संगणकानां सर्व्हरोऽहम्

संगणकानां सर्व्हरोऽहम्

केवळ संगणकच नव्हे, तर संगणक-क्रांतीच्या विविध टप्प्यात तयार झालेल्या प्रिंटर, स्कॅनर, किंडल, आयपॉड, गेम-कन्सोल आणि अखेर सर्वात तरुण अपत्य असलेला स्मार्टफोन या साऱ्या उपकरणांना जोडणारा दुवा म्हणून या सर्व्हरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर टेलिफोन कंपन्या, डिशसारख्या उपकरणामार्फत दृश्य माध्यम-सेवा देणाऱ्या कंपन्या आपापल्या व्यावसायिक सेवा ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी याच्यावरच अवलंबून असतात.

’अ‍ॅप’ले आपण!
संगणकाचा ‘गृहप्रवेश’
संगणकाचे नट आणि बोल्ट्स

वैयक्तिक वापराच्या संगणकांनी दस्तनिर्मिती, दृक्-श्राव्य मनोरंजन या वैयक्तिक पातळीवरील कामांना सुकर केल्यानंतर पुढचा टप्पा होता श्रमविभागणीचा. ज्याप्रमाणे यंत्रयुगात एखाद्या मोठ्या वस्तूच्या अथवा उपकरणांचे छोटे छोटे भाग स्वतंत्रपणे – कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित करून नंतर त्यांच्या एकत्रीकरणातून मोठे यंत्र अथवा उपकरण तयार केले जाते. त्याच धर्तीवर सामान्यांच्या आयुष्यातील अनेक कामेही अशा श्रमविभागणीच्या तत्त्वावर चालतात. उदाहरणार्थ, उत्पादन तयार झाल्यापासून ते ग्राहकाच्या वापरापर्यंत ते उत्पादक, ठोक विक्रेता, छोटा विक्रेता, या खेरीज वाहतूक आणि वितरण व्यवस्था यातून जात असते. त्याचप्रमाणॆ संगणकावरील मोठ्या व्याप्तीचे कामही कमी व्याप्तीच्या, एकाहून अधिक कामांमध्ये विभागणी करून विविध व्यक्तींकडून करवून घेतली जातात. याशिवाय कायदेशीर दस्तांच्या निर्मितीसारख्या क्षेत्रात अथवा कार्यालयीन कामकाजामध्ये अधिकाराची उतरंड असल्याने एकच काम विविध व्यक्तींच्या हाताखालून अथवा नजरेखालून जाणे आवश्यक असते.

या दोन कारणांमुळे एका व्यक्तीने केलेले काम दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता भासते. अशा कामाचे, माहितीचे हस्तांतरण सुरुवातीच्या काळात चुंबकीय (magnetic) टेप्स, फ्लॉपी डिस्कस् यासारख्या माध्यमांतून एका व्यक्तीच्या संगणकावरून दुसऱ्या व्यक्तीच्या संगणकावर न्यावे लागे. ही प्रक्रिया वेळखाऊ तर होतीच शिवाय त्या माध्यमांच्या मर्यादांमुळे अनेकदा त्रासदायकही होत असे. या खेरीज ही माहिती त्या दोन संगणकांशिवाय अन्य तिसऱ्या माध्यमात उपलब्ध झाल्याने, आणि ते माध्यम सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत असल्याने, अन्य तिसऱ्या संगणकावरही सहज नेता येत असे. एका बाजूने हा फायदा असला तरी यातून अनाधिकाराने ही माहिती हस्तांतरित होण्याचा धोका होता. विशेषत: संरक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रात जिथे माहितीची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते, तिथे हा प्रकार धोकादायक ठरत होता. त्यामुळे या मध्यस्थांना नाकारून एका संगणकावरुन सरळ दुसऱ्या संगणकावर ही माहिती पाठवण्याची सोय ५०च्या दशकात अमेरिकेच्या संरक्षण विभागातच सर्वप्रथम करण्यात आली.

ज्याप्रमाणे टेलिफोनवर बोलताना दोनही व्यक्तींचे टेलिफोन संच हे एका वायरने जोडलेले असतात, त्याच धर्तीवर दोन संगणक परस्परांशी एका केबलने जोडले जात. त्यातून माहितीचे वहन करणे शक्य झाले. परंतु हे साध्य झाल्यावर एका संगणकावरचे सारे काही दुसऱ्या संगणकावरून पाहता येणेही अनावश्यक, अनेकदा अनधिकाराचे असे. त्यामुळे जरी दोन संगणक परस्परांना जोडले तरी एकमेकांच्या माहिती-साठवणुकीचा कोणता हिस्सा दुसऱ्याला पाहता येईल, प्रत करून नेता येईल यावर मर्यादा आवश्यक होती. यातून ‘शेअरिंग’ची संकल्पना निर्माण झाली. एका संगणकाच्या साठवलेल्या माहितीचा विशिष्ट हिस्सा हा आपल्या ‘शेजाऱ्या’शी शेअर करण्याचा म्हणून नोंदवला जाई. दुसऱ्या संगणकाला केवळ तेवढाच हिस्सा वापरता येई, पहिल्या संगणकावरील उरलेली माहिती त्याला उपलब्ध होत नसे. वैयक्तिक वापराच्या संगणकांमधील सहकारा’ची ही सुरुवात होती.

परंतु एकच दस्त अथवा माहिती, आणि एकाहून अधिक भागधारक आले की हक्कांचा गोंधळ ओघाने आलाच. एकाहून अधिक प्रती ठेवाव्यात तर एकाच वेळी दोन संगणकांवर दोन प्रतींमध्ये वेगवेगळे बदल केल्याने  कोणती अंतिम मानायची हा प्रश्न निर्माण होतो. किंवा याला पर्याय म्हणजे दोन्हीकडचे बदल पुरे झाले की दोन्ही बदल सामावून घेणारी अशी तिसरी प्रत (दोनपैकी एकीलाच ही भूमिका वठवणेही शक्य आहे.) तयार करणे. परंतु त्यामुळे एका ठिकाणी केलेले बदल दुसऱ्या प्रतीमध्ये पुन्हा नव्याने समाविष्ट करावे लागल्याने स्वतंत्रपणे काम करण्याचा मूळ हेतू साध्य होत नाहीच. त्यामुळे सीडी अथवा वाचनमात्र केलेल्या ई-बुक प्रमाणे एकाच ठिकाणी बदल करण्याची मुभा ठेवावी नि अन्य संगणकांवरून केवळ वापर शक्य केला जावा हा एक पर्याय होता. पण त्यामुळे पुन्हा मूळ हेतूलाच बाध येत होता.

दुसरा पर्याय म्हणजे एका संगणकावर बदल करण्यास सुरुवात केली की आपोआपच दुसऱ्या संगणकावर त्याची प्रत ‘तात्पुरती वाचनमात्र’ करणे. हा दुसरा पर्याय जास्त किचकट होता. कारण त्या क्षणी दुसरा संगणक बंद स्थितीत असेल नि नंतर चालू केला तर त्याला ही ‘वाचनमात्र’ आज्ञा योग्य वेळेत मिळणे शक्य नाही. शिवाय पहिल्याचे बदल पुरे झाले की ते बदल आपोआप दुसऱ्या संगणकावरील प्रतीमध्ये होऊन तिची स्थिती वाचनमात्र पासून बदलास योग्य व्हायला हवी. या साऱ्या क्रियांचे नियंत्रण दोनपैकी कोणत्या संगणकाने करायचे हा प्रश्नही होताच. तिसरा पर्याय म्हणजे मूळ प्रत दोन पैकी एकाच ठिकाणी ठेवून दोनही संगणकांनी तिथेच आपले बदल करावेत हा. हा तुलनेने सोपा होता कारण यात एकाहून अधिक प्रती तयार होण्याचा गोंधळ टळतो. पण यात ज्या संगणकावर ही प्रत आहे तो संगणक कायम चालू स्थितीत राखण्याची आवश्यकता भासते. किंवा हा संगणक काही कारणाने नादुरुस्त झाला तर काम ठप्प होते.

अशा परस्पर-संलग्न संगणकांमुळे दस्तनिर्मिती आणि दृक्-श्राव्य माहितीची देवाणघेवाण सुलभ झाली असली तरी गणिती कार्य मात्र बव्हंशी वैयक्तिकच राहिले, याचे कारण ते कार्य प्रामुख्याने स्मरणशक्ती अथवा साठवणुकीशी निगडित न राहता संगणकाच्या विश्लेषक क्षमतेशी जोडलेले होते. दोन संगणकांच्या विश्लेषक क्षमतांनाही जोडून घेण्यास आणखी काही दशकांचा कालावधी जावा लागला. आजही याचा वापर अत्यंत मर्यादित स्वरूपातच होतो. याचे एक कारण म्हणजे एकूणातच माणसामध्ये असलेली एक-नियंत्रक व्यवस्थेची आस!  अनेक संगणकांची विश्लेषक क्षमता जोडून मोठ्या क्षमतेचे, व्याप्तीचे कार्य करण्यापेक्षा ते कार्य सिद्ध करू शकेल या क्षमतेचा एकच संगणक करण्याकडे माणसाचा अधिक कल राहिला आहे. त्यामुळे ही सामूहिक वापराची सारी माहिती एकाच संगणकावर ठेवून, त्याला वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध न ठेवता केवळ ‘साठवण’ करणाऱ्या भूमिकेत राखून ठेवण्याचा पर्याय निवडला गेला. हा संगणक आता परस्परांशी जोडलेल्या संगणकांमध्ये ‘माध्यमा’चे काम करू लागला.

एका संगणकावरून एखाद्या दस्तामध्ये बदल करणे सुरू झाले, की त्या दस्ताला अन्य संगणकांसाठी ‘वाचनमात्र’ करणे, त्या दस्तांमध्ये विविध संगणकांवरून झालेल्या बदलांची कालानुक्रमे आणि वापरकर्त्यानुसार जंत्री ठेवणे त्याला शक्य झाले. त्यामुळे केवळ अंतिम प्रतच नव्हे तर बदलांच्या एखाद्या मधल्या टप्प्यावरील प्रतही उपलब्ध करून देणे त्याला शक्य होऊ लागले. हे साध्य करण्यासाठी त्याला केवळ सहाय्यक म्हणून नव्हे तर ‘नियंत्रक’ म्हणूनही काही अधिकार त्याला प्रदान करण्यात आले. यात कोणत्या संगणकाला जाळ्यात जोडून घ्यायचे, कोणत्या वापरकर्त्याला कोणती माहिती उपलब्ध असावी, कोणती नसावी आदि नियंत्रण याच्या हाती सोपवण्यात आले. पुढे हळूहळू निव्वळ माहितीच नव्हे तर संगणकाला आवश्यक असणाऱ्या विविध प्रणालीदेखील केवळ या एका संगणकावर ठेवून आवश्यकतेनुसार अन्य संगणकावरून त्या केवळ वापरण्याचा हक्क देण्यात आला. संगणक प्रणालींचे, माहितीचे केंद्रीकरण होऊ लागले आणि हा केवळ मदतनीस म्हणून आलेला संगणक इतर संगणकांहून अधिक महत्त्वाचा ठरला. सुरुवातीला जाळ्यामध्ये जोडलेल्या सर्व संगणकांना हा विशेष संगणक सेवा पुरवतो, ‘सर्व्हिस’ देतो म्हणून त्याला सर्व्हर असे संबोधले जाऊ लागले.

पुढे केवळ संगणकच नव्हे, तर संगणक-क्रांतीच्या विविध टप्प्यात तयार झालेल्या  प्रिंटर, स्कॅनर, किंडल, आयपॉड, गेम-कन्सोल आणि अखेर सर्वात तरुण अपत्य असलेला स्मार्टफोन या साऱ्या उपकरणांना जोडणारा दुवा म्हणून या सर्व्हरचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. त्याचबरोबर टेलिफोन कंपन्या, डिशसारख्या उपकरणामार्फत दृश्य माध्यम-सेवा देणाऱ्या कंपन्या आपापल्या  व्यावसायिक सेवा ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी याच्यावरच अवलंबून असतात. सुरुवातीला उत्पादन-प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्यात साहाय्य करण्याच्या उद्देशाने आलेल्या ‘मॅनेजर्स’नी सारे नियंत्रण ताब्यात घेऊन उत्पादक काम करणाऱ्यांपेक्षा अधिक अधिकार आणि उत्पन्नाचा वाटा बळकावला, तसे याने साहाय्यक म्हणून संगणक-जाळ्यात प्रवेश करून संगणकानां सर्व्हरोऽहम्*’ अशी दर्पोक्ती करण्यापर्यंत मजल मारली आहे.

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात जसे सहकारी (साखर) कारखान्यांमध्ये सहकाराला मागे सारून ज्याप्रमाणे चेअरमनचे प्रस्थ वाढले त्याचप्रमाणॆ सर्व्हरचे महत्त्व वाढले. काही ठिकाणी तर केवळ एक सर्व्हर आणि त्यांना जोडलेले ‘निर्बुद्ध संगणक’ ( Dumb Terminal ) असे जाळे बनवले जाऊ लागले. यात संगणकांना फक्त पडदा आणि माऊस, की-बोर्ड एवढेच जोडलेले असत. मधला केंद्रीय विश्लेषक यंत्रणेचा (Central Processor Unit) भागच त्यात नव्हता. विश्लेषणाचे, साठवणुकीचे महत्त्वाचे काम सर्व्हरच करत असे. अति-महत्त्वाच्या माहितीच्या क्षेत्रात माहितीच्या एकाहून अधिक प्रती होऊन त्या अधिकार नसलेल्या व्यक्तींपर्यंत पोचू नयेत याची खबरदारी म्हणून असे जाळे काम करत असे. परंतु पुढे आभासी जाळॆ अथवा virtual network ही संकल्पना पुढे आल्यानंतर सर्वसाधारण संगणकाला केवळ सर्व्हरसोबत काम करण्यापुरते ‘तात्पुरते निर्बुद्ध’ बनवण्याची सोय झाली. एरवी त्याला स्वतंत्रपणे काम करणे शक्य झाले. आणि या Dumb Terminal ची उपयुक्तता संपुष्टात आली.

सर्व्हर आणि त्याला जोडलेल्या संगणकांच्या जाळ्याला ‘संगणक-जाळे’ (netowrk) म्हटले जाऊ लागले. केवळ परस्परांसोबत आणि एकाच ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींच्या संगणकांच्या जुळणीतून हे जाळे तयार झाले. पण ज्याप्रमाणे टेलिफोन सेवा ज्याप्रमाणे व्यापक जाळ्याच्या माध्यमातून आणि केबल जुळणीतून भौगोलिक सीमा पार करून गेली त्याच धर्तीवर या स्थानिक संगणक-जाळ्यांना परस्पर जोडणारे असे व्यापक जाळे पुढे निर्माण करण्यात आले. ज्याला इंटरनेट (internet) म्हटले जाऊ लागले. या जाळ्यामार्फत माहितीचे वहन केवळ एका कार्यालयापुरते, कायम सोबत काम करणाऱ्यांपुरते मर्यादित न राहता, केवळ तात्कालिक देवाणघेवाण करणाऱ्या जगभरातील कोणत्याही संगणकांपर्यंत विस्तारले. या व्यापक जाळ्याने माणसाच्या आयुष्यात संपूर्ण उलथापालथ घडवली. माणसाचे वैयक्तिक, सामाजिक आयुष्य, विविध सामाजिक व्यवहार, व्यवसाय, गुंतवणुकीपासून, उत्पादक, वितरण, विपणन यांचे आयाम संपूर्णपणे बदलून टाकले. चलनांची व्याख्या बदलली, व्यापाराच्या नव्या खिडक्या उघडून दिल्या, व्यवहारांचा वेग कल्पनातीत वाढवला. एक प्रकारे काळाची गतीच अनेक पटीने वाढवली आहे.
………..

मासानां मार्गशीर्षोऽहम् , ऋतूनां कुसुमाकर: ॥ ३५ ॥  (भगवद्गीता, दशम अध्याय – विभूतियोग)
यातील ’मासानां मार्गशीर्षोऽहम्’च्या चालीवर.

डॉ. मंदार काळेसंख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0