'आमच्या मते, चीनने गंभीरपणे या जागतिक सर्वसंमतीबाबत विचार केला पाहिजे, त्यातून योग्य ते धडे शिकले पाहिजेत...’
नवी दिल्ली: चीनने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळामध्ये काश्मीरबद्दल चर्चा व्हावी असे प्रयत्न केल्यानंतर, गुरुवारी भारताने बीजींगने “योग्य धडे” शिकले पाहिजेत आणि भविष्यात पुन्हा असे करण्यापासून लांब राहिले पाहिजे असे म्हटले आहे.
यूएनएससीने काश्मीरची चर्चा करण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी एका चीनने पाकिस्तानच्या आवाहनाला पाठिंबा देऊन पुढाकार घेतल्याने एकदा काश्मीरबाबत यूएनएससीमध्ये बंद दरवाज्याआड चर्चा झालेली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या यापूर्वीच्या बैठकीप्रमाणेच, या बैठकीतूनही काहीच निष्पन्न झाले नाही.
“पाकिस्तानने यूएनएससीच्या एका सदस्यामार्फत यूएनएससीच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. यूएनएससीचे बहुसंख्य सदस्य हे मंडळ अशा प्रकारच्या चर्चांसाठी योग्य व्यासपीठ नाही आणि तो प्रश्न भारत आणि पाकिस्तानने आपसात चर्चा करण्याचा आहे या मताचे आहेत. अनौपचारिक बंद दरवाज्यामागील ही बैठक काहीही निष्पन्न न होता संपली,” असे एमईए प्रवक्ता रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.
भारताने चीनसाठी एक संदेशही दिला आहे. “हा प्रश्न चीनमधूनही विचारला गेला पाहिजे. आमच्या मते, चीनने या जागतिक सर्वसंमतीवर गांभीर्याने विचार केला पाहिजे, योग्य धडे शिकले पाहिजेत आणि भविष्यात पुन्हा अशी कृती करण्यापासून दूर राहिले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी सैद अकबरुद्दिन यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून चीनला टोमणा मारला.
प्रवक्ता कुमार पुढे म्हणाले, की पाकिस्तानने सुद्धा हे समजून घेतले पाहिजे, की “जर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर काही चर्चा करण्यासारखे असलेच, तर त्याची चर्चा परस्परांमध्येच व्हायला हवी”.
“पाकिस्तानला पुन्हा जगभरात अशी फजिती होणे टाळायचे असेल तर त्यांनी भविष्यात पुन्हा असे करू नये,” ते म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही या बंद दरवाज्या आडच्या बैठकीबद्दलचे त्यांचे निवेदन दिले.
भारताने घटनेतील कलम ३७० अर्थहीन केल्यानंतर “स्थानिक परिस्थिती” तणावग्रस्त असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा मंडळाच्या सदस्यांना दिली असल्याचा दावा त्यांनी केला.
“अनेक देशांनी व्याप्त काश्मीरमधील परिस्थितीच्या संदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली आहे. काश्मीरी लोकांवर लादलेली संचारबंदी आणि ब्लॅकआऊट तसेच चकमकींचा धोका यांचा यात समावेश आहे,” असे कुरेशी म्हणाले. या “अनेक देशांपैकी” कोणत्याही देशाचे नाव त्यांनी घेतले नाही.
मूळ बातमी
COMMENTS