‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे

‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे

पाकिस्तानातील महिलाप्रश्नांचे वास्तव विश्व दाखवणारी ‘चुरेल्स’ ही वेब सीरिज सध्या पाकिस्तानात नव्हे तर भारतातही लोकप्रिय झाली आहे. पाकिस्तानातील चित्रपट आणि मालिकात आत्तापर्यंत सौम्य आशयाच्या कथा असत. पण या सीरिजने हा समज मोडून काढला आहे.

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून काय मिळालं?
प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील भूमिकेवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार

चित्रपट तसेच टीव्ही मालिका किंवा वेब सीरिज यांच्याबाबतीत असे नक्की म्हणता येईल की दर काही वर्षांच्या किंवा दशकांच्या अंतराने मैलाचा दगड ठरलेल्या, समाजाची दृष्टी आणि मानसिकता बदलणार्‍या तसेच समाजातील खरे प्रश्न, संघर्ष, स्थिती आणि प्रवाह दर्शवणार्‍या कलाकृती येतात. उदाहरणार्थ, ‘गॉड फादर’ ही कादंबरी आणि चित्रपट ज्यावरून प्रेरणा घेऊन पुढे जगभर अनेक चित्रपट आले, आपल्याकडील ‘सत्या’, ‘कंपनी’सारखे अनेक.

७० च्या दशकांत ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या अमेरिकन चित्रपटाने तरुणांची अस्वस्थता आणि व्यवस्थेवरचा राग दर्शवत मोठे भाष्य केले होते. त्या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली. ‘स्टार वॉर्स’ सारखे चित्रपट किंवा ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’सारखे भविष्यकालीन (futuristic) तसेच प्रतिकात्मक अनेक चित्रपट आले.

मालिकांमध्ये ‘बोल्ड अँड ब्युटिफुल’, ‘सॅन्टा बार्बरा’ सारख्या जीवनशैली विकणार्‍या, मूल्यांच्या दृष्टीने ठिसूळ मालिका तसेच अनेक वर्षांनंतर ‘सेक्स अँड द सिटी’सारख्या उच्चभ्रू वर्तुळातील बेगडी जगण्यावर भाष्य करणार्‍या चार्ट बस्टर मालिका ज्यांच्यावरून जगभर हजारो मालिकांचे पेव फुटले. आपल्याकडील ‘क्यूं की सास भी बहू थी’ किंवा ‘कहानी घर घर की’ या मालिका, मराठीतील ‘चार दिवस सासूचे’ वगैरे अशी अनेक उदाहरणे देता येतील.

आता वेब सीरिजमध्ये जगभर आशय आणि आविष्काराच्या बाबतीत अनेक प्रयोग होतात आहेत. असाच एक आवर्जून दाखल घ्यावी असा प्रयोग एका पाकिस्तानी वेब सीरिजने केला आहे. पाकिस्तानातच नव्हे तर जगभरातील नेटिझन्सला खिळवून आणि गुंतवून टाकणारी एक स्त्रीवादी आणि बंडखोर वेब सीरिज ‘झी5’ वर सध्या सुरू आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे ही चुरेल्स (churails) नावाची वेब सीरीज भारत-पाकिस्तानातील चॅनेल्स, प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून सीरिज झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या प्रचंड गाजते आहे.

चुरेल्स म्हणजेच चुडेल किंवा दुष्ट स्त्रिया; सृष्ट नसलेल्या स्त्रिया(?) म्हणजेच दुसर्‍या अर्थाने समाजाने गुन्हेगार, पतित ठरवलेल्या आणि महत्त्वाचे म्हणजे तथाकथित रूढी-परंपरांच्या बंधनांना धुडकावणार्‍या स्त्रिया. लोकोपवादी स्त्रिया. हे नावच मुळी बंडखोरी दर्शवते.

या वेब सीरिजचे दिग्दर्शक असीम अब्बासी म्हणतात, ही सीरिज स्त्रियांवर अन्याय करून त्यांना गुन्हेगार ठरवणार्‍या पुरुषसत्ताक व्यवस्थेवर केलेला प्रहार आहे.

या सीरिजमधल्या चार महिला त्यांच्यावर अन्याय करणार्‍या पुरुषांच्या दांभिकतेला, चोरीला निडरपणे उघडे करतात आणि अनेक वर्षांच्या दमनाला, दडपशाहीला मोडून काढत, चोख प्रत्युत्तर देतात.

कथानक

चुरेल्स ही सीरिज भिन्न परिस्थितीतील चार पिचलेल्या किंवा घुसमटलेल्या स्त्रियांनी घेतलेला सूड आणि केलेले वेगळ्या प्रकारचे बंड यावर आहे.

सारा, जुगनू, बतुल आणि झुबेदा या चारचौघींची ही कहाणी. सारा खान आणि जुगनू चौधरी या अतिश्रीमंत, उच्चभ्रू स्त्रिया आहेत. वरवर पाहता उत्तम आयुष्य त्या जगताहेत असे वाटले तरी त्याही विपरीत परिस्थितीशी सामना करतात आहेत. तर बतुल ही नवर्‍याच्या खुनासाठी २० वर्षांचा तुरुंगवास भोगून आता पुन्हा नव्याने, उमेदीने आयुष्य वसवण्याचा प्रयत्न करते आहे. झुबेदा ही तरुण मुलगी पण घरी तिला मारहाण सोसावी लागते. तिला बॉक्सर व्हायचे आहे आणि तिच्या प्रियकराबरोबर संसार करायचा आहे.

त्या चौघीजणी एक पाकिस्तानी फॅशनेबल कपड्यांचे दुकान चालवण्याच्या नावाखाली एक डिटेक्टिव्ह एजन्सी चालवतात. नवर्‍यांच्या भानगडी आणि उद्योग उघडकीस आणणे हा या एजन्सी मुख्य कार्यक्रम असतो. त्याचबरोबर त्यांच्या सारख्या जीवनानुभवातून गेलेल्या स्त्रियांना त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. “मर्द को दर्द होगा” हे त्यांचं ब्रीद वाक्य असतं.

त्यांच्या एजन्सीत दोन समलैंगिक संबंध ठेवणार्या स्त्रिया असतात आणि एक लिंग बदल केलेली व्यक्तिही असते. या दोघीही गुन्हेगार असतात आणि शिक्षा भोगून आलेल्या असतात. पुढे त्यांना एक हॅकर आणि एक महिला पोलिस अधिकारी मदत करू लागतात.

त्यांचे काम जोरात सुरू होते, पैसा खुळखुळू लागतो आणि नंतर भांडे फुटते. मारहाण, धाक-दपटशाहीची कामे करत असतांना अनेक कटू सत्य बाहेर येतात तसेच अनेपेक्षितरित्या त्यांचा गुन्हेगारी जगताशी संबंध येतो आणि मग सगळा थरार सुरू होतो.

कथानक तसे नवीन नाही. इथे एका हॉलिवूडमधील चित्रपटाचा उल्लेख करायला हवा. १९९६ मध्ये फर्स्ट व्हाईव्हज क्लब  नावाचा गमतीदार चित्रपट आला होता. फसवणार्‍या नवर्‍यांच्या भानगडी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार्‍या बायका अशीच या चित्रपटाची कथा होती. मात्र पुढे अर्थातच ती जरा वेगळ्या अंगाने जाते.

चौकडीचा फॉर्म्युला पण नाट्यमयता आणि थरारक नाविन्य

चुरेल्समध्ये ‘सेक्स अँड द सिटी’चा बायकांच्या चौकडीचा फॉर्म्युला वापरला असला तरी ही कथा तशी अनेक अर्थांनी नाविन्यपूर्ण आहे.

यात सशक्त व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येकीची कटू कहाणी आहे. पात्र अगदी वास्तवातली असली तरी शेवटी त्यांची फँटसी वाटावी अशीही ट्रीटमेंट आहे.

ही सीरिज प्रसंगातील विनोद अधोरेखित करते, पात्रांचे कार्टून न करता त्यामुळे धमाल येते.

व्यक्तिरेखा या अगदी खर्‍याखुर्‍या आहेत. मनाला येईल ते बोलणार्‍या, कचकचीत शिव्या हासडणार्‍या अशा स्त्रिया हे पाकिस्तानातील कुठल्याही मालिका किंवा चित्रपटात घडलं नव्हतं. त्या अर्थानेही सीरिज बंडखोरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांनी सूड घेणे किंवा धडा शिकवणे हे तर अधोरेखित करावे असे आहे पाकिस्तानातील आणि जगातील सगळ्या पुरुषसत्ताक व्यवस्थांच्या दृष्टीने.

बुरख्यातल्या बायका हाणामारी करतात आहेत आणि त्यांना त्रास देणार्‍या पुरूषांना येथेच्छ तुडवून त्यांना भडक बुरख्याची भीती वाटायला लावतात आहेत ही फँटसी वाटू शकते मात्र त्यातील खरेपण हेच या सीरिजचे खरे यश आणि एक परमोच्च बिंदू आहे.

बंडखोर, स्त्रीवादी समकालीन आशयाला noir ची जोड

मुळात चार पिचलेल्या किंवा घुसमटलेल्या स्त्रियांनी एकत्र येऊन कपड्यांच्या दुकानाच्या मागे एक डिटेक्टिव्ह एजन्सी चालवून त्यांच्यावर अन्याय करणार्‍या पुरूषांना धडा शिकवणे हेच नाविन्यपूर्ण आहे.

तीन वर्षांपूर्वी अलंकृता श्रीवास्तव यांचा Lipstick under my Burkha नावाचा स्त्रीवादी आणि हृदयद्रावक चित्रपट आला होता. सगळा समाज दांभिक आहेच. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीत अनेक अधिकार आणि स्वातंत्र्य नाकारले गेलेल्या स्त्रिया ‘बुरखा’ (façade) पांघरून त्यांना जे हवं आहे ते मिळवत असतात, मात्र ते उघडकीस आल्यावर पुरुषप्रधान व्यवस्था त्यांना दोषी ठरवून पुन्हा त्याच चाकोरीत, चरकात (नरकात) कशी पाठवते या विषयावरील हा सुन्न करणारा कारुण्यपूर्ण सिनेमा. हा चित्रपट आणि ही वेब सीरिज मधील साम्य काय तर प्रस्थपित रूढी, परंपरांच्या विरुद्ध गेल्या बद्दल “चुडेल” असण्याचा शिक्का समाजाने मारणे.

याच चित्रपटाचा antithesis म्हणता येईल अशी ही सीरिज आहे. यात उल्लेखनीय म्हणजे त्यांना त्यांचा बुरखा नाही काढता येत आहे. मात्र तो घालूनच त्यांनी स्वत: कायदा हातात घेऊन हजारो वर्षांच्या गुलामगिरीचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, त्यांच्यापरीने बंड करून केला आहे.

या सीरिज मध्येही गुण-दोष असणारी, पुरुषसत्ताक पर्यावरणात भरडलेली मात्र अतिशय खंबीर आणि सूडाच्या भावनेनी धगधगणारी पात्रे आहे हे विशेष.

पुरूषांना धडा शिकवत असतांना त्यां अनपेक्षितरित्या गुन्हेगारी जगताच्या संपर्कात येतात. तेथील अन्याय, अत्याचार, गुन्हे म्हणजेच सगळ्या काळया बाजूंना, त्यातील अनैतिक आणि मूल्यांच्या गुंतागुंतीला (noir) देखील या सीरिज मध्ये आणल्यामुळे फारच रंजकता आणि थरार आला आहे.

व्यवस्थेवर आसूड ओढणारे कथानक

पाकिस्तानातील चित्रपट आणि मालिकात आत्ता पर्यंत सौम्य आशयाच्या कथा असत. या सीरिजने ते मोडून काढले आहे. विपरीत परिस्थितीतही खंबीरपपणे सूडाचा, कायदा हातात घेण्याचा मार्ग स्वीकारून त्यांनी बंड केले आहे तेही वरपांगी परंपरा आणि रूढी यांना न सोडता. हे देखील खूप मोलाचं आहे.

सामाजिक प्रश्नांवर प्रांसंगिक विनोद करत आणि एका फँटसीच्या रूपाने का होईना त्यावर आसूड ओढत हे क्रांतिकारी आहेच.

पुरुषसत्ताक व्यवस्था बायकांवर अनेक अंशी स्त्रीत्व लादते हे खरे आहेच. हजारो वर्षे बायका या लादलेल्या स्त्रित्वाच्या चौकटीत राहिल्या आहेत. आता मात्र त्या जशा स्वयंपूर्ण होतात आहेत तसा त्यांचा अस्तित्वापेक्षा अस्मितेचा, स्थानाचा, स्वत:च्या मूल्यांसाठीचा लढा सुरू झाला आहे आणि पाकिस्तानातून आलेली सीरिज हेच दर्शवते.

यातील व्यक्तिरेखा हाडामासाच्या बायका आहेत. परिस्थिती प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया येतता. ना त्या संत आहेत ना त्या दुष्ट आहेत. त्यांच्यात गुणादोष आहेत. कुठेही उदात्तीकरण नाही हे या सीरिजचे आणखीन एक वैशिष्ट्य.

दिग्दर्शकाने अगदी टिपिकल पुरुषी अहंकार असणार्‍या व्यक्तिरेखा दाखवल्या आहेत. तसेच आधुनिक असणारे  बायकांशी आदरपूर्वक वागणारे पुरुषही दाखवले आहेत हे महत्वाचे.

पुरुषसत्ताक व्यवस्थेवर जालिम टीका करणारा आणि जगभरातील स्त्रियांना जोडणारा जीवननुभव

एक गृहिणी जिला कायम गृहीत धरले जाते, एक तरुणी जिला एक खेळाडू व्हायचं आहे पण तिला ते नाकारून, तिला मारहाण करणारे तिचे कुटुंब असे अनुभव समस्त स्त्रियांचे आहेत.

वरवर सुखात आहे असे वाटणारी माता, गृहिणीने तिला काम करायचे आहे, तिला स्वत:चं असं जग हवं आहे असं लक्षात येतात तिला पेटवून देऊ पाहणारा नवरा.

एक माता जी नवर्‍याच्या लैंगिक जबरदस्तीला नाकारते आणि मग तो पोटच्या पाच वर्षाच्या मुलीवर हात टाकून आपली भूक भागवू बघतो त्याला शेवटी गरम इस्त्रीने मारते. नवर्‍याला मारले म्हणून २० वर्षांची शिक्षा भोगते. मात्र मुलीसाठी तिचा जीव तळमळत असतो.

एक उत्कृष्ट व्यावसायिक वेडिंग प्लॅनर स्त्री. कुठल्यातरी लग्नात एक दुर्दैवी घटना घडते आणि त्यामुळे तिला कामा मिळेनासे होते.

समलैंगिक संबंधातील दोघी त्यांची दु:खे, त्यांचा संघर्ष फार संवेदनशीलपणे दिग्दर्शकाने दाखवला आहे.

वर मांडलेली सगळी दु:खे आणि विविध देशातील सगळ्या स्त्रियांच्या दु:खाची जातकुळी एकच आहे. तरीही दु:खांचा हा पूर्ण स्पेक्ट्रम दिग्दर्शकाने ताकदीने दाखवला आहे.

पिचलेल्या, घुसमटलेल्या स्त्रियांची अशी बंडखोरी, पुरुषसत्ताक व्यवस्थेतील अनेक पुरूषांना आवडणार किंवा पटणार नाहीच. असे असले तरीही, पाकिस्तानातून आलेली ही बंडखोर सीरिज मात्र तिची छाप पाडते आहे, प्रश्न विचारते आहे आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेला स्त्री सक्षमीकरण आणि स्वातंत्र्य याचा विचार करायला भाग पाडते आहे, हेही नसे थोडके.

दिग्दर्शक असीम अब्बासी यांचे भाष्य

दिग्दर्शक असीम अब्बासी म्हणतात की ही सीरिज कणखर स्त्रियांवर आहे. अशा स्त्रिया ज्या स्वत:ला शोधतात आहेत, बाईपण हे ओझे नाही तर त्याचा सन्मान करत, त्यांना सक्षमपणे जगात राहायचं आहे.

