नदीष्ट – थोरो

नदीष्ट – थोरो

'नदीष्ट'च्या रूपाने मनोज बोरगावकर आपल्या चित्रवान शैलीतून या ब्रह्मांडाची सैर करून आणतात.

मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय
कोरोना काळात अब्जाधिशांच्या संपत्तीत वाढ
लॉकडाऊन : बाल हक्काची बिकट वाट

थोरो म्हणतो की, मूल म्हणजे निसर्ग असतं! ते निसर्गाचा शहाणपणा घेऊन आलेलं असतं, आणि नंतर माणसांनी तयार केलेल्या संस्कृतीच्या चाकोरीचा त्याच्यावर परिणाम होऊन ते बिघडतं’ !

मातेच्या गर्भाशयात पहुडलेल्या बाळाला जेव्हा निसर्गनियमामुळे बाहेर यावे लागते, तेव्हापासून तो बाहेरील वातावरणाचा आदी होतो. पण असे काही माणसं असतात की त्यांची ही गर्भावस्था कायम राहाते. गर्भाशयातील ऊब त्यांना निसर्गाच्या कुशीतच मिळते. मानवी जगण्याच्या साच्यात हे कधी स्वतःला अडवत नाहीत. याचं थेट नातं असतं ते निसर्गाशी! असेच एक निसर्ग लेकरु म्हणजे मनोज बोरगावकर. ज्याने गर्भडोहातील निर्धास्त तरंगण्याच्या अनुभवातून स्वतःला कधीच मुक्त करून घेतलं नाही. जगण्यासाठी माणसांच्या दुनियेचे नियम पाळून, वेळ मिळेल तेव्हा आईच्या गर्भात पहुडण्याचा आनंद मिळविण्याची किमया हासिल केली. म्हणजे काय? याचं उत्तरं आहे ‘नदीष्ट’.

अच्छा! हाच तो नादिष्टपणा? मग प्रिंटिंग मिस्टेक झाली का? चुकीने ‘नदीष्ट’ लिहिल गेलं असावं!

तर…..  नाही.. असे बिलकुल काही झालेले नाहीये.

तो शब्द ‘नदीष्ट’चं आहे. (इथेच आपल्या डबक्याच्या मर्यादा जाणवायला लागतात). असे म्हणतात की गर्भाशय म्हणजे अख्खे ब्रह्मांड! ‘नदीष्ट’च्या रूपाने मनोज बोरगावकर आपल्या चित्रवान शैलीतून या ब्रह्मांडाची सैर करून आणतात.

ते सर्व ठीक आहे, पण हा ‘नदीष्ट’ काय प्रकार आहे? तर ही आहे नदीने आपल्या पोटाशी धरलेल्या व आईच्या अंगाखाद्यावर खेळणाऱ्या मनोज बोरगावकर या अवलियाची गोष्ट…

आता नदीचं लेकरू म्हटल्यावर आजूबाजूच्या तिच्या सख्या-सोयऱ्यांनी देखील त्याला आपले मानलेलं आणि त्यामुळे त्याला एक अद्भुत अंगण बागडायला मिळालं. या मुक्त संचारामुळे ज्या गोष्टी, गुपितं निसर्ग माणसांपासून लपवित असतो, त्या याला वारसाहक्कांसारख्या समजत गेल्या. कधी कधी काही कोडी देखील याला निसर्गाने घातली. ती कोडी याने स्वतःच्या हिंमतीने सोडवली. नदीकाठी काही अशा व्यक्तींशी याची भेट घडली की ज्यांना समजून घेण्यात माणूस म्हणून त्याचा कस लागणार होता. अशा वेळी निसर्गाचा खुलेपणा त्याच्यात किती मुरला आहे, याची परीक्षा देखील घेतली गेली. आणि खात्रीने सांगू शकू की, आपलं पोरगं निर्मळ, चखोट निघालं म्हणून नदीचा आनंद दुथडी भरून नक्कीच वाहिला असेल.

अजून एक गंमत म्हणजे मनोज बोरगावकर यांचे आणि अठराशे सालच्या अमेरिकेतील थोरोबाबाचे गोत्र एकच निघाले. त्यांच्यात काही ठिकाणी इतके साधर्म्य जाणवते की आपण चकित व्हावे. एकूणच निसर्गाबद्दलची ओढ, बघण्याची दृष्टी ही कमालीची सारखी. थोरोची वचनं आणि बोरगावकर याची कृती या लागेबाधांचे प्रत्ययकारी दर्शन थक्क करणारे आहे. थोरोने ‘वॉल्डनकाठी, लिहिले तर इकडे ‘नदीष्ट’. दोघांनी निसर्गाला वेगळ्या रूपात आपल्या समोर मांडलं आहे. थोरो निसर्गाकडे एका वेगळ्या ओढीने खेचला जात असे. तिच गत लेखकांची आहे.

वेळी अवेळी नदीत पोहायला जाणे, ही बोरगावकारांची आंतरिक गरज आहे. त्यांना पार नादावून टाकलं आहे नदीने. ते म्हणतात की ‘जणू बाधा झाली आहे मला नदीची. आईशी तुटलेली नाळ नदीशी जोडल्यागत वाटत रहाते…एक सुकून मिळतो.’ अनेकांसाठी नदी म्हणजे आपल्या भावना डंपिंग करायची जागा असू शकते. म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचा वावर आहे. त्यांच्या कहाण्या म्हणजे नदीच्या पृष्ठभागावरून तळाचा अंदाज न येण्यासारख्या..

या कहाण्या समजून घेण्यासाठी आधी आपलं माणूसपण बोरगावकारांना त्यांच्या समोर सिद्ध करावे लागले. त्यांच्याविषयी वाटणारी कळकळ ही उथळ पाण्यासारखी नसून नदीसारखी शांत, संयमी आहे, हे जेव्हा समोरच्या व्यक्तीला उमजलं तेव्हा त्यांनी देखील आपलं मन खुलं केलं आहे. ही अशी माणसं, त्यांना समजून घेण्यात लेखकाला आपल्या मर्यादांच्या कक्षा किती मोठ्या विस्ताराव्या लागल्या, हे वाचक म्हणून अनुभवतोच. तेव्हा त्या आपल्या चाकोरीबद्ध मनाला अचंबित देखील करतात. आणि त्याच वेळी बोरगावकरांना मिळालेला अकृत्रिम जिंदादिल प्रतिसाद वाचून मन ओथंबून जातं.

थोरोबद्दल असे वर्णन एके ठिकाण आहे की, त्याच्या रक्तात भिनलेला निसर्गाचा भाग अजून शिल्लक आहे पण तरीही समाजामध्येही मिळून मिसळून राहण्याचे त्याचे कौशल्य हे खास आहे. इथे आपले बोरगावकर थोरोला ओव्हरटेक करतात बरं का! कारण माणसांना बोलत करण्याचा, त्यांना समजून घेण्याची त्यांची क्षमता कमालीची आहे.

सकिनाबी भिकारीण नदीवर अंघोळ करायला येणारी. राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे बोरगावकर नोकरीनिमित्त जेव्हा रेल्वेतून प्रवास करत असायचे तेव्हा बोरगावकरांना कधीमधी रात्रीच्या वेळी स्टेशनवर दिसायची. त्यांना ‘माटीमिले’ अशी हाळी देणारी. एकदा जुजबी ओळखीचे इमान राखून सकिनाबी त्यांना टोळीच्या ठगांपासून वाचवते. तेव्हा नदीवरील ओळख ही इतर ओळखीपेक्षा जास्त निर्व्याज ठरते.

एका ठिकाणी ते लिहितात, “कोणतीही औपचारिकता न पाळणारी ही निसर्गासारखी साफसुथरी माणसं. जसा गुरं चरवणारा काळूभैया, त्याची प्रेयसी, नदीवर मासेमारी करणारा बामनवाड.”

नदीकाठच्या इतक्या गोष्टी ओठावर नाचवणारा बामनवाड मात्र एका घटनेने पार मुका होऊन जातो. आपल्या देखत एक बाई विस्कटली गेली, म्हणून हमसून, हमसून रडणारा बामनवाड. ‘त्या सांज्यापारी त्या बाईला अंगभर इसकटतांना आपण काही म्हंता काही करू शकलो नाही’, याच वेदना तिच्या विस्कटण्याइतकीच. काही घटना या जगण्याचा रस शोषून घेतात. गोदामाय त्याचे समुपदेशन आपोआपच करेल, याची खात्री बोरगावकरांना असते, म्हणून त्यासाठी लागणारी स्पेस समजूतदारपणे देतात.

माणसं देखील नदीच्या बदलत्या तापमानासारख्या इथे जाणवतात. थंडीत नदीचे पाण्याचे दोन-तीन स्तर असतात. वरचा एकदम गार, पाय थोडे खाली गेले की कोमट. आणखी खाली गेले की पुन्हा गारेगार.. भिकाजीचे वागणं असचं पृष्ठभागावरील पाण्यासारखे थंड.. इतके थंड की मधल्या कोमट पाण्याचा स्तरापर्यंत पोचणे सहजशक्य नव्हते. तिथे बोरगावकर महत्प्रयासाने पोहचतात तेव्हा पश्चातापाच्या अग्नीत जळणाऱ्या ‘क्राइम अँड पनिशमेंट’ या कादंबरीचा नायक रस्कोलनिकोव्ह भिकाजींच्या रुपात समोर येतो. भिकाजीची गत दयनीय अशी असते.

 मैं ही मुलजिम हूँ मैं ही मुनसिफ हूँ 

कोई सूरत नहीं रिहाई की…

भिकाजीचा किस्सा गोदामाय पोटात घेते. अशी कित्येक वर्ष माणसांचे किस्से, कहाण्या, पाप, माणसाची निसर्गावर ताबा मिळविण्याची हाव आपल्यात सामावून घेणारी नदी जेव्हा अजीर्ण होऊन पुराच्या रुपात प्रगटते, तेव्हा माणूस किती चटकन तिला बोल लावतो. तेव्हा ‘उम्र का तक़ाज़ा’ असलेल्या दादारावांचे निरूपण वाचून आपल्याला आपल्या भोगवादी जीवनाबद्दल तिटकारा येतो. थोरो म्हणतो ते खरंय-

‘माणसांची नैतिकता हे एक न उलगडणारे कोडे आहे, जगाच्या अंतापर्यंत ते सुटणे अवघड आहे.’

पण निसर्ग आपली नैतिकता कायम  जपत आलेला आहे. दादाराव म्हणतात, “नदी महापुरात जे घेऊन जाते, त्याच्या दामदुपटीने जीवन पेरून जाते. आडदांड मुलाच्या कानफटात मारतानाही त्याला इजा होण्यापेक्षा तो सुधारावा ही जशी आईची भावना असते, अगदी तशीच भावना महापुरातल्या नदीची असते.” नदी पूर्ववत होते..परत खूप काही पोटात घेण्यासाठी..

‘Finding Nemo’ या माशांच्या भावविश्वावर आधारित बालचित्रपटात एक वाक्य आहे.

“When life gets you down, you know what you gotta do? Just keep swimming.”

त्याला अनुसरून बोरगावकारांचे पोहणे सुरू असते. ते लिहितात की, ‘महापुरानंतर नदीही आपल्याला सेटल करत होती. आणि मी ही स्वतःला सेटल करत होतो.’

मधेच एक सर्पमित्र प्रसाद पाहुण्या कलाकारासारखा येऊन जातो. त्याचे सापांबद्दल, प्राण्यांबद्दलचे ज्ञान त्याला अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरायचे असते, असे दिलासा देणारे क्षण येतात. बोरगावकारांचा खरा कस लागणार असतो तो पुढे. थोरो म्हणतो, “ज्याच्या आंतरिक व बाह्यसंवेदना समरूप झालेल्या असतात, तोच निसर्गाचा खरा प्रेमी होय.”

बोरगावकर हे निसर्गाचे सच्चे प्रेमी आहेत.. किंबहुना ते माणसाला निसर्गाचा एक भाग मानत असल्याने त्यांच्यातील भल्याबुऱ्या गुणांकडे ऋतुबदलाप्रमाणे सहज, निर्मळ बघू शकतात. निसर्गाकडे विद्रुप, वैगुण्य हा भाग नसतो. जे जसं असतं ते तसेच असतं. ‘स्वीकारणे’ हा शब्द मुळी माणसाच्या श्रेष्ठत्वातून आला आहे.

‘नदीष्ट’तील महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे सगुणा. ही तृतीयपंथी व्यक्ती. बोरगावकारांना ‘जान’ म्हणणारी सगुणा ‘नदीष्ट’ची जान आहे. तृतीयपंथी, हिजडा याची दुनिया..आपलं जग जिथे थांबते, तिथून त्याचं जग सुरू होते….

एका वेगळ्या दुनियेशी ओळख होत असतांना, आपण दहा वेळा थबकतो.. हिवाळ्यात उललेल्या त्वचेसारखी आपली मध्यमवर्गीय दुःख, यातना, वेदना..

आणि आतली हाड दिसावी, इतपत त्वचा सोलपटून, खरवडून गेलेल्या माणसांचे जग..

‘जोगवा’ या चित्रपटाच्या हिजडाच्या भूमिकेसाठी जेव्हा किशोर कदम यांना परकर, ब्लाऊज, साडी घालायला लागली होती तेव्हा केवळ या वेशभूषेमुळे ‘आपण पुरुष आहोत, आपण पुरुष आहोत’ ही जाणीव सतत ते स्वतःला करून देत होते. ‘लोनली’ या लेखात त्यांनी फार स्पष्टपणे आपल्या मनस्थितीचे वर्णन केले आहे. स्वतःला हिजड्याच्या रुपात त्यांना स्वीकारणे किती अवघड गेले. ती तर केवळ एक भूमिका होती. तरी त्यांना ताण आला होता. ते लिहितात की, ‘जे करावंसं वाटत नाही, जे व्हावंसं वाटत नाही, तेही करत असतानाचा एकाकीपणा अनुभवण्यासाठी प्रत्येक ऍक्टरने एकदा तरी एकांतात साडी नेसून पाहायला हवी आणि प्रत्येक स्त्रीने पॅन्ट- शर्ट चढवून आपण पुरुष असल्यासारखं वागून बघायला हवं.’

‘नदीष्ट’त हिजड्यांच्या हलाखीच्या जगाचे वर्णन खूप सविस्तर आलेलं आहे. त्याच्या जगाचे अपरिचित अंधारे कोपरे त्यांनी बोरगावकारांना दाखवले, यावरून त्याच्यावरील विश्वासाचे दर्शन होते. आणि त्याच्या बिरादरीची आब राखत बोरगावकारांनी जबाबदारीने अधिक परिपक्व लेखन केले आहे. त्यातील वर्णने वाचून काळजाचा थरकाप होतो. वास्तवात बाईवेषातले पुरुष बघून आपल्याला किळस वाटते. आपलं पांढरपेशी मन मख्ख करून, त्यांच्या दुर्लक्ष करतो. सुरवातीला रेल्वेच्या डब्ब्यात सगुणाशी नजरानजर झाल्यावर नजर चोरणाऱ्या बोरगावकारांनां सगुणा विचारते, “नजर चुरानेवाले तुम…और हिजडे हम.. वारे व्वा..सच्ची बात बता, आँख में आँख डालके देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा? आँख चुरानेवाला हिजडा हुआ नारे!” बोरगावकर लिहितात की तिच्या या वाक्याने माझे उभे आडवे अस्तित्व हादरून गेले. समाजाच्या तिरस्कृत, बीभत्स असलेल्या हिजड्यात एक अविश्वसनीय शहाणपण दडलेले असल्याचे जाणवले. पुढे अनेकदा सगुणा आपल्या मित्रांला इतरांसमोर लज्जित होऊ नये, म्हणून सामंजस्याने वागली आहे. त्यामुळे तिच्याबद्दलचा रुतबा लेखकाच्या मनात आणि आपल्या मनात देखील अधिक वाढतो. त्यांना देखील आपल्यासारखेच मन असते. सततच्या झिडकरण्यामुळे, न्यूनगंडामुळे ते आक्रमक होतात. तेही या निसर्गाचा भाग आहेत. जगण्याचा त्यांना समान अधिकार आहे. आईच्या भेटीसाठी आसुसलेली सगुणा जेव्हा वास्तव स्वीकारत कायम आपल्या जवळ बाळगत असलेली हळदीची जुनी प्लस्टिक डबीला पाण्याच्या प्रवाहात सोडते. तिची होणारी कुतरओढ ही जीवघेणी! ही नदी माझ्या आईच्या गावांवरून देखील जाते हे वाचतांना उमरावजांच्या ओळी आठवल्या.

 “बुला रहा क्या कोई चिलमनों के उस तरफ़  

        मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है..

सुन्न,सुन्न होऊन जातं मन!

नदी तिची डबी आपल्या उदरात घेते. नदी फिरून वापस आपल्या उगमाकडे येत नाही, हे सत्य पचवून सगुणादेखील भूतकाळाला मागे टाकून प्रवाही होते.. आपण ही आपल्या उललेल्या त्वचेला मोश्चरायझर लावतो..

नदी वाहत असते.. काठावरील माणसं येतात-जातात. बोरगावकर आपल्या आईच्या उदरात तरंगण्याचा अनुभव घेत असतात. काळूभैयाचे नदीकाठचे साम्राज्य आबादीत असते. पुजारी मंदिरात मग्न असतात. घाटाच्या बहात्तर पायऱ्या चाळा म्हणून लेखक नेहमी मोजत रहातो, त्यांनाही माहिती असतं त्या बहात्तरचं रहाणार आहेत.. पण क्षणोक्षणी नदी मात्र बदलत असते. तसेच जीवनाचे. सुखदुःख येत जात असतात.

थोरोचे विधान आहे की, The heart is forever inexperienced.. निसर्ग मनाने वाचायचा असतो, बुद्धीने नाही!

त्याच मनाने लेखक नदीवरील घडामोडी नोंद करत गेले आणि ‘नदीष्ट’ तयार झाले. मोराच्या थव्याचा मागोवा घेत असतांना मोरांच्या ऐटदार चालीचे समजेलेलं रहस्य म्हणजे मोरांच्या दोन पावलांतले कधीही न बदलणारे अंतर. ते रहस्य लेखकाच्या लेखणीत उतरलं. सुरवातीपासून शेवटपर्यंत लेखनाचा ओघ एकसारखा राहिल्याने ते मोरांच्या चालीसारखे डौलदार झाले आहे. मराठीतील एक नाविन्यपूर्ण लेखन हे फुललेल्या मोरपिसाऱ्या सारखंच आपल्याला खिळवून ठेवणारे आहे.

‘नदीष्ट’ची सर्वात लख्ख, लख्ख करून जाणारी गोष्ट म्हणजे नदीची व्हर्जिन, अंजान जागा. बामनवाडच्या ताताने सांगितलेली अंजान जागेची कहाणी म्हणजे कोणत्याही माणसाची जीवनेच्छा तरोताजा होईल, इतकी जादुई.. नदीतील अंजान जागा शोधतांना केलेली धडपड ही त्याची स्वतःची आजमाईश होती. त्यासाठी केलेली धडपड ही हृदयस्पर्शी! वाचत असतांना आपली उत्सुकता शिगेला पोहचते. हा आटापिटा यशस्वी झाल्याची झिंग आपल्यावर देखील चढते. दृकसंवेदनाचा एक तरल अनुभव.. थोरोबाबा इथे देखील अवतरतात आणि म्हणतात, “निसर्ग जेव्हा माझ्या नकळत माझा वापर करून घेतो तेव्हा मला स्वतःलाच स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा मोह होतो.”

पुढे अर्थातच बोरगावकारांनी त्या मूठभर वाळूकडे काहीही मागितले नाही.. ते मागणार देखील नाही…थोरोबाबासारखं ते तृप्त, समाधानी राहतील, यात शंकाच नाही. आपण वाचक ती वाळू बोरगावकारांकडून हक्काने घेऊ आणि त्या व्हर्जिन वाळूकडे मागणं मागू की, आमच्या महाराष्ट्रातील या थोरोला असेच निसर्गाचे आशीर्वाद लाभू दे! नदीच्या गर्भजलात त्याला निर्धास्त तरंगू दे!! आणि असच लिहीतं ठेव… नदीतल्या आणि साहित्यातील व्हर्जिन जागा अजून, अजून सापडू दे!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0