धर्मांतरः विहिंपच्या तक्रारीनंतर ६ दलित-ख्रिश्चन महिलांना अटक

धर्मांतरः विहिंपच्या तक्रारीनंतर ६ दलित-ख्रिश्चन महिलांना अटक

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात वाढदिवसाच्या एका कार्यक्रमात जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या तक्रारीवरून ६ दलित-ख्रिश्चन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांची नावे इंद्र कला, सुभागी देवी, साधना, सविता, अनिता व सुनिता अशी असून इंद्र कला या महिलेच्या मुलाचा वाढदिवस या सर्व जणी साजरा करत असताना पोलिस कार्यक्रमात आले व त्यांनी या ६ महिलांना अटक केली.

या महिला सक्तीने धर्मांतर करत असल्याची तक्रार आझमगढ जिल्ह्यातील महाराजगंज येथील विहिंपचे गटप्रमुख आशुतोष सिंग यांनी केली. सिंग यांनी आपल्या तक्रारीबाबत द वायरला सांगितले की, इंद्र कला यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही हरिजन महिलांचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. आम्ही ही बाब पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली. या महिला धर्मांतर करण्यासाठी पैशाचे आमीष दाखवत होत्या. त्या प्रभू येशूचे नावही घेत होत्या. वास्तविक तेथे वाढदिवस नव्हताच पण सक्तीने ख्रिश्चन धर्मांतर केले जात होते, असे सिंग यांचे म्हणणे होते.

पोलिसांनी ताब्यात केलेल्या ६ महिलांवर आयपीसी कलम ५०४ व ५०६ अंतर्गत फिर्याद नोंद झाली आहे. तसेच उ. प्रदेश धर्मांतर कायदा २०२१ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत दोषींना १ ते ५ वर्षे तुरुंगवास व कमीत कमी १५ हजार रु.चा दंड किंवा अल्पवयीन वा अनु.जाती/जमाती समाजातील एखाद्याचे धर्मांतर करत असल्याचे आढळल्यास ३ ते १० वर्षे तुरुंगावास इतकी शिक्षा आहे.

दरम्यान, पोलिसांनी या ६ महिलांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना विशेष स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारला. या संदर्भातील पुढील सुनावणी १६ ऑगस्ट रोजी आहे.

ही घटना घडली तेव्हा या महिलांसोबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ जैसवार उपस्थित होते, त्यांनी सांगितले की, या ६ महिला दलित-ख्रिश्चन असल्याने त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभू येशूचे नाव घेत वाढदिवसाच्या केक कापला. या वेळी एक तरुण अमित सिंग तेथे आला आणि त्याने सक्तीने धर्मांतर करत असल्याचे आरोप सुरू केले.

ही घटना रविवारी घडल्याने विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हे प्रकरण नेण्यात आले, त्यांनी या ६ महिलांना जामीन नाकारला.

उ. प्रदेशात २०२१ मध्ये ३०० ख्रिश्चनांविरोधात सक्तीने धर्मांतर केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. बहुतांश तक्रारी या कट्टर उजव्या संघटनांकडून केल्या जातात व पोलिस त्यावर लगेच कारवाई करतात. बहुतांश तक्रारी या दलित समाजातील ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्यांविरोधात केल्या जात असल्याचे दिसून आले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS