नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे रणनीतीकार अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे रणनीतीकार अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोविड-१९ मुळे गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटरवरून दिले.
अहमद पटेल यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व तमाम काँग्रेस कार्यकर्ते व सर्व पक्षाच्या नेत्यांनी शोक प्रकट केला आहे.
सोनिया गांधी यांचे विश्वासू सल्लागार नेमल्यानंतर अहमद पटेल देशाच्या राजकीय क्षितिजावर चर्चेत येत गेले. काँग्रेसच्या पडझ़डीच्या काळात व सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश घेतला त्यानंतर अहमद पटेल हे नाव राजकारणात दिसू लागले. ते काँग्रेस पक्षाचे जननेता नव्हते व अत्यंत व्यामिश्र अशा काँग्रेस पक्षाची व या पक्षाच्या बड्या नेत्यांची ते नस ओळखून होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे रणनीतीकार म्हणून त्यांनी पडद्याआडून अनेक राजकीय खेळ्या खेळल्या होत्या. यूपीए सरकार सत्तेत असताना अनेक राजकीयदृष्ट्या कठीण पेचप्रसंगातून त्यांनी काँग्रेसला वाचवले होते. त्यांच्या राजकीय चातुर्यामुळे ते सोनिया गांधी यांचे कायमचे विश्वासू सल्लागार म्हणून दोन दशके कार्यरत राहिले. सत्तेच्या जवळ असूनही पटेल यांनी स्वतःकडे मात्र कोणतेही प्रभावशाली पद घेतले नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होऊन राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली तरी सोनिया गांधी यांचे ते राजकीय सल्लागार म्हणून कायम होते. काँग्रेस वर्तुळात ते सोनिया निष्ठ समजले जात असतं. त्यामुळे त्यांच्या निधनाने आपण एक विश्वासू सहकारी व मित्र गमावला अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली आहे.
२००४मध्ये यूपीए स्थापन करण्यामागे सोनिया गांधी पुढाकार घेतला होता आणि हा प्रयोग सफल झाला तो अहमद पटेल यांच्या पडद्यामागील रणनीतीमुळे. पटेल यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी घनिष्ठ व मैत्रीचे संबंध होते. ते कठीण प्रसंगात कोणत्याही विरोधी पक्षाशी थेट संबंध साधू शकत होते.
पटेल यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी अहमद पटेल ही व्यक्ती काँग्रेस पक्षाची खांब होती. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, ही व्यक्ती काँग्रेस पक्षाची संपत्ती होती, अशा शब्दांत संवेदना व्यक्त केली.