भीमा-कोरेगांव दंगल खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले

भीमा-कोरेगांव दंगल खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले

मुंबईः १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगांव दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे. त

एल्गार केसमधील आरोपींनी लिहिलेल्या पत्रांची अडवणूक
‘भीमा-कोरेगाव तपास एनआयएनने करण्यास सरकारची हरकत नाही’
भीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला!

मुंबईः १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगांव दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी न्यायालय व राज्य मानवी हक्क आयोगालाही ही माहिती दिली आहे. भिडे यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्यांचे आरोपपत्रात नाव नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

भिडेंविरोधात कोणतीही सुनावणी होत नसल्याने त्यांच्या मानवी हक्कांचा भंग होत असल्याची तक्रारही राज्य मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आली होती.

बुधवारी संभाजी भिडे यांचे या प्रकरणातून नाव वगळल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. सध्या या प्रकरणात ४१ आरोपींवर २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१ जानेवारी २०१८मध्ये भीमा-कोरेगांव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमादरम्यान दंगल उसळली होती. त्या संदर्भात ४१ जणांवर दोषारोपपत्र दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आली आहे. या प्रकरणावरून राज्यातले राजकारण ढवळून गेले होते. या दंगलीत संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता आणि नंतर भिडे व मिलिंद एकबोटे या दोन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्याविरोधात पोलिस तक्रारीही दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या दंगलीमागे माओवादी विचारवंत व नक्षलवाद्यांची मोठी फळी कार्यरत असल्याच्या संशयावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी वारावरा राव, सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे, फादर स्टेन स्वामी, अरुण फरेरा आणि व्हेरनॉन गोन्साल्विस व अन्य आरोपींवर देशाच्याविरोधात युद्ध पुकारल्याचे आरोप ठेवले होते व त्यांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप वाढून केंद्रातील मोदी सरकारने हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: