बारावीचे समाजशास्त्राचे पुस्तक की सामान्यज्ञान?

बारावीचे समाजशास्त्राचे पुस्तक की सामान्यज्ञान?

पाठ्यपुस्तकाच्या चिकित्सक विश्लेषणातून असे दिसून येते, की हे पुस्तक भारतीय समाजातील व्यामिश्रता समजवण्यात अनेक पातळ्यांवर अपुरे ठरते. पाठ्यपुस्तकात अनावश्यक सामान्य माहितीचा भरणा आहे ज्यामध्ये कोणत्याही गंभीर चिकित्सक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांचे कोणतेही विश्लेषणात्मक ज्ञान वाढवत नाही किंवा त्यांना भारतीय समाजाकडे पाहण्याचा मूलभूत समाजशास्त्रीय दृष्टीकोनही देत ​​नाही.

१२ वी परीक्षेचा निकाल आज
१२वी परीक्षाः १२ नोव्हें.पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
कोरोनामुक्त गावात १०वी- १२वीचे वर्ग?

सर्वसाधारणपणे पदवी स्तरावर पदवीसाठीचा (स्पेशलायझेशनचा) विषय निवडताना आजही सामाजिक शास्त्रे आणि विशेषतः समाजशास्त्र नेहमीच शेवटचा पर्याय असतो असे दिसून येते. सामाजिक शास्त्रांच्या उतरंडीत समाजशास्त्राला शेवटचे स्थान मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. समाजशास्त्र म्हणजे सामान्यज्ञान(common sense) हा गैरसमज हे त्यातील एक महत्वाचे कारण आहे.

माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे आपल्याला समाजाविषयीची काही एक माहिती असते, म्हणून समाजाच्या अभ्यासासाठी वेगळ्या विषयाची आणि प्रशिक्षणाची गरज नाही, अशी एक मानसिकता तयार होते. ज्यातून समाजशास्त्र म्हणजे सामान्यज्ञान असे समीकरण बनते. समाजशास्त्राच्या अनेक अभ्यासकांनी आंद्रे बेते, सतीश देशपांडे, मैत्रेयी चौधरी समाजशास्त्र आणि सामान्यज्ञान यामधील फरकावर विस्तृत मांडणी केली आहे. समाजशास्त्र म्हणजे सामान्यज्ञान हा गैरसमज कसा  निर्माण होतो आणि बळकट होत जातो हे बघायचे असेल तर मुळात विद्यार्थ्यांची समाजशास्त्र या विषयाशी कशी ओळख कशी करून दिली जाते हे बघणे महत्वाचे आहे.

विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची ओळख ज्या पद्धतीने करून दिली जाते त्यावर त्यांची विषयातील आवड ठरते. समाजशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरावर शिकवला जातो. महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेले पाठ्यपुस्तक वापरले जाते. इयत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की या पाठ्यपुस्तकामधून समाजशास्त्र या विद्याशाखेविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आवड निर्माण होत नाही उलट समाजशास्त्र म्हणजे सामान्यज्ञान हा गैरसमजच अधिक दृढ होतो. तज्ज्ञांच्या नियुक्त समितीने लिहिलेले हे पाठ्यपुस्तक हे कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्य संदर्भांपैकी एक असते. भारतासारख्या विकसनशील देशात,  पाठ्यपुस्तक हा एकमेव स्रोत आहे जो सर्व सामाजिक आणि आर्थिक स्थरातील विद्यार्थी-शिक्षकांना उपलब्ध असतो. ही जबाबदारी ओळखून कोणतेही पाठ्यपुस्तक अत्यंत विवेकबुद्धीने आणि दूरदृष्टीने लिहिणे अत्यावश्यक आहे. तथापि, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक लिहिताना याचे पुरेसे भान राखलेले नाही असेच म्हणावे लागेल.

समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाचे नाव ‘भारतीय समाजाची ओळख’ असे असून ते २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन ब्युरो, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक ब्युरोचे संचालक विवेक गोसावी असे नमूद करतात, की इयत्ता बारावीच्या समाजशास्त्र अभ्यासक्रमात “……भारतीय समाजातील विविध सामाजिक समूह, विविध सामाजिक समस्या, सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन यावर भर दिलेला आहे”. पुढे, ते नमूद करतात, की पाठ्यपुस्तकात चौकटीत दिलेली माहिती, प्रात्यक्षिकासाठी कृती स्वयं-अध्ययनाची प्रक्रिया सोपी व्हावी, विषयात विद्यार्थ्यांना रस निर्माण व्हावा आणि क्रियाशील सहभागाला चालना मिळण्यासाठी समाविष्ट केलेल्या आहेत.

बारावीचे समाजशास्त्र पाठ्यपुस्तक हे राज्य मंडळाशी संलग्न महाराष्ट्रातील सर्व ७००० महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. मार्च २०२० मध्ये, समाजशास्त्र विषय शिकण्यासाठी २३२७४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती .

पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण

या पाठ्यपुस्तकातील क्षमता विधानांचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की वर्णन करणे, स्पष्ट करणे, ओळख करणे, समजावून सांगणे, दर्शवणे, तुलना करणे आणि मूल्यांकन करणे यासारख्या शब्दांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. या क्रियापदांच्या निवडीतून अगदी सुरुवातीलाच हे स्पष्ट होते की संपूर्ण पुस्तकाचा भर मुख्यत्वेकरून भारतीय समाजाची ओळख, त्याचे वर्णन,  स्पष्टीकरण इत्यादीद्वारे माहिती प्रदान करण्यावर आहे, असे जरी असले तरी त्यामधील माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे कारण त्यातून आपण विध्यार्थ्यांना नेमकी काय प्रकारची व दर्जाची पाठ्यपुस्तके पुरवीत असतो हे लक्षात येते.

पाठ्यपुस्तकातील पहिले प्रकरण ‘भारतीय समाजाचा परिचय’ हे तीन उपघटकांमध्ये विभागलेले आहे- प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत आणि स्वातंत्रोत्तर काळातील भारत. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील संपूर्ण विभागात भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाविषयी इतर कोणत्याही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे विविध धार्मिक श्रद्धा आणि प्रथांविषयीची माहिती दिलेली आहे. तेथे सामाजिक संस्था म्हणून धर्माचे कोणतेही समाजशास्त्रीय आकलन न करता केवळ धर्मावरील माहिती देण्यात आलेली आहे. म्हणूनच समाजशास्त्राच्या पुस्तकात आपण इतिहासाचा अभ्यास का करतोय, असा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला पडला तर त्यात आश्चर्यकारक काहीच नाही,  किंबहुना ते स्वाभाविक आहे. इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांचा जवळून संबंध आहे. तथापि, सामाजिक आकृतीबंद (social patterns) आणि विविध सामाजिक संस्थांमधील परस्परसंबंध समजून घेणे हा समाजशास्त्राचा अभ्यासविषय आहे आणि म्हणूनच ते इतिहासापासून वेगळे आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जी माहिती दिलेली आहे ती सुद्धा अत्यंत वरवरची आणि अपूर्ण आहे.

वसाहतकालीन भारतातील शिक्षण (पृ. १८) या विभागात मॅकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षण देण्याआधी सादर केलेला अहवाल, इंग्रजी शिक्षण सुरू करण्यामागे ब्रिटीशांचा असणारा हेतू, हंटर कमिशन, महात्मा फुले यांची हंटर कमिशनवरील टीका किंवा उच्च जातीच्या लोकांपर्यंत शिक्षणाची सुविधा कशी मर्यादित होती याचा साधा उल्लेखही नाही. तसेच वसाहतकालीन अर्थव्यवस्था या भागात (पृ. १९) दादाभाई नौरोजींच्या आर्थिक निस्सारणाच्या सिद्धांताचा (economic drain theory) उल्लेख नाही. आणि म्हणुनच या पुस्तकात पुन्हापुन्हा आलेली इतिहासाची विखुरलेली माहिती भारतीय समाजाची रचना समजून घेण्यासाठी कोणताही समाजशास्त्रीय दृष्टिकोन देत नाही. भारतीय समाजाचा परिचय असे नाव असलेल्या या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना भारतीय समाज, त्यातील संरचना आणि सामाजिक संस्था समजणे अपेक्षित आहे.  ज्यातून विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे सामाजिक स्थान शोधण्यास मदत होईल व ते त्याविषयी जागरूक होतील. विविध सामाजिक संरचनांमधील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी व्यक्तीला सुसज्ज करणे हे समाजशास्त्राचे काम आहे. पुस्तकातील या समाजशास्त्रीय दृष्टीकोनाच्या अभावामुळे हे पाठ्यपुस्तक समाजशास्त्र म्हणजे ‘सामान्य ज्ञान’ असे चुकीचे समीकरण अधोरेखित करते असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

