चिपी विमानतळाच्या ‘टेक ऑफ’ला विलंब

चिपी विमानतळाच्या ‘टेक ऑफ’ला विलंब

राज्यातील आणि विशेषतः कोकण आणि त्या अनुषंगाने मुंबईच्या पुढील राजकारणाची दिशा आणि मार्ग दाखविणाऱ्या सिंधुदुर्ग येथील नियोजित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.

सिंधुदुर्ग येथील बहुचर्चित चिपी विमानतळाला २३ जानेवारीला टेक ऑफचा हिरवा सिग्नल मिळणार होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार होते. यावेळी ठाकरे यांचे कट्टर विरोधक आणि भाजपचे खासदार नारायण राणे हेही या व्यासपीठावर येणार होते. दोन कट्टर विरोधक प्रथमच कोकणच्या भूमीत एकाच मंचावर येणार होते त्यामुळे त्याकडे तमाम लोकांचे लक्ष लागून राहिले होते.

पण विमानसेवा सुरू करण्यासाठी त्याची सुरक्षितता आणि नियम याची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण खाते यांच्या अधिकारात असलेल्या या विषयात गेली काही महिने श्रेयवादासाठी मोठे राजकारण सुरू आहे. या आधी तर एकदा अनौपचारिक उदघाटन करून हवाई सफर करण्याचा प्रयत्नही झाला आहे. कोकणच्या विकासात कळीचा मुद्दा ठरणारा हा विमानतळ आता राजकीय आराखड्याचा रन वे झाला आहे. या विमानतळाला कोणाचे नाव हवे ते आम्हीच हा विमानतळ आणला यावरून राजकीय तमाशा रोज सुरू आहे.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारीला या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार होते. त्यासाठी रीतसर निमंत्रण पत्रिका छापण्यात आली होती. पण आता  सुरक्षिततेच्या नावाखाली हा सोहोळा रद्द करण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण सुरक्षित असले पाहिजे यासाठी आणखी काही काळ जाऊ शकतो त्यामुळे २३ जानेवारीला उदघाटन होणार नाही असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

खरे तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील शीत युद्धातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणत्याही स्थितीत राज्याला आणि उद्धव ठाकरे सरकारला श्रेय मिळू नये यासाठी नानाविध प्रकार करण्यात येत आहेत. त्यातील चिपी विमानतळ एक आहे. या राजकीय साठमारीमध्ये अजून किती काळाने या विमानतळाला टेक ऑफ मिळणार हे दस्तुरखुद्द केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री हरविंदर पुरी यांनाही माहीत असणार नाही.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS