रंगीबेरंगी आठवले

रंगीबेरंगी आठवले

अन्यायाशी समझोता करून सत्तेत सहभागी झालेले रामदास आठवले, जेव्हा सर्वांच्या साक्षीने अभिनेत्री कंगना राणावत किंवा पायल घोषच्या मदतीला धावून जात असतात, तेव्हा ते महाआघाडी सरकारला सुरुंग लावण्याच्या व्यापक योजनेत सहभागी होऊन सत्तेत वाटा मिळाल्याची त्या-त्या वेळेपुरती परतफेड करत असतात...

केद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री, रिपब्लिकन नेते रामदास आठवले,आगापिछा नसलेल्या शीघ्र कविता करून संसदेला खो खो हसवतात. कधी तरी कोणावर तरी अप्रस्तुत विनोद करून मीडियाला मसाला पुरवतात. आपल्या ढंगबाज संभाषण शैलीच्या बळावर अनुयायांच्या टाळ्या-शिट्या मिळवतात. परंतु लोक त्यांच्याबद्दल काहीही म्हणत असले तरीही, रामदास आठवले आणि त्यांचे राजकारण हा हसण्यावारी नेण्याचा विषय ठरत नाही. अगदी त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्याचे सार्वजनिक वर्तन-वावर कितीही मनोरंजनात्मक असले तरीही नाही. कारण, त्यांच्या वक्तव्यांत जशी इतर राजकारण्यांप्रमाणे समयसूचकता दडलेली असते, तसे त्यांच्या कृतीतून सत्तेतल्या मोठ्या भागीदाराचे छुपे हेतूही उघड होत असतात, आणि ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्या समाजाचे राजकीय भागीदारीपोटी घडून येणारे अहितही पुढे येत असते.

इथे, राज्यातल्या महाआघाडी सरकारच्या इमल्याची एकेक वीट काढण्यासाठी पडद्यामागून केंद्रातले सत्ताधारी सूत्रे हलवत आहेत आणिआता आपली पाळी म्हणत, पडद्यावरची भूमिका सध्या आठवले पार पाडतानाचे एक चित्र जनतेच्या मनात आकार घेऊ लागले आहे. सध्या कंगना राणावत-पायल घोष या नट्यांवर झालेल्या अन्यायाच्या निवार्णार्थ ज्या प्रकारे आठवलेंच्या वलयांकित वाऱ्या सुरू आहेत, त्यात ही बाब पुरेशी स्पष्ट होणारी आहे.

एका बाजूला, महाआघाडीचे सरकार अंतर्विरोधाने पडेल हा राज्यातल्या भाजप नेत्यांचा फसवा पवित्रा राहिलेला आहे. प्रत्यक्षात राज्यात महाआघाडी सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून फटी शोधून पाडापाडीचा खेळ सुरू आहे. याच खेळाचा एक छोटा भाग म्हणून, तक्रारदार असलेली नटी पायल घोषच्या सोबत राहून अनुराग कश्यप लैंगिक छळ प्रकरणाला धग देत राहणे, त्या योगे उद्धव ठाकरे सरकारच्या बदनामीत भर टाकत राहणे, महाआघाडी सरकारविरोधात जनमत तयार करतानाच तपास यंत्रणांवर दबाव वाढवत राहणे आदी राजकीय उपक्रमसुरू आहे.

आठवलेंना दिलेले टार्गेट स्पष्ट आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण पेटण्याकामी अशीच छोटेखानी भूमिका आधी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी आणि मग कंगना राणावतने वठवल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. जनतेमध्ये विरोधी मत तयार केले म्हणजे अगदी न्यायालयांवर नाही आला, तरी तपास यंत्रणावर नक्कीच दबाव येतो. त्यातून न्यायाची प्रदीर्घ प्रक्रिया सुरू करता येते. शेवटी, पोलीस अधिकारी काय, न्यायाधीश काय, याच दबाब-प्रभावात वाढलेल्या समूहांतून येत असतात, ही यामागची गणिते असतात, हेही आता जनतेला पुरते उमगलेले आहे.

परंतु इथे एक अडचण आहे. पायल घोषची पाठराखण करताना रामदास आठवलेंनी केलेल्या मागण्या, दाद मागण्यासाठी निवडलेला मार्ग तंतोतंत कंगना राणावत प्रकरणाशी मिळताजुळता आहे. म्हणजे, कंगना राणावतनेमुंबई पोलीसांच्या राजपूतप्रकरणाशी संबंधित तपासप्रक्रियेवर संशय व्यक्त केला. आठवलेंनीसुद्धा पायल घोषप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हेतूंबद्दल संशय बोलून दाखवला. थेट राज्य सरकारकडून जीवाला धोका आहे या कारणास्तव कंगनाला वाय प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी झाली. ती लगोलग मान्यही झाली.

इथे देखील आरोपी अनुराग कश्यपकडून जीविताला धोका आहे, असे सांगून आठवलेंनी पायल घोषला सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी केली. राज्याचे जणू एकमेव तारणहार उरल्यागत कंगना राणावत जशी राज्यपालांच्या भेटीला गेली, तसे आठवलेंनीही, पायल घोषची तिच्या वकिलासह राज्यपालांची भेट घडवून आणली. यात जशी राज्यपाल भेटीवरून कंगनावर टीका झाली, समारंभाचे निमंत्रण देण्यास गेल्यागत सगळ्यांची देहबोली आहे, असे भासल्याने आठवलेप्रणित भेटीवरूनहीतशी ती झालीच.

एका पातळीवर हे सगळे हास्यास्पद वाटत असले तरीही महाआघाडीविरोधी राजकारणाचा भाग असल्याने ते भाजपविरोधकांना मोडीतही काढता येत नाही. आठवले नॉन सिरियस भासत असले तरीही त्यांच्या राजकारणाकडे या विरोधकांना दुर्लक्षही करता येत नाही, अशी हीसध्याची स्थिती आहे.

राजकारण हे मुख्यतः हितसंबंधांच्या रक्षणासाठी होत आले आहे.आठवलेंचेही राजकारण कायमच राजकीय बाजारातले चढ-उतार पाहून पुढे सरकलेले आहे. त्यांच्या आजवरच्या राजकीय झोक्यांना मुख्यतः दलित राजकारणातली फाटाफूट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे वापरा आणि फेका हे धोरण कारणीभूत ठरले आहे. तसेही राजकारणाच्या हौदात उतरलेल्यांच्या विचारधारेचे दोर कायमच लवचिक असतात. आठवले स्वतःचे, अनुयायांचे सत्ताकेंद्री हितसंबंध जपण्यासाठी राजकारण करतातच, परंतु भाजपशी जवळीक झाल्यापासून संघाला अपेक्षित असलेल्या सांस्कृतिक ढाच्याला त्यांनी धक्का लावलेला नाही, हे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. तसे करून ते संघाला अपेक्षित असलेली जात-धर्मकेंद्री रचना (सुपरस्ट्रक्चर) कायम ठेवण्यासएकप्रकारे मोठाच हातभार लावत आले आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा डावे, उदारमतवादी वा मध्यममार्गी दलित अत्याचाराविरोधात त्वेषाने रस्त्यावर उतरतात, त्यांच्यात आठवले आणि त्यांचा पक्ष सहसा नसतो. परंतु हाच पक्ष कंगना राणावतला संरक्षण पुरवण्याच्या इराद्याने रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्यासह एअरपोर्टवर हजर असतो. हाच पक्ष पायल घोषचेही संरक्षण करेल, अशी ग्वाही खुद्द आठवले मीडियाच्या माध्यमातून जनतेला देतात.  

आठवलेंचा अनुयायी हा आर्थिकदृष्ट्या अजूनही बऱ्यापैकी पिछाडीवर असला तरीही, इच्छा-आकांक्षा उंचावलेला असा आहे. या अनुयायी वर्गाला ब्राह्मणीकरणाचे विशेषतः ब्राह्मणी संस्कृतीचे असलेले आकर्षणही लपून राहिलेले नाही. त्यांचे हे आकर्षण एका पातळीवर संघ-भाजप शमवत असतोच, पण राजकीय डावपेचांचा भाग म्हणून जेव्हा आठवलेकंगना राणावत किंवा पायल घोषसारख्या बॉलिवूडमधल्या नट्यांच्यापाठीशी उभे राहतात, तेव्हा त्यांच्या अनुयायांची, एरवी अप्राप्य असलेल्या ग्लॅमर विश्वाशी स्वतःला जोडून घेण्याची सुप्त इच्छाही पूर्ण होत असते. इथे आठवलेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा गोंजारण्याचा भाजपचा हेतू सफल झालेला असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, नुसतेच शिकू-संघटित होऊ नका, राज्यकर्ती जमात बना. आज आठवलेंचा समावेश राज्यकर्त्यांच्या जमातीत झालेला आहे. मात्र, त्यांचे टीकाकार म्हणतात, तसे ते अन्यायाशी समझोता करत राज्यकर्ते बनले आहे. अर्थातच,राजकारणात कोणी तरी, कोणाचा तरी कायमच वापर करत असतो. वा होऊ देत असतो. त्या मार्गाने जाताना अनुयायांशी प्रतारणा होणार नाही, इतपत तोल सांभाळण्यात मुख्य म्हणजे सत्तेत छोटा का होईना, वाटा मिळवण्यात रामदास आठवले आतापर्यंत तरीही यशस्वी ठरले आहेत.  

मात्र असा हा, अन्यायाशी समझोता केलेला आठवलेंसारखा नेता जेव्हा वर्चस्ववादी भाजपचे सत्तेचे राजकारण पुढे रेटतो, तेव्हा त्यांचे वा त्यांच्या अनुयायांचे फारसे नुकसान संभवत नसले तरीही, समग्र दलित उत्थानाचा लढा नक्कीच कमजोर पडत गेला आहे. विशेषतः जेव्हा अस्पृश्यतेचा विरोधक परंतु वर्णव्यवस्थेचा खंदा पुरस्कर्ता असलेला संघ-भाजप राजकीय सत्तेवरची पकड अधिकाधिक मजबूत करत चालला आहे, अशा वेळी दलित सन्मानासाठीच्या लढ्याची तीव्रता खूप वाढलेली असताना,रामदास आठवले भाजपच्या सत्तेच्या राजकारण फरपटत जाताना दिसतात. अनेकदा हास्य– विनोदात ते ही फरफट बेमालून झाकूनही टाकतात. त्यांचे कंगना राणावत-पायल घोष या नट्यांसाठी मैदानात उतरणे, हाथरसच्या बलात्कार पीडितेच्या मृत्युनंतर निषेधाचे तोंडदेखले उपचार पार पाडणे, हे एका राजकीय अपरिहार्यतेतून येते. त्यांच्या या रंगीढंगी राजकारणाला चिकटून असलेली अंगभूत अरिहार्यता म्हणूनच दलित अभ्यासकांच्या कायम चिंतेचा विषय ठरते. कारण, असे करून त्यांनी दलितांमधला एक वर्ग वर्चस्ववादी संघ-भाजपाच्या दावणीला बांधलेला असतो. तेव्हा या वर्गाचे नियंत्रण एका पातळीवर खुद्द आठवलेंच्या हातातही राहिलेले नसते.

COMMENTS