समाजशास्त्र सिद्धांतांवर आधारित आहे आणि सिद्धांत व संकल्पना एकमेकांवर आधारित असतात. सिद्धांत समजून घेण्यासाठी संकल्पना समजणे गरजेचे आहे.  मात्र या पाठ्यपुस्तकात संकल्पना संदर्भ आणि सैद्धांतिक आकलनाशिवाय घाईघाईने, त्रोटक पद्धतीने मांडलेल्या आहेत ज्या बारावीच्या विद्यार्थ्याला क्वचितच समजू शकतील. उदाहरणार्थ, पृष्ठ क्रमांक- ५१ वर लिंग या संकल्पनेची पुरेशी चर्चा न करता, ‘लिंगभावाचे प्रकटीकरण’(gender expression), ‘लिंगभाव तरलता’(gender fluidity) (हे पाठ्यपुस्तकात या संकल्पनांना वापरलेले मराठी शब्द आहेत). यासारख्या अवघड संकल्पनांचा केवळ उल्लेख केला आहे त्याची उकल केलेली दिसून येत नाही. तसेच, कोणतीही उदाहरणे किंवा केस स्टडी दिलेली नाहीत, की ज्यामुळे या क्लिष्ट संकल्पना समजण्यास विद्यार्थ्यांना सोपे जाईल. पुढे, जातीसारख्या महत्त्वाच्या संकल्पना पुस्तकात चुकीच्या पद्धतीने मांडल्या आहेत (पृ. ५०). भारतातील जात ही सामाजिक स्तरीकरणाची व्यवस्था आणि विषमतेचा आधार आहे. मात्र, या पुस्तकात ‘विविधता’ या संज्ञेखाली जात समाविष्ट करण्यात आली आहे, जी गंभीर चूक आहे. कारण आपण जातीला भारतीय समाजातील विविधता म्हणणे म्हणजे एकप्रकारे जातीभेद, विषमता आणि जातीमुळे होणाऱ्या अत्याचाराला मान्यता देण्यासारखे आहे. तसेच वर्णभेद (racial discrimination) या संकल्पनेचाही पाठ्यपुस्तकात समावेश आहे परंतु समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी वर्णभेद समजून घेणे का महत्वाचे आहे, याचे विवेचन पुस्तकात येत नाही. समाजशास्त्रात वर्ण हा भेदभावाचे कारण म्हणून अभ्यास केला जातो कारण वर्णभेद हा सामाजिक स्तरीकरणातील एक महत्वाचा घटक आहे. तथापि, या समाजशास्त्रीय दृष्टीकोनाचा पुस्तकात पूर्णपणे अभाव आहे. अशाप्रकारे, एखादी संकल्पना का मांडली जाते आणि समाजशास्त्रात तिचा अभ्यास का केला जातो याबद्दल हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना माहिती देत नाही. एकूणच, या पुस्तकात समाजशास्त्रीय संकल्पनांची कोणतीही वैचारिक स्पष्टता किंवा सैद्धांतिक समज दिलेली नाही. कोणत्याही पाठ्यपुस्तकाला जागेच्या मर्यादा असतात. ही जागेची मर्यादा लक्षात घेऊनच संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पुस्तकात शब्दकोष(glossary) असतो. परंतु, बारावीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात शब्दकोषही नाही.

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पाठ्यपुस्तकाची रचना कारण-उपाययोजना या स्वरूपात करण्यात आलेली आहे जी समाजशास्त्राचा विषय नसून समाज कार्या(social work)चा आहे. समाजकार्य हे एक जन वकालतिचे (advocacy) क्षेत्र आहे जे व्यक्ती किंवा लोकांच्या समूहांना  त्यांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांचे निराकरण करण्यासाठी संसाधनांसह जोडण्यासाठी बनवले गेलेले आहे. तर, समाजशास्त्र हे एक सिद्धांतावर आधारित सामाजिक विज्ञान आहे, ज्याचे लोक, समूह आणि समाजांमधील सामाजिक वर्तन आणि सामाजिक संरचानातील परस्परसंबंध हे अभ्यासविषय आहेत. समाजशास्त्रज्ञ मानवी वर्तनाचे आकृतीबंध (pattern) ओळखतात ज्याद्वारे त्यांना सामाजिक वास्तवाचे आकलन होण्यास मदत होते. तथापि, पाठ्यपुस्तकातील प्रकरण चौथे ‘भारतातील सामाजिक बदलाची प्रक्रिया’ हे भारतीय समाजातील सामाजिक बदलांच्या प्रक्रियेमुळे उद्भवणार्‍या समस्यांना तोंड देण्यासाठी उपाययोजना सुचवते आणि सहावे प्रकरण ‘भारतातील सामाजिक समस्या’ हे सामाजिक समस्यांसाठी उपाययोजना सुचवते. वस्तुतः, कोणत्याही समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाने केवळ सामाजिक बदल आणि सामाजिक समस्या काय आहेत याचे वर्णन न करता विद्यार्थ्यांमध्ये समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून सामाजिक बदल आणि सामाजिक समस्यांच्याकडे बघण्याचे कौशल्य विकसित करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ- कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा (पृ.९५) मांडताना कुटुंब, विवाह आणि पितृसत्ता यासारख्या मोठ्या सामाजिक संरचनांच्या संदर्भात कोणतीही चर्चा केलेली नाही. पुस्तकात थोडक्यात पितृसत्ता, विषमता, असुरक्षितता, ह्यांचा घरगुती हिंसाचाराची कारणे म्हणून उल्लेख आहे परंतु विषम संरचना आणि घरगुती हिंसाचार यांच्यातील दुवा स्पष्ट होत नाही. ‘भारतातील सामाजिक समस्या’, या प्रकरणात केवळ वैयक्तिक समस्या आणि सामाजिक समस्या यांच्यातील फरक स्पष्ट केलेला आहे. समाजशास्त्रज्ञ सी. राईट. मिल्स म्हणतात, वैयक्तिक आणि सार्वजनिक कसे संबंधित आहेत हे अचूकपणे उलगडणे म्हणजे समाजशास्त्रीय कल्पनाविस्तार, (sociological imagination) जे समाजशास्त्राचे मुख्य काम आहे. परंतु, वैयक्तिक आणि सामाजिक समस्या यांच्यातील परस्परसंबंधाची उकल आपल्याला पाठ्यपुस्तकात केलेली आढळत नाही.

पाठ्यपुस्तकाच्या चिकित्सक विश्लेषणातून असे दिसून येते, की हे पुस्तक भारतीय समाजातील व्यामिश्रता समजवण्यात अनेक पातळ्यांवर अपुरे ठरते. पाठ्यपुस्तकात अनावश्यक सामान्य माहितीचा भरणा आहे ज्यामध्ये कोणत्याही गंभीर चिकित्सक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांचे कोणतेही विश्लेषणात्मक ज्ञान वाढवत नाही किंवा त्यांना भारतीय समाजाकडे पाहण्याचा मूलभूत समाजशास्त्रीय दृष्टीकोनही देत ​​नाही. या पाठ्यपुस्तकात कोणत्याही संदर्भ आणि सैद्धांतिक आकलनाशिवाय संकल्पनांची त्रोटक ओळख करून दिलेली आहे. तसेच, या पाठ्यपुस्तकातून  समाजशास्त्र विषयाचा गाभा, आवाका आणि महत्व अधोरेखित न झाल्यामुळे हे पाठ्यपुस्तक समाजशास्त्र म्हणजे सामान्यज्ञान या चुकीच्या समजाला अधिक दृढ करण्याचे काम करते. शेवटी, पुस्तकाच्या क्षमता विधानापासून ते त्यातील प्रकरणातून सोयीस्करपणे गंभीर चिकित्सक समाजशास्त्रीय दृष्टीकोनाला वगळले आहे. भारतीय समाजातील संरचनात्मक विषमता आणि सामाजिक वर्जीतता या विषयीचे कोणतेही समाजशास्त्रीय दृष्टीकोन आणि त्यावरील चर्चा पुस्तकात आढळत नाही. त्यामुळे हे पुस्तक अप्रत्यक्षपणे समाजशास्त्राला सामान्यज्ञानाशी जोडून असमान, विषम  संरचनांचे पुनरुत्पादन करण्यास एकप्रकारे हातभार लावते.

या पुस्तकाचे लवकरात लवकर पुनर्लेखन करणे आवश्यक आहे. समाजशास्त्र हे एक विज्ञान असून त्याचे गंभीर स्वरूप लक्षात ठेवणे गरजेचे आहे. समाजशास्त्राचे खरे महत्त्व सांगून त्यातील विद्यार्थ्याचा रस टिकवून ठेवण्यासाठी समाजशास्त्राला समाजशास्त्र म्हणून त्याच्यातील चिकित्सा आणि विमर्शात्मकता जिवंत ठेऊन शिकवणे महत्वाचे आहे.

सुमती उनकुले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पी .एचडी केलेली आहे. मधुरा जोशी यांनी समाजशास्त्रात जवाहरलाल नेहरू विद्एयापीठातून एम.फील केलेले आहे.

संदर्भ

  1. Beteille, Andre. 1996. Sociology and Common sense. Economic and Political Weekly. Political Weekly. Vol 31. No 35/37.
  2. Chaudhuri, Maitrayee. 2019. Doing Sociology: Some persistent questions. Sociological Bulletin. 65(2): 253-271
  3. Deshpande, Satish. 2003. Contemporary India: A Sociological View. Penguin Books
  4. Deshpande, S. et al. 2000. The Problem. In Situating sociology. Seminar. 2000. Magazine.
  5. Joshi, Madhura. 2021. The Profession of Sociolgists. Doing Sociology blog.https://doingsociology.org/2021/08/16/the-profession-of-sociologists-madhura-joshi/
  6. https://onlinedegrees.unr.edu/online-master-of-social-work/resources/social-work-vs- sociology-whats-the-difference/ accessed on Feb 9,2022.
  7. https://www.mahahsscboard.in/stat/hsc21/hs-subj.pdf accessed on Feb 7, 2022
  8. https://onlinedegrees.unr.edu/online-master-of-social-work/resources/social-work-vs- sociology-whats-the-difference/ accessed on Feb 9, 2022

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: