२ ऑक्टोबरपासून काँग्रेसची ‘भारत-जोडो’ यात्रा

२ ऑक्टोबरपासून काँग्रेसची ‘भारत-जोडो’ यात्रा

उदयपूरः भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या योगदानाचे व नेहरु, पटेल व अन्य काँग्रेस नेत्यांच्या त्यागाचे स्मरण करत येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जय

डोईजड झाल्याने किरण बेदींची हकालपट्टी
कमलनाथ सरकारचे भवितव्य २६ मार्चला
राजस्थानः बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा

उदयपूरः भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या योगदानाचे व नेहरु, पटेल व अन्य काँग्रेस नेत्यांच्या त्यागाचे स्मरण करत येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी भारत जोडो मोहिमेची घोषणा काँग्रेसने केली. उदयपूर येथे तीन दिवसीय चिंतन शिबिराचा रविवार अखेरचा दिवस होता. या वेळी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य अजय माकन यांनी भारत जोडो यात्रा गांधी जयंतीच्या दिवशी सुरू होईल अशी घोषणा केली. ८० वर्षांपूर्वी १९४२ साली म. गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता. आता २०२२ साल सुरू असून देशाला जोडण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसला पाच राज्यांत पराभवाचा फटका बसल्यानंतर चिंतन शिबिर घ्यावे अशी सूचना माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडली होती. पाच राज्यात पराभव झाल्यानंतर गांधी घराण्याच्या नेतृत्वावरही पक्षातील असंतुष्टांनी प्रश्न उपस्थित केले होते. काही असंतुष्टांनी पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात अशीही मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत चिंतन शिबिर घेऊन काँग्रेसमधील दोषांवर चर्चा व्हावी अशी राहुल गांधी यांनी इच्छा प्रकट केली होती. त्यामुळे हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या चिंतन शिबिरात कपिल सिबल सोडून अन्य असंतुष्ट नेत्यांच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन करून पक्षसंरचना, पक्षबांधणी, विधायक कार्यक्रम यावर चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. मनिष तिवारी, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर हुडा यांनी या समित्यांचे अध्यक्षपद सांभाळलं.

शिबिराच्या अखेरीस पक्षाच्या कार्यक्रमात एक कुटुंब, एक व्यक्ती अशी संकल्पना मान्य करण्यात आली. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला तिकिट द्यावे हा प्रस्ताव अनेक पदाधिकाऱ्यांचा होता. पक्षांतर्गत निवडणुका होऊन प्रत्येक जातींना प्रतिनिधित्व मिळाले असाही प्रवाह मांडण्यात आला. त्यानुसार पक्षांतर्गत समितींवर ५० टक्के पदे अनु.जाती,जमाती-मागासवर्गीय, अल्पसंख्याक समुदायासाठी राखीव ठेवण्यावरही सहमती झाली. विविध प्रश्नांसंबंधी जनतेकडून मते, सूचना अजमावणे, त्यावर काम करणे यावरही सहमती झाली. पक्षाने वाटून दिलेल्या कामाच्या यश-अपशयाची जबाबदारी संबंधित नेतृत्वाने स्वीकारणे या मुद्द्यावरही बरेच मंथन झाले.

पक्षाने वैचारिक कोणती भूमिका घ्यावी, लहान पक्षांसोबत युती करताना, त्यांच्याशी समन्वय साधताना कोणत्या बाबींवर भर द्यावा हा मुद्दा चिंतन शिबिरात महत्त्वाचा होता.

भूपेश बघेल, कमल नाथ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या हिंदू मतांमध्ये फूट पाडावी लागेल पण हे करत असताना बहुसंख्याकांना धार्जिणी भूमिका घेऊ नये असेही मत मांडले. दक्षिणेतील नेत्यांनी काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा रस्ता सोडू नये अशी भूमिका मांडली. भाजपच्या कट्टर हिंदुत्वाचा मुकाबला करायचा असेल तर पक्षाला धर्मनिरपेक्षता मूल्यावर आपले राजकारण अधिक ताकदीने उभे करावे लागे असे या दक्षिणेतील नेत्यांचे मत होते.

२०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसने छोटे व प्रादेशिक पक्षांशी आघाडी करावी का, या विषयावरही शिबिरात मंथन झाले. अनेक पदाधिकाऱ्यांच्या मते काँग्रेसने स्वतःचा निवडणुकांना सामोरे जावे अशी भूमिका मांडली. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने द वायरशी बोलताना प्रत्येक राज्यातील परिस्थिती पाहून तेथील छोटे व प्रादेशिक पक्षांशी आघाडी करता येईल का, याची माहिती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाणार असल्याचे सांगितले.

काँग्रेसच्या उदयपूर जाहीरनाम्यात छोटे व प्रादेशिक पक्षांसोबतच्या आघाड्यांसंदर्भात स्पष्ट असे उल्लेख नाहीत पण सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भाषणात भाजपविरोधात विचारसरणीचे युद्ध असल्याचे उल्लेख आहेत. पक्ष मवाळ हिंदुत्वाला स्वीकारेल असेही वाटत आहे. पण बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की भाजपला हरवण्यासाठी पक्षाला तळागाळात जाऊन लोकांशी संपर्क साधावा लागेल. त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. राहुल गांधी यांनीही जनसंपर्क वाढवायला हवा असे स्पष्ट केले. ज्या घटकांपर्यंत आजपर्यंत पोहचता आलेले नाही, त्याच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

एकूणात उदयपूर येथील मंथनातून जे काही मतप्रवाह, सूचना पुढे आल्या आहेत, त्या बद्दल काँग्रेसला आग्रही राहावे लागेल. या आधी पंचमढी (१९९८) व सिमला (२००३)मध्ये पक्षाची चिंतन शिबिरे झाली होती, त्या शिबिरातल्या सूचना व कार्यक्रम हा कागदावरच राहिला. पक्षकार्यकर्त्यांना काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी कार्यक्रम देण्याची गरज आहे. हे आव्हान काँग्रेसपुढे आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: