नेणिवेतील जातवास्तव व समलैंगिकतेवरचे भाष्य

नेणिवेतील जातवास्तव व समलैंगिकतेवरचे भाष्य

प्रसिद्ध पटकथाकार, दिग्दर्शक नीरज घायवान आपल्या नव्या कलाकृतीतून- ‘गिली पुची’तून नेणिवेतील जातवास्तव दाखवतो. शोषित वर्गातून तुम्ही किती मोठे व्हा, तुमची जागा ते तुम्हाला दाखवून देतात. तुम्ही कितीही कष्ट, सहकार्य, सेवा, करूणा, प्रेम द्या एक दिवस जातवास्तव तुम्हाला सर्वांपासून झटक्यात दूर करते व आत्मभान देते.

फादर स्टेन स्वामी यांना अखेर स्ट्रॉ, सीपर मिळाले
घाई करू नका, सर्वांना लस मिळेल – उद्धव ठाकरे
ज्योतिरादित्य यांचा नारायण राणे होणार का?

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात स्त्रीप्रधान चित्रपट अगदी नगण्य आहेत. याची कारणे पुरुषप्रधान संस्कृतीत दडली आहेत, हजारो वर्षांपासून भारतीय समाज धर्म, पंत, लिंग आणि जाती व्यवस्थेने ग्रासला आहे, विषमतावादी समाज रचनेला भारतीय लोक आपली संस्कृती अजून ही मानतात आणि तिचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात अग्रेसर असतात. मागच्या एका दशकात त्या मानाने अनेक स्त्रीप्रधान चित्रपटाची निर्मिती होताना दिसत आहे, ही अभिमानाची गोष्ट नाही तर शरमेची आहे. भारतीय स्त्रीचे सामाजिक स्थान ओळखण्यासाठी बॉलीवूड इंडस्ट्री पुरेशी आहे. नुकतीच रिलीज झालेली नेटफ्लिक्सवरील ‘अजीब दास्ताँ’ या अँथॉलॉजित एकूण चार शॉर्ट फिल्म आहेत. त्यातील एक नीरज घायवान यांची ‘गिली पुची’- (Geeli Pucchi (Sloppy Kisses) जळजळीत जातवास्तव मांडणारी कथा आहे.

नीरज घायवान

नीरज घायवान

शहरात राहणार्या फॅक्टरीत काम करणार्या एकमेव दलित महिलेची- भारती मंडलची- ही कथा आहे. एका फॅक्टरीचा मॅनेजर एके दिवशी भारती मंडलला (कोंकणा सेन) डावलून अन्य एका ब्राह्मण जातीतल्या प्रिया शर्माला (अदिती राय हैदरी) ऑफिसात एका पदावर नियुक्त करतात. सर्व कौशल्ये असूनही भारतीला नाकारले जाते. आपल्याला नाकारले म्हणून भारती प्रियावर नाराज होते. एके दिवशी तिला कळते की त्या प्रियाकडे त्या पदाची पात्रताही नाही. त्याचा भारतीला धक्का बसतो. आपल्याला मॅनेजरने डावलेय हे कळून चुकतं. पण या दरम्यान भारतीची प्रियाशी गट्टी जमते आणि त्या अगदी जिवलग मैत्रिणी बनतात. आणि शेवट माणूस म्हणून आपण कितीही जवळ आलो तरी व्यवहार आणि सामाजिक जीवनात आपली जातजाणीव ही नेणिवेतून काम करत असते असे ही कथा सांगते.

आपल्याकडील मेनस्ट्रीम सिनेमामध्ये सामाजिकदृष्ट्या शोषित घटकाला स्थान नाही व नव्हते. एका मुलाखतीत प्रकाश झा म्हणाले होते की बॉलीवूड सिनेमा हा शोषित घटकांच्या जीवनावर आधारित सिनेमे बनवत नाही. पण अपवाद एक. काही वर्षांपूर्वी नीरज घायवान या दिग्दर्शकाने ‘मसान’मधून दलित जीवनानुभव पडद्यावर ताकदीने मांडला.

नीरजच्या ‘गिली पुशी’त जातसंघर्ष नेणिवेतून दिसतो. तो कथेच्या प्रवाहात अधिक गडद होत जातो. भारतीची धडपड कंपनीत डेटा ऑपरेटरचे काम मिळावे यासाठीची असते. तिच्या पातळीवर ते काम तिच्या श्रमाला, कौशल्याला अधिक न्याय देणारे आहे. आपल्याकडे सर्व पात्रता व ज्ञान असूनही कोणतीही कल्पना न देता डेटा ऑपरेटरपदी अचानक दुसरी मुलगी आलेली पाहून भारती आपल्या कंपनी मॅनेजरवर रागावते. एका प्रसंगात कंपनीतल्या सहकाऱ्यांसोबत दुपारच्या वेळी डबा खात असताना तिच्यातला संताप बाहेर पडतो. पण अनुभवातून बोथट झालेला तिचा एक सहकारी आपण दलित आहोत, अशी तिला जाणीव करून देतो. तुझे आडनाव शर्मा, मिश्रा, मुखर्जी, बॅनर्जी नाही. हे टेबल आपल्याला फक्त जेवणासाठीच आहे. काम करण्यासाठी नाही, असे तो तिला बोलून दाखवतो.

या प्रसंगात डेटा ऑपरेटरपदी रुजू झाली ती ब्राह्मण मुलगी प्रिया तिच्या टेबलावर येऊन बसते. आपला जेवणाचा डबा तिच्यापुढे ठेवते. या दरम्यान एक कामगार भारतीच्या लैंगिकतेवर उद्देशून एक टोमणा मारतो. तो असह्य झाल्याने भारती त्या कामगाराला एक ठोसा मारते व त्याला घायाळ करते. भारतीचे हे एकदम उग्र रुप प्रियाला एकाच वेळी चकित व धक्का देणारे असते. तिच्यातला निडरपणा तिला एकदम भावून जातो.

अनेक दलित स्त्रियांची अशी निर्भीडता आणि खंबीरता प्रचंड दारिद्र्य, सवर्णांच्या वासनायुक्त नजरा झेलत, व्यसनी पतीचा अत्याचार सहन करत वाढत आलेली असते. भारतीही त्याच वर्गातील असल्याने ती एकाच वेळी फॅक्टरीतील जात व्यवस्था व पितृसत्ताक समाज यांच्या शोषणाचा बळी ठरत असते.

शांताबाई कांबळेच्या स्वकथनात आणि अनेक दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रात हे पाहायला मिळते. हे चित्र आज दुर्दैवाने आपल्याकडील चित्रपटांत दिसून आलेले नाही. मात्र नीरज घायवान हे शोषण मांडण्याचा प्रयत्न करतो. गुणवत्ता असूनही जातीमुळे नाकारलेली संधी हा या कथेतला प्रमुख भाग आहे. पण संधी नाकारल्यामुळे भारतीच्या मनाची होणारी घुसमट, संताप ते व्यवस्थेविरोधातील आक्रोश, चीड असे वैयक्तिक ते सामाजिक पातळीवरचे संदर्भ आपल्याला अस्वस्थ करत जातात.

नीरजने या कथेत असे अनेक लेअर डिझाइन केले आहेत. त्यात आणखी एक महत्त्वाचा म्हणजे दलित स्त्रींमधील व्यक्त न झालेली समलैंगिकता. कथा प्रवाही असल्याने भारती आणि प्रिया यांच्यातील लैंगिक आकर्षण हा एक धक्का प्रेक्षकांना बसतो. जात, धर्म आणि वर्ग याच्या पलिकडे लैंगिक स्वातंत्र्य, शरीराची आस असते पण जात व पुरुषसत्ताक समाजात एका शोषित महिलेची होणारी कुचंबणा हाही एक मोठा मुद्दा नीरज अधोरेखित करतो.

भारतीला समलैंगिक असल्याने एक वेगळेच दुःख सोसावे लागत असते पण त्याच बरोबर जात वास्तवाचे जगताना बसणारे चटके, जागो जागी होणारी छळवणूक, अवहेलना, अपमान, तुच्छतेची वागणूक याचाही तिला जगताना सामना करावा लागतो.

प्रिया आणि भारती एक स्त्री म्हणून खूप जवळ येतात. प्रियाच्या कौटुंबिक समस्या तिला समजतात. त्यात तिला ती मदतही करत जाते. दोघींमधली समलैंगिकता यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. मात्र जेव्हा प्रियाच्या सगळ्या प्रापंचिक समस्या दूर होतात आणि भारती तिला आपली जात सांगते, तेव्हा भारतीय स्त्रीची जातीयवादी मानसिकता जागी होते.

एका प्रसंगात ऑफिसमध्ये प्रियाचा बर्थडे सेलिब्रेशन साजरा केला जात असताना कंपनीचा मॅनेजर मात्र भारतीला आपल्या केबिनबाहेर जायला सांगतात. ते नंतर काही सहकार्यांसमवेत केक कापून प्रियाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात. सगळे जण केक कापून प्रियाला शुभेच्छा देतात. हा सगळा प्रसंग काचेच्या भिंतीतून भारती अवघडलेल्या अवस्थेत पाहत असते. मॅनेजर तिला पाहून केबिनमध्ये बोलावतात आणि केक कापून सगळ्यांना वाटायला लावतात. कंपनीचा मॅनेजरच आपली कंपनीतील जागा दाखवतो याचा विलक्षण संताप भारतीला वाटतो आणि ती आपल्या लॉकर रूममध्ये येऊन ढसाढसा रडते.

असे अहवेलनेचे प्रसंग अनेकांच्या वाट्याला आलेले आहेत. नीरज रिअल टू रिळ हे जीवन वास्तव दाखवतो. तुम्ही किती मोठे व्हा, तुमची जागा ते तुम्हाला दाखवून देतात. तुम्ही कितीही कष्ट, सहकार्य, सेवा, करूणा, प्रेम त्यांना द्या एक दिवस जातवास्तव तुम्हाला झटक्यात दूर करते. हा अस्पृश्य जीवन अनुभव आजही मध्यमवर्गीय दलित समाज घेत आहे.

भारतीचे स्वतःचे आडनाव लपवणे हा या कथेतला आणखी महत्त्वाचा भाग आहे. भारतीय समाजात आडनावावरून जात शोधली जाते. भारती आपले आडनाव बॅनर्जी आहे, असे खोटे सांगते. पण तिची जात प्रियाच्या घरात कळल्यानंतर तिच्याविषयीची एक अढी दिसून येते.

नीरज अतिशय सिनेमॅटिक कौशल्याने इंटरसेक्शनल फेमिनिझमचा मुद्दा ठळक करतो. या सिनेमाचा शेवट हा पोलिटिकल स्टॅन्डमुळे खूप इंटरेस्टिंग झाला आहे. जेव्हा भारतीच्या लक्षात येत की आपल्यासोबत अदृश्य जातीय भेद होत आहे तो नीरज परिणामकारक सिम्बॉलिक भाषेत दाखवतो. नेहमी शर्ट पँट अशा पुरुषी वेशात असलेली भारती प्रियाच्या निमंत्रणामुळे घरी जाते. प्रियाला बाळ झालेलं आणि तिचा नवरा आणि सासूबाई भारतीला बसायला सांगतात. खूप नम्रतेने प्रियाचा नवरा तिने केलेल्या मदतीमुळे भारतीचे आभार मानतो, प्रिया खूप तुमचे नाव काढते तुमची खूप मदत झाली, आमचे घर सुरळीत होण्यासाठी आणि अजून ती कामावर जाते म्हणतेय तिला जरा समजावा म्हणत चहाचे कप समोर ठेवतो. त्यातील एक कप इतरांपेक्षा वेगळा असतो. सासू, नवरा आणि प्रिया कप उचलतात. राहिलेला वेगळा कप भारतीचे दलित अस्तित्व दर्शविण्यास पुरेसा असतो. प्रियाच्या सासूबाई प्रियाला लगेचच नोकरीवर पाठवण्यास तयार नसतात. त्यावेळी भारती प्रियाची नव्हे तर तिच्या सासूची बाजू घेते आणि प्रियाला घरीच बाळाची काळजी घे म्हणून तिला थांबवते. आणि तिच्या जागी आपण डेटा ऑपरेटर म्हणून कामावर रुजू होते.

भारतीचा पुढे जाण्याचा एकेक टप्प्यातला संघर्ष नीरज उलगडून दाखवतो. या संघर्षात भारतीच्या मनातला स्वाभिमान, स्वतःच्या कौशल्यावर तिचा असणारा अढळ विश्वास आणि प्रसंगी व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रखर आत्मविश्वास असा प्रवास ‘गिली पुची’ उलगडत जातो. जात व्यवस्थेतील गुंते, त्यात स्त्रियांचे अवमानित करणारे स्थान हे या २१ व्या शतकातही आपल्या समाजातील ढळढळीत वास्तव आहे, याची जाणीव नीरज करून देतो.

चंद्रकांत कांबळे,  सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे सिनिअर रिसर्च स्कॉलर आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0