नवी दिल्लीः भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱे एक शिंपी कन्हैया लाल यांची मंगळवारी मोहम्मद रियाज अत्तारी व घौस मोहम्मद या दोन मुस्लिम कट्टरवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. कन्हैय्या लाल यांच्या या हत्येचा व्हीडिओ या दोघांनी चित्रित केला असून अन्य एका व्हीडिओत या दोघांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. या हत्येनंतर उदयपूरमध्ये तणाव वाढला असून पोलिसांनी या दोघा हल्लेखोरांना राजसमंद येथून अटक केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
मंगळवारी कन्हैय्या लाल यांच्या हत्येचा व्हीडिओ ट्विटरवर प्रसिद्ध झाल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेनंतर संपूर्ण उदयपूर शहरात तणाव पसरला, त्यावर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट बंद केले आहे व मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात व राज्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. झालेली घटना अत्यंत निंदनीय व नृशंस अशी आहे, अशा कठीण प्रसंगी सर्वांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
नुपूर शर्मा यांच्या प्रेषित पैगंबर यांच्यावर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचे कन्हैय्या लाल यांनी सोशल मीडियावर समर्थन केले होते. या समर्थनानंतर त्यांना धमक्या मिळत होत्या. त्यानंतर कन्हैया लाल पोलिसांमध्ये गेले होते पण पोलिसांनी त्या संदर्भात खबरदारीची पावले उचलली नाहीत.
मंगळवारी मोहम्मद रियाज अत्तारी व घौस मोहम्मद हे कन्हैय्या लाल यांच्या शहरातील मालदास रस्त्यावरील धान मंडी भागातल्या दुकानात गेले. त्यांनी आपल्या शर्टाची काही मापेही घेतली. मापे घेत असताना रियाज याने कन्हैय्या लाल यांच्या मागून गळ्याला धारदार सुरा लावला व त्यांना ठार मारले. या घटनेचे मोबाइल कॅमेऱ्याने व्हीडिओ चित्रण करण्यात आले. हा व्हीडिओ नंतर व्हायरल झाला. या व्हीडिओ नंतर अन्य एका व्हीडिओत या दोघांनी नरेंद्र मोदी यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तूने आग जलाया हैं, हम बुझाएंगे’ अशी धमकी या दोघांनी या व्हीडिओतून दिली आहे.
मूळ वृत्त
COMMENTS