या कथानकावर त्यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक चित्रपट करायचा होता. मग त्यांना लक्षात आलं की त्यात इतके गंभीर मुद्दे आणि प्रश्न आहेत तसेच शिव्या देणारी पात्रे आहेत तेव्हा पाकिस्तानातील सेन्सॉर बोर्डाला ते काही पचणार नाही. त्यामुळेच त्यांनी वेब सीरिज करायचा निर्णय घेतला.

तसेच महिला सक्षमीकरण हा मध्यवर्ती धागा असल्याने त्यांनी जाहरा मिर्झा, अनम अब्बास आणि आम्ना सुमरू या संहिता लेखिकांना पाचारण केले. तसेच मुख्य चार भूमिका करणार्‍या कलाकारांनी देखील खूप चांगली सूचना दिल्या. त्यामुळे अब्बासी म्हणतात की इतकी खरी आणि सशक्त व्यक्तिरेखा त्यांना दाखवता आल्या. सगळी सीरिज ही त्यांच्या नजरेतून घडते.

एकंदरीत बायकांना मध्यवर्ती ठेवून ही मालिका त्यांनी एका फँटसी सारखी केली कारण कथा खरी असली तरी अतिवास्तववादी त्यांना करायची नव्हती.

अनेक पात्रे, त्यांची भिन्न परिस्थिती, अवस्था दिग्दर्शकाने सक्षमपणे दाखवली असल्याने एक वेगळी विश्वासार्हता सीरिजला प्राप्त झाली आहे.

पाकिस्तानातदेखील पुरुष किंवा स्त्रियांच्या समलिंगी संबंधांबद्दल बोलणे शिष्टसंमत नाही. तसेच तिथे देखील लिंगबदल केलेल्या व्यक्ति आहेत. त्या सगळ्यांच्या व्यथा मांडणे हा एक उद्देश होता असेही ते म्हणतात.

संहितेतील त्रुटी आणि उणिवा

अनेक समीक्षक म्हणतात आहेत की अनेक उणिवा आणि त्रुटी या सीरिज मध्ये आहेत. व्यक्तिरेखांचा राग, त्रागा आणि संताप जरा जास्तच दाखवला आहे असे समीक्षक म्हणतात. तसेच अनेक चित्रपटांचा प्रभाव इथे दिसून येतो.

काही समीक्षक म्हणतात की समाजातील वर्ग भेद जरा जास्त प्रमाणात येथे दाखवला आहे. तसेच, त्यांच्या मते पाकिस्तानातील बायकांचे दुय्यम स्थान आणि बायकांच्या बाबतीला अक्षम्य कोतेपणा दिग्दर्शकाने समर्थपणे  दाखवलेला नाही. मात्र बायकांचे दमन आणि त्यांचा दडपलेला आवाज हा कधी प्रभावीपणे तर कधी अगदीच क्षीणपणे दाखवला आहे.

त्रुटी आणि उणिवा असल्यातरी पाकिस्तानातून आलेला, बायकांची खरी स्थिती, अवस्था दाखवणारा, त्यांची दु:खे मांडणारा हा दस्तावेज फार महत्वाचा आहे.

या सीरिज मधून खर्‍या पाकिस्तानचे दर्शन होते. तेथील समाज व्यवस्था, त्यातील प्रश्न आणि त्यातील सगळ्या अन्यायी, दुखर्‍या बाजू या सीरिजने मोठ्या धाडसाने दाखवल्या आहेत.

असे म्हटले जाते की कला आणि कलाकृती या समाजाचा आरसा तर आहेतच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे त्या समाजाच्या सदसदविवेकबुद्धीला आणि जाणिवांना सजग ठेवण्याचे काम करतात. म्हणूनच ही स्त्रीवादी सीरिज फार महत्वाची आहे.

पाकिस्तानातील दुहेरी प्रतिक्रिया

नुसत्या आशिया खंडात तर प्रचंड प्रेक्षकवर्ग असणारी ही सीरिज जगभर गाजू लागली आहे. उत्तम कथानक, सुयोग्य कास्टिंग, नाट्यमय थरार आणि उच्च दर्जाचे प्रॉडक्शन यामुळे ही सीरिज जागतिक दर्जाची झाली आहे.

भारतात तर पाकिस्तानी मालिकांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. ओटीटी वर असणार्‍या चाहत्यांनी ही सीरिज उचलून धरली आहे.

दस्तूरखुद्द पाकिस्तानातदेखील ही सीरिज गाजते आहे. अपेक्षेप्रमाणे महिलांना ही सीरिज आवडली आहे.

तेथील काही समीक्षक मात्र असा आक्षेप घेतात आहेत की ही सीरिज दिग्दर्शकाने भारतीय तसेच जागतिक प्रेक्षकांसाठीच केली आहे. मात्र सीरिज पाहिली असता तसे वाटत नाही.

पाकिस्तान सारख्या देशातूनही इतका बंडखोर, दाहक आणि वास्तववादी आशय येऊ शकतो हेच फार आश्वासक आहे.

भारत आणि पाकिस्तानचे आगळे वेगळे साहचर्य

चित्रपट न करता वेब सीरिज करावी हे पक्के ठरल्यावर अब्बासी यांनी वेब सीरिज साठी प्रयत्न केले. निर्मात्या शैलजा केजरीवाल आणि झी5 हा प्लॅटफॉर्म यांना कथानक आवडले आणि मग जे पुढे घडले ते सगळे विस्मयकारक आहे.

आपल्या भारतातील जिंदगी टीव्हीचे आता झी5त रूपांतर झाले आहे. पूर्वी जिंदगी टीव्हीने हमसफर नावाची लोकप्रिय पाकिस्तानी मालिका दाखवली होती.

राजकीयदृष्ट्या भारत आणि पाकिस्तानातून विस्तव जात नाही. बॉलिवूड मधून अनेक चांगल्या पाकिस्तानी कलाकारांना परत मायदेशी जावे लागले, दुर्दैवाने.

झी5ने एका चांगल्या पाकिस्तानी दिग्दर्शकाला घेऊन cross-border collaboration करून एक उत्तम सीरिज आणि महत्वाची मालिका केली हे विशेष म्हणवे लागेल.

दिग्दर्शकाने अनेक लेखक, कलाकार यांना घेऊन, एक परिपूर्ण अशी सीरिज केली आणि त्यांना व्यवस्थित श्रेय दिले आहे हे उल्लेखनीय.

वेब सीरिजचा संदेश

चुरेल्स ही एक समकालीन, जागतिक पातळीवरील स्त्रीवादी, स्त्रीमुक्तीवादी कलाकृती आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ज्या स्त्रियांनी ही सीरिज बघितली त्यांनी पसंतीची मोहर उठवली आहे. आधुनिक, सुधारणावादी, पुरोगामी पुरुषांना देखील आवडते आहे. प्रश्न समस्त जगातील प्रतिगामी आणि पुराणमतवाद्यांचा आहे. त्यांना या सीरिजविषयी आकस वाटणे आणि तो न आवडणे हे अपेक्षितच आहे. असो.

फक्त भारताबद्दल बोलायचे झाले तर आपल्याकडे देखील स्त्रियांचे दमन, त्यांना आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य नाकारणे हे आहेच. इतकेच काय तर शिक्षणाचा अधिकार देखील नाकारला जातो. बाकी गंभीर प्रश्न जसे स्त्री भ्रूण हत्या आणि महिलांवरील हल्ले आणि अत्याचार आहेतच. त्यावर इथे बोललो नाही तरी कळीचा मुद्दा हा आहे की सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्त्रियांना अजूनही आरोपी म्हणजेच चुडेल ठरवले जाते, अजूनही.

अगदी फार खोलात किंवा इतिहासात न शिरता, अगदी या आठवड्यातील घडामोडी पाहिल्या तर दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांना नुसत्या व्हॉट्सअप चॅट वरुन एनसीबी चौकशीला बोलवते काय आणि गेले अनेक दिवस माध्यमे तो विषय चघळतात आहेत. ही अशी मीडिया द्वारे त्यांच्यावर केलेली फिर्याद, बदनामी आणि चक्क आरोपी ठरवून केलेली उलटतपासणी म्हणजे त्यांना चुडेल ठरवणेच आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय लांछनास्पद आहे.

पण व्यवस्थेने ठरवलेल्या या बंडखोर ‘चुरेल्स’च समाजप्रगतीचा एक आशावाद आहे.

गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0