‘ख्रिसमस इन ऑगस्ट’

‘ख्रिसमस इन ऑगस्ट’

ख्रिसमस इन ऑगस्ट कुठेही मेलोड्रामा नाही. भावनांचे कढवजा करत, मृत्यू हा विषय असून देखील त्याचं सावट कुठेही जाणवत नाही किंबहुना आपल्याला ताजातवाना करण्याची ताकद या चित्रपटात आहे.

‘बाईच्या जाती’ची जखम आणि ‘देवबाभळी’ची चिंधी
राज्यातील नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
इब्राहिम अल्काझी : रंगकर्मींचे श्रेष्ठ नाट्यगुरू

‘ख्रिसमस इन ऑगस्ट’ नावाची एक अप्रतिम दक्षिण कोरियाची फिल्म आहे. त्याचा विषय आपल्या ऋषिकेश मुखर्जीच्या ‘आनंद’ आणि अकिरा कुरोसवा यांच्या ‘इकरू’ प्रमाणे आहे. ‘आनंद’ आणि ‘इकरू’ हे त्या काळातील मास्टरपीस आहेत. एका तरुणाचे अल्प जीवन, हा विषय अनेकदा हाताळला गेला. अगदी घासून गुळगुळीत झालेला. तरीही ‘ख्रिसमस इन ऑगस्ट’ हा चित्रपट आपल्याला वेगळं काहीतरी सांगून जातो. हर- जिन हो या गुणी दिग्दर्शकाने चित्रपटाची मांडणी एकदम साधी, सरळ ठेवली आहे. कुठेही मेलोड्रामा नाही. भावनांचे कढवजा करत, मृत्यू हा विषय असून देखील त्याचं सावट कुठेही जाणवत नाही किंबहुना आपल्याला ताजातवाना करण्याची ताकद या चित्रपटात आहे.

कथानकाच्याआधी ‘ख्रिसमस इन ऑगस्ट’ म्हणजे काय ते समजून घेणं आवश्यक आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत एक मोठं बर्फ़ाचे वादळ आलं होतं. वादळाचा तडाखा जबरदस्त होता. सगळीकडे बर्फ़ाचे साम्राज्य तयार झालं होतं. त्यामुळे जनजीवन ठप्प झालं होतं. हवेतला गारठा जीवघेणा होता. ‘ओल्ड फेथफुल इन’ या रेस्तराँमध्ये काही जण अडकले गेले. ऑगस्टचा महिना असून, तो डिसेंबरसारखा भासत होता. जो पर्यंत वादळ शमत नाही, तो पर्यंत जगण्याची शाश्वती नव्हती. अशा भयावह परिस्थितीला काही लोकांनी एक वेगळा अर्थ दिला. जणू ख्रिसमससाठी एकत्र जमलो आहोत, तो साजरा करून घरी परतायचे आहे, असा  विचार करून त्यांनी आपल्या मनावरील ताण कमी करून घेतला.

‘या नियतीशी कसे लढावे, इथे शाश्वती पराभवाची’, अशी परिस्थिती असतांना वास्तवाचा स्वीकार करून, घटनेला जास्तीत जास्त चांगला अर्थ, प्रतिसाद देत, वर्तमान अधिक सुसह्य करणे म्हणजे ‘ख्रिसमस इन ऑगस्ट’. चित्रपटाच्या शीर्षकातच त्याच्या मांडणीची खासियत लपलेली आहे.

कथानक : चित्रपटाच्या सुरवातीला एका हसमुख तरुण आपल्या लाल मोपेडवर दिसतो. लगेचच दुसऱ्या शॉटमध्ये सकाळची कोवळी किरणे झोपलेल्या या तरुणांच्या चेहेऱ्यावर आलेली दिसतात. सकाळच्या या सोनेरी किरणांकडे प्रसन्नपणे बघत हा तरुण उठतो. ही सुरवातच एका उबदार व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.

तिशीच्या जवळपास असलेला जुंग- वाँ आपल्या विधुर वडिलांसोबत दक्षिण कोरियातील सोल या शहरात राहात असतो. शहराच्या एका शांत कोपऱ्यात असलेल्या स्वतःच्या फोटो स्टुडिओत जाणे. आलेल्या विविध प्रकारच्या लोकांचे त्यांच्या मागणीनुसार फोटो काढणे, ते डेव्हलप करणे. घरी वडिलांना जेवण बनवायला मदत करणे. सुट्टीच्या दिवशी आपल्या बहीण, मेव्हणा आणि भाचीसोबत एकत्र जेवण करणे. आपल्या वर्गमित्रांना भेटणे, त्यांच्या सोबत थोडीफार मज्जा-मस्ती करणे. असं सर्वसामान्यांसारखं आयुष्य तो जगत असतो. पण त्याला कसला तरी आजार असतो, त्यामुळे मध्येच त्याला हॉस्पिटलमध्ये चेक अपसाठी जावं लागतं असतं. (नेमका कोणता आजार आहे, हे शेवटपर्यंत दाखवलं नाही.) त्या दिवशी देखील तो हॉस्पिटलमध्ये तपासणीला जातो. नंतर आपल्या शाळेच्या ग्राऊंडवर जाऊन एकटाच बारवर लटकतो, झोके घेतो. दमून बसल्यावर त्याला आठवते की, लहानपणी शाळा सुटल्यावर सर्व मुलं घरी जात असतं. आपण मात्र आईची आठवण काढत इथे बसून राहायचो. ज्या प्रमाणे आई या जगातून गेली, तशा सर्व गोष्टी हळुहळू या जगातून कधी ना कधी नष्ट होणार आहेत… आणि त्याला हे ही ठाऊक आहे की त्याच्याकडे फारसं आयुष्य उरलं नाही. पण तो दुःखी नाही. कमी आयुष्य आहे, म्हणून वेगळ काही मिळवण्याची धडपड तो करत नाही. वास्तवाचा स्वीकार त्याने केलेला आहे. जे आहे, त्याबाबत तो समाधानी आहे. त्याने आपलं जगणं सामान्य माणसाप्रमाणे सहज ठेवलं आहे.

एकदा त्याच्याकडे एक तरुण मुलगी रोल डेव्हलपमेंट करायला येते. ती सांगते की, अगदी लवकरात लवकर तिला हे फोटो हवे आहेत. जुंग नुकताच आपल्या मित्राच्या वडिलांचा दफनविधी करून आलेला असतो. त्यामुळे तो वेगळ्या मनःस्थितीत असतो. काही वेळाने औषध घेऊन तो कामाला लागतो तर त्याला मघाशी आलेली मुलगी झाडाखाली उभी असलेली दिसते. इतक्या उन्हात तिला ताटकळत उभं केलं म्हणून तो आइसस्क्रीम घेऊन तिच्याकडे जातो. त्या मुलीचं नाव असत दा-रिम. ती एक ट्रॅफिक कंट्रोल डिव्हिजनची लोकल ऑफिसर असते. जी नियम मोडणाऱ्या गाड्यांवर कारवाई करत असते. त्याचा पुरावा म्हणून चुकीच्या पार्क केलेल्या गाड्याचे फोटो काढत असे. अशा रीतीने ती जुंगकडे कामानिमित्ताने सारखी यायला लागते. पुढे त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण होते. अगदी छोट्या, छोट्या गोष्टीतून यांची सुदृढ मैत्री फुलत जाते. या मैत्रीवर कुठेही जुंगच्या आजारपणाची सावली नसते. दोघे एकत्र हिंडतात-फिरतात, गप्पा मारत असतात….

मधल्या काळात जुंगची आधीची मैत्रीण जिचं लग्न झालेले असतं, तिच्याशी जुंगची अचानक भेट होते. ती आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत फारशी समाधानी दिसत नाही. ती एकदा जुंगला भेटायला स्टुडिओत येते. आधी एकमेकांशी बोलतांना वेळ कमी पडणाऱ्या या दोन जीवांना आता एकमेकांशी बोलणं देखील अवघड जातं. स्टुडिओच्या दर्शनीय ठिकाणी लावलेला आपला फोटो काढून घेण्याची ती विनंती करते. जुंगला जाणवतं की काळाबरोबर फोटोच नाही तर नात्याचे रंग देखील फिके पडतात. पण  सद्यस्थितीत रिम बरोबरची मैत्री त्याला आनंद देत असते. जुंग एक फोटोग्राफर आहे, त्याला क्षणाचं महत्त्व अधिक माहिती असते. रिमच्या सहवासात खुश असलेला जुंग आपल्या वडिलांच्या बाबतीतही तितकाच दक्ष असतो. आपल्या वडिलांना रिमोट नीट वापरता येत नाही, हे बघून तो एका कागदावर स्टेप बाय स्टेप त्या बाबत नोट्स काढतो. स्टुडिओतील मशीन कसे वापरायचे त्यांचेही फोटो काढून सर्व माहिती व्यवस्थित लिहून ठेवतो.

एकदा त्याच्या स्टुडिओत एक फॅमिली फोटो काढायला येते. फॅमिली फोटो नंतर घरातील वयोवृद्ध स्त्रीचा फोटो घ्यायला सांगतात. जेणे करून तिच्या मृत्यूनंतर तो फोटो लावता येईल. त्या संध्याकाळी त्याच्या स्टुडिओत सकाळची वयोवृद्ध स्त्री बऱ्यापैकी नटूनथटून येते व म्हणते की, “मला सकाळचा फोटो आवडला नाही. माझ्या मृत्यूनंतर लावायला माझा चांगला फोटो असायला हवा. म्हणून मी तयार होऊन आले आहे. पण त्यासाठी द्यायला माझ्यापाशी पैसे नाहीये.” तेव्हा जुंग अतिशय प्रेमाने तिचा क्लासिक फोटो काढतो.

पुढे जुंग आजारी पडल्याने, ऍडमिट झालेला असतो आणि त्याच वेळी रिमची बदली होते. ती त्यांच्याबद्दलच्या आपल्या खास भावना पत्रातून व्यक्त करते व पत्र स्टुडिओच्या आत टाकते. ती रोज स्टुडिओ जवळ येऊन त्याची वाट बघते. या शहरातून निघण्याचा दिवस येतो तरी जुंगचा कोणताच ठावठिकाणा कळत नाही, याचा ताण असह्य होऊन, ती स्टुडिओची काच फोडते.

थोडे दिवसांनी जुंग बरा होऊन येतो. फुटलेली काच व रिमचे पत्र बरंच काही सांगून जातं. तो तिला भेटायला तिच्या बदलीच्या ठिकाणी जातो. तो दुरून तिला पाहतो. ती आपल्या नोकरीत, नव्या शहरात रमलेली दिसते. त्याला माहिती असतं, ज्या प्रमाणे आपण आपल्या पहिल्या प्रेमाला विसरलो, तशी रिमही हळूहळू आपल्याला विसरेल. काळ हेच सर्वांवरच औषध आहे. तो स्टुडिओत येतो. लहानपणापासून ते आतापर्यंतचे फोटो असलेला अलब्म काढतो. ते बघत आपला भूतकाळात रमतो. आधीच्या मैत्रिणीचा, रिमचा फोटो, पत्र नीट बॉक्समध्ये ठेवतो. नंतर कॅमेरा सुरू  करून स्वतःचा फोटो काढतो, जसा त्या वृद्ध स्त्रीचा फोटो काढला असतो अगदी तसाच…

जुंगचा फोटो आपल्याला दिसतो आणि जुंग हे जग सोडून गेलेला आहे, हे आपल्याला समजतं. त्याच्या इच्छेनुसार वडील स्टुडिओ सुरू ठेवतात.

रिम स्टुडिओपाशी येते. स्टुडिओच्या दर्शनीय भागी तिचा सुंदर फोटो फ्रेम करून लावलेला असतो. ती प्रसन्नपणे त्याकडे बघून हसते. (रडत नाही!) तिला लिहिलेल्या शेवटच्या पत्रातून जुंगने तिला समजावलं असतं की, “मला चांगलं माहिती आहे की, प्रेमाची भावना ही कालांतराने फोटोसारखीच धुसर (फेड) होत जाते. पण तू माझ्या मनात कायम राहशील कारण या जगाचा निरोप घेते वेळी तू माझ्या मनात आहेस. थँक्स आणि गुड बाय…”

रिमच्या प्रसन्न हसण्याला अतिशय सुरेख अर्थ आहे. जुंगसारख्या एका भल्या माणसाच्या मनामध्ये आपण मरणाच्या क्षणापर्यंत होतो, ही भावना आयुष्याला समोर जाण्यासाठी खूप मोठं बळ देऊन जाते.

अतिशय तरल भावना आपल्याही मनात दाटून येते. एका सहृदय माणसाचे मरण आपल्याला व्याकुळ करत नाही. जुंग हा एका साध्या माणसाप्रमाणे शेवटापर्यंत जगतो. जगण्याला वेगळा अर्थ वगैरे देण्याचा अट्टाहास तो करत नाही. “ज़िंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं”, असं म्हणणाऱ्या आनंद सारखा हा कलंदर नाही. ‘इकरू’च्या वॉटॉनबीसारखं मरण्याआधी जगण्याला अर्थ देण्याची तो धडपड करत नाही. (काळानुसार सादरीकरणाची पद्धत बदलत जाते, इथे हे समजून घेणं गरजेचे.)

किंवा ‘कल हो ना हो’तल्या अमनसारखं आपल्या प्रेयसीचा हात आपल्या मित्राच्या हाती देण्यासारखे भावनिक प्रसंग (?) यात नाहीत की ‘मुन्नाभाई एम.बी.बी एस.’मधल्या जहीरसारखं आयुष्य उपभोगता आलं नाही, याची खंत नाही. उमाळे, उसासे, सहानुभूतीचा लवलेश या चित्रपटात दिसत नाही.

अगदी एकाच प्रसंगात त्याचा बांध फुटतो. ते तो आपल्या मित्रासोबत असतांना अजून दारू पिण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा त्याचा मित्र विचारतो, “तुला अजून दारू का पाजू?” तेव्हा जुंग हसत म्हणतो की, “मी लवकर मरणार आहे म्हणून!” (मित्राला ती मस्करी वाटते.) ती दोघे खूप दारू पिऊन रस्त्यावर मस्ती करतात. म्हणून त्यांना पोलिस ठाण्यात नेतात. तिथे अशा बऱ्याच जणांना आणलेलं असतं. तिथला गोंगाट जुंगला सहन होत नाही. आणि त्याचा संयम सुटतो. तेव्हा एकदाच तो मोठमोठ्याने रडतो. त्याचा आक्रोश हे सांगत असतो, मरण्याआधी मी थोडं मोकळा होऊ इच्छितो, बस्स! बाकी मी असा बेजबाबदार नाहीये..

अजून एका छोट्या प्रसंगात तो मरणाला भ्यायलेला दिसतो. जेव्हा आकाशात विजा गडगडतात. पावसापूर्वीचे वारं सुटलेलं असते. त्याला एकंदर सर्वांची भीती वाटते तेव्हा तो आपल्या वडिलांच्या बाजूला येऊन झोपतो.

शेवटी जुंगचा स्टुडिओ नेहमी सारखाच आपल्या जागी शांत उभा असतो. आणि रस्त्यावरून लोकांची ये-जा सुरू असते. जुंगची शाळाही दाखवली आहे. जुंगच्या या साध्या प्रवासात शाळेला वारंवार दाखवलं आहे. दिग्दर्शक असं सुचवतो की जुंग हा त्या शाळेत विद्यार्थी दशेत जसा निरागस होता तसाच शेवटापर्यंत राहिला. जग हे शाळेच्या इमारती सारखं आहे. असे किती तरी विद्यार्थी येतात-जातात….

Nature Abhors a Vacuum

देवयानी पेठकर शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0