्यात पालक प्रयत्न करत आहेत. मूळात पहिली दुसरीतील मुलांना कोडींग क्लास लावावा का ? त्यांचे खेळण्याचे बागडण्याचे वय असताना नको ती हौस या पालकांना का बरे सुचत असावी?

नवीन शैक्षणिक धोरणात इयत्ता सहावीपासून कोडींग हा विषय अभ्यासक्रमात सक्तीचा करण्यात येणार आहे. असे शिक्षण देऊन भावी पिढीतील मुलांना नवीन जगातील तंत्रज्ञान आणि त्या माध्यमातून नवनवीन कल्पना विकसित करण्यात मदत होईल पर्यायाने या मुलांना आपले यशस्वी लक्ष्य साधणे सोपे जाईल हा यामागील उद्देश असल्याचे या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. सहावीत असलेल्या मुलाचे वय, जाण आणि आकलनशक्ती याचा सारासार विचार यात दिसतो. पण या विचाराला हरताळ फासत सीनिअर केजी अथवा पहिलीमध्ये असणारे विद्यार्थी आता या कोडींगमध्ये अडकवले जात आहेत. आणि त्याला कारणीभूत आहेत ते म्हणजे पालक आणि त्यांना भुरळ पाडणारे ऑनलाईन शिक्षणाचा धंदा करणार्या इन्स्टिट्यूट. या इन्स्टिट्यूटनी जाहिराती करताना एक चलाखी केली आहे ती म्हणजे हे शिक्षण वय वर्षे ६ ते १८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आम्ही देत आहोत. प्रत्यक्षात नवीन शैक्षणिक धोरणात वय वर्षे सहा नसून इयत्ता सहावीपासूनच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोडींगच्या बाजरातील सुळसुळाट रोखण्यासाठी राज्य सरकारने अशा शिक्षण देणाऱ्या सुमारे २०००हून इन्स्टिट्यूटना १५ ऑक्टोबरपासून जाहिराती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अगदी पूर्व प्राथमिक वर्गापासूनच कोडिंग शिक्षण देणाऱ्या संस्थांचे पेव वाढले होते. ऑनलाइन ऍप विकसित करणाऱ्या अनेक कंपन्या सध्या कोडींगच्या बाजारात घुसले आहेत. या संस्थांनी त्यांचे शुल्क किमान १० हजार रुपये ते कमाल ४० हजार रु. एवढे ठेवून लुटालूट सुरू केली आहे.

याबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले, की अभ्यासक्रमात कोडींगचा समावेश करण्याबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. नवीन शैक्षणिक धोरणात सहावीपासून कोडींग शिकवणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनीही अशा जाहिराती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

सध्या स्टेटसच्या नावाखाली आणि मुलाची नको ती कटकट म्हणून त्याला उगाचच कशामध्येही गुंतवून ठेवण्याची पालकांची मानसिकता या मुलांच्या बालपणाच्या मुळावर उठली आहे. अवघ्या ५ ते ६  वर्षाच्या आपल्या पाल्याच्या हातात स्मार्ट फोन टेकवून हे पालक स्वतःला धन्य मानत आहेत. बागडण्याचे वय या स्मार्ट फोनने आधीच चिरडून टाकले असतानाच आता हा कोडींगचा भस्मासुर आ वासून उभा आहे. जणू आपला मुलगा इंजिनिअर झालाच अशी दिवा स्वप्ने या महान पालकांना पडू लागली आहेत. कोडींग शिकल्याशिवाय अजिबात पर्यायच नाही असा मोठा गैरसमज या सर्व पालकांच्या डोक्यात असल्याने चिमुकल्यांचे भावविश्व या गैरसमजुतीच्या वावटळीत उडून जात आहे.

मुलांचे भावविश्व नष्ट करणाऱ्या या आत्मघाती कोडींग शिक्षणाचा त्या मुलांच्या जडणघडण आणि व्यक्तिमत्त्व विकासात काय फरक पडेल याबाबत बोलताना मानसोपचार तज्ज्ञ. डॉ आनंद नाडकर्णी यांनी भावी पिढी ही आत्मकेंद्री आणि संकुचित मनोवृत्तीची राहू शकेल अशी भीती व्यक्त केली आहे. आभासी दुनियेच्या भावविश्वात राहणाऱ्या या पिढीला संवेदना आणि भावनिक ओलावा याचा लवलेशही नसेल तसेच त्यांची वैचारिक पातळी ही कोरडी आणि सीमित राहू शकते, असे ते म्हणतात.

केवळ मुलाच्या हातात स्मार्ट फोन दिला की आपली जबाबदारी संपली ही पालकांची मानसिकता त्या मुलाच्या भविष्याला अनिष्ट वळण देणारी ठरू शकते. प्रगतीच्या नावाखाली मुलांचे संगोपन कसे करावे हेच सध्याचे पालक विसरत चालले आहेत. आपला मुलगा वयाच्या सहाव्या वर्षात कोडींग शिकत आहे अशी शेखी मिरवण्याची ही पद्धत खरे तर खूप घातक आहे. मातीच्या गोळ्याला योग्य आकार देण्याऐवजी हा गोळा एका साच्यात ठेऊन त्याला एकच आकार देण्याचा हा प्रयत्न आहे. आपला पाल्य इंजिनिअर झाला पाहिजे हा अट्टाहास प्रचंड धोकादायक असा आहे.

कोणत्याही राष्ट्राची मुले ही संपत्ती असतात. ही संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी खरे तर व्यापक प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे असते. ही भावी पिढी सुरक्षित सुदृढ आणि बलवान करण्यासाठी योग्य उपाय योजना राबविणे गरजेचे असते. सध्या सर्वच मुलाचे भावविश्व हे मर्यादित आणि साचेबंद झाले आहे. स्मार्टफोन हातात आला खरा पण तो स्मार्ट होण्याऐवजी त्या फोनने मुलांना घेरून टाकले आहे. त्यामुळे मैदानी खेळ विसरून ही सर्व मुले आभासी दुनियेतील हिंसात्मक खेळात गढून गेली असतानाच आता हे कोडींगच्या नवे संकट या मुलांना कायमस्वरूपी कोंडून ठेवण्याची भीती जास्त आहे.

अतुल माने, हे मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0