‘स्वातंत्र्याचे भय’

‘स्वातंत्र्याचे भय’

स्वातंत्र्याचे भय वाटून त्याकडे पाठ फिरविण्याचे असे कित्येक मार्ग असू शकतात. एरिख फ्रॉम अशा मार्गांना ‘पलायनाच्या यंत्रणा' असे संबोधतात. भूतकाळात पलायनाच्या अशा यंत्रणा केवळ धर्म या एका गोष्टीपुरत्या मर्यादित होत्या. आधुनिक काळात मात्र अशा यंत्रणा विपुल प्रमाणावर आढळून येतात. भ्रष्ट आणि अनैतिक नेत्यांचे समर्थक, ढोंगी आणि बलात्कारी बाबांचे भक्त, दहशतीला खतपाणी पुरवणाऱ्या तथाकथित धार्मिक संस्थांचे सदस्य, मूलतत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ही व्यक्तीचे झुंडीत रूपांतर झालेल्या प्रक्रियांची उदाहरणे आहेत.

सार्वजनिक कंपन्यांचे पीएम केअरला २,१०५ कोटी दान
पवारांच्या घरावरील हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध
४ कोटींनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ

‘अनेकदा लढाया होऊनही, स्वातंत्र्याने लढाया जिंकल्या आहेत. स्वातंत्र्याविना जगण्यापेक्षा जुलुमाविरुद्ध झुंज देत असताना मरणे हे अधिक चांगले, अशा दृढ विश्वासातून अनेक जण त्या लढायांत मृत्युमुखी पडले. अशा प्रकारचा मृत्यू ही त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची अत्यंत स्पष्ट घोषणा होती. इतिहास जणू सिद्ध करत होता, की स्वतःचे राज्य करणे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे आणि स्वतःला योग्य वाटेल तसा विचार करणे व अनुभव घेणे, हे मानवाला शक्य आहे. मानवाने निसर्गाचे वर्चस्व झुगारले होते आणि स्वतःला त्याचा स्वामी बनवले होते. त्याने चर्चचे वर्चस्व झुगारले होते आणि सर्वंकष राज्याचेही वर्चस्व झुगारले होते. व्यक्तिस्वातंत्र्याचे उराशी बाळगलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी बाह्य वर्चस्वाचा नाश, ही केवळ आवश्यकच नव्हे, तर पुरेशी अट आहे, असे वाटत होते.’ (१)

वरील परिच्छेद प्रख्यात जर्मन विचारवंत ‘एरिख फ्रॉम’ यांच्या ‘Fear of freedom’ अर्थात ‘स्वातंत्र्याचे भय’ या ग्रंथातील पहिल्याच प्रकरणात आला आहे. मानवजातीचा एकूण सामाजिक इतिहास पाहिला, तर तो मानवाने स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास आहे; हे लक्षात येते. अगदी भारताकडे वळायचे तर, इंग्रजी सत्तेविरूद्ध भारतीयांनी दिलेला लढा, जातवर्चस्वातून मुक्तता मिळावी यासाठी दलित समाजाने केलेला संघर्ष ही उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

एखादा विशिष्ट जनसमूह आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान व्यक्त करतो, तेव्हाही तो त्याच्या पूर्वसूरींनी स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी दिलेला लढा आणि त्यासाठी त्यांनी चुकवलेले मोल याचाच अभिमान व्यक्त करत असतो. एरिख फ्रॉम यांच्या चष्म्यातून भूतकालीन जगाकडे पाहताना, मानवी जीवनातील स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे स्थान ध्यानात येते.

मात्र त्याच चष्म्यातून समकालीन जगाकडे पाहताना, आपल्या नजीकच्या भवतालाकडे निकोप दृष्टीने पाहताना, हे चित्र अनेक स्तरांवर मोठ्या प्रमाणावर बदललेले दिसते. समाजातील मोठा वर्ग स्वातंत्र्याच्या उर्मीने पेटून उठण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला तिलांजली देत एकाधिकारशाहीपुढे मान तुकवताना दिसतो. अनेक लढाया आणि संघर्षातून प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यामुळे, व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे अविष्करण करण्यास सर्वाधिक पोषक असा काळ २१व्या शतकाच्या आरंभी निर्माण झाला. सर्वसामान्य माणसाला प्रथमच मूठभर लोकांच्या अंकित असलेल्या माध्यमांत प्रवेश मिळू लागला. समाज माध्यमांसारख्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःची मते, विचार मांडण्याची आणि टीकेचे प्रभावी अस्त्र उगारण्याची संधी प्राप्त झाली. याच माध्यमांनी व्यापक जनसमूहाशी थोड्या अवधीत जोडून घेण्याची मुभा त्याला बहाल केली. अनेक शतके ज्या स्वातंत्रासाठी मानवी समाजाने मोठी किंमत चुकवत त्याची प्राप्ती करून घेतली, ते स्वातंत्र्य पूर्ण दृष्टीक्षेपात आले, त्याचा खरा उपभोग घेण्यासारखी स्थिती निर्माण झाली.

मात्र नेमक्या याच काळात असे न होता, मानवात स्वातंत्र्याचे भय बाळगण्याची, त्यापासून पलायन करण्याची आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी  आश्रय शोधण्याची घातक प्रवृत्ती बळावलेली दिसून येत आहे.

आज देश अनेक गंभीर समस्यांमधून जात आहे. बेरोजगारीचा आलेख सतत वरच्या दिशेने वाढत आहे. आर्थिक मंदी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून हजारोंच्या संख्येने नोकरवर्गात कपात होत आहे. अशा स्थितीत कुठल्याही सुजाण तरुणाचे लक्ष्य आपले भवितव्य सुरक्षित करण्याचे असायला हवे; हे उघड आहे. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने निश्चित आणि ठोस पावले उचलायला हवीत, यांकडे तरूण वर्गाने सरकारचे लक्ष वेधायला हवे. जगात सर्वाधिक युवावर्ग असणाऱ्या देशाकडून यांवर तीव्र चिंता व्यक्त होणे, त्यावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे. कारण या समस्या आपल्या जगातील आहेत. तुम्ही, मी आणि आपण सारे ज्या सामायिक जगाचा भाग आहोत, त्या जगातील या समस्या आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर पडू शकतो.

मात्र देशातील मोठा युवावर्ग या समस्या कुणा दुसऱ्या ग्रहावरील असाव्यात अशा रीतीने एका निराळ्याच कल्पित समांतर विश्वातल्या समस्यांमुळे अस्वस्थ झाला आहे. हे समांतर विश्व मोठे रंजक आहे. या विश्वात देशातील सर्वात बहुसंख्येने असलेला धर्म धोक्यात आला आहे. अल्पसंख्य लोकांना या देशाविषयी ममत्व वाटेनासे झाले आहे. एक विशिष्ट नारा देण्यास लोक आक्षेप घेत आहेत. भूतकाळातील मोठ्या नेत्यांनी मोठ्याच घोडचूका केल्या आहेत, ज्यांची फळे आज आपल्याला भोगावी लागत आहेत. आजच्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारीची कारणे सहा दशकांपूर्वीच्या पंतप्रधानांच्या धोरणांत आहेत. केवळ हास्यास्पद वाटू शकतील अशा कृत्रिम समस्यांची निर्मिती करून या वर्गाने वास्तवाकडे पाठ फिरवली आहे.

आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील खऱ्याखुऱ्या समस्यांकडे पाठ फिरवून हा वर्ग कल्पित अशा समांतर विश्वात का रमत असावा? व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तित्वाची ओळख म्हणजे त्याच्या मुक्त आणि विवेकी विचारांचा पाया असतो; त्याला तिलांजली देऊन आपले विचार आणि मते यांसाठी हा वर्ग एखादा राजकीय नेता अथवा धर्मगुरू यांवर का विसंबून राहत असावा? आपल्या वैचारिक स्वातंत्र्याचा इतक्या सहजपणे त्याग करायला कसा तयार होत असावा? या प्रश्नांची उत्तरे ‘एरिख फ्रॉम’ यांच्या एकल आणि समूहमनाच्या  मनोविश्लेषणातून शोधता येतील.

व्यक्तीने स्वतःच्या स्वतंत्र आणि विवेकी विचारांचा अवलंब करणे याचा अर्थ त्या विचारांची जबाबदारी घेणे, परिणामी त्यातून सूचित होणाऱ्या उत्पादक कार्याची जबाबदारी स्वीकारणे, त्याला अनुरून कृती करणे, सभोवतालचा बहुसंख्य जनसमूह विरोधी विचारांचा असेल तर त्या साऱ्यांपासून अलग पडणे, त्यातून आलेल्या एकटेपणाला सामोरे जाणे असा आहे. या भलत्याच कठीण मार्गाकडे पाठ फिरवून अशा जोखमा नसलेला मार्ग स्वीकारणे अगदीच शक्य आहे. राजकीय नेते आणि धर्मगुरू यांना समर्पित झालेल्या वर्गाने स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग सोयीस्कररित्या टाळून त्याहून सोप्या आणि सुरक्षित मार्गाचा अवलंब केला आहे.

यांत व्यक्तीच्या स्वातंत्र्याला फारसे स्थान नसते. उलट स्वातंत्र्यापासून चार हात दूर राहून, स्वतःचे व्यक्तित्व आणि वैचारिक स्वातंत्र्य यांना विशिष्ट पक्ष, राजकीय नेते अथवा धर्मगुरू यांना समर्पित करून त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याखाली आश्रय घेता येतो. एकदा असे झाले की, व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तित्वाला आणि विचारांना महत्त्व उरत नाही. परिणामी त्यांची नैतिक जबाबदारी त्या व्यक्तीवर येत नाही. या प्रक्रियेत व्यक्तीचे समूहापासून अलग असे व्यक्तित्व उरत नाही. त्यामुळे एकटेपण वाट्याला येण्याचाही प्रश्न नाही. एका सुरक्षित आणि जबाबदारी नसलेल्या समूहांत व्यक्तीचे रूपांतर झाले, की ज्याचा अधिकार मान्य केला आहे, त्यांचे विचार आणि कृती हेच व्यक्तीच्या कृतींना नियंत्रित करू लागतात. समूहाची खास स्वतःची अशी विचारधारा निर्माण होते. जे कार्य एक व्यक्ती स्वतंत्ररित्या कधीही करू शकणार नाही, असे कार्य तो समूहाचा भाग बनून बिनदिक्कत करू शकतो. कारण त्याची जबाबदारी व्यक्तीने न घेता समूहाने घ्यायची असते. आणि समूहाला कुठलाच चेहरा नसल्याने अशी जबाबदारी कुणावरच येत नाही. झुंडीने केलेली ती कृती असते.

प्राप्त स्वातंत्र्याचे भय वाटून त्याकडे पाठ फिरविण्याचे असे कित्येक मार्ग असू शकतात. एरिख फ्रॉम अशा मार्गांना ‘पलायनाच्या यंत्रणा’ असे संबोधतात. भूतकाळात पलायनाच्या अशा यंत्रणा केवळ धर्म या एका गोष्टीपुरत्या मर्यादित होत्या. आधुनिक काळात मात्र अशा यंत्रणा विपुल प्रमाणावर आढळून येतात. भ्रष्ट आणि अनैतिक नेत्यांचे समर्थक, ढोंगी आणि बलात्कारी बाबांचे भक्त, दहशतीला खतपाणी पुरवणाऱ्या तथाकथित धार्मिक संस्थांचे सदस्य, मूलतत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ही व्यक्तीचे झुंडीत रूपांतर झालेल्या प्रक्रियांची उदाहरणे आहेत.

व्यक्तीचे स्वातंत्र्यापासून पलायन करून झुंडीत रूपांतर होणे किती धोकादायक रूप धारण करू शकते, ते वेगळे सांगायला नको. झुंडीच्या हिंसेचे आपण आता कायमचे साक्षीदार झालो आहोत.

तथापि एरिख फ्रॉम सांगतात तसे, स्वातंत्र्यामुळे येणारे एकटेपण टाळण्याचा समर्पण हा एकमेव मार्ग नव्हे, हे समजून घ्यायला हवे. याहून निराळा असाही एक मार्ग आहे. तो मार्ग सर्जनशील आहे. आणि विधायक आहे. स्वतःच्या व्यक्तित्वाचा विनाश न करता तिला जगाशी जोडणारा असा हा मार्ग आहे. तो मार्ग आहे, मानव आणि निसर्ग यांच्याशी उत्स्फूर्त नाते जोडण्याचा. प्रेम आणि उत्पादक कार्य हे या नात्याचे सर्वोच्च आविष्कार आहेत. असे नाते व्यक्तीला त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मुभा तर देतेच, त्याबरोबरच जीवनभर पुरेल असे प्रेमाने जोडलेले नाते बहाल करते.

स्वातंत्र्याचे भय आणि पलायनाच्या यंत्रणांचे ‘एरिख फ्रॉम’ यांनी केलेले विवेचन आजच्या काळाला लागू करून पाहिले की, समोर येणाऱ्या भयावह परिस्थितीला कसे सामोरे जायचे हा प्रश्न निर्माण होतो. ‘एरिख फ्रॉम’ यांनी त्यांच्या ‘To have or to be’ आणि ‘The art of loving’ या ग्रंथांत यांवर केलेले भाष्य मुळातून वाचण्यासारखे आहे. ते आत्मसात करण्याची गरज तर कधी नव्हे तेवढी आज निर्माण झाली आहे.

अवतरण (१)- भाषांतर- आ. ह. साळुंखे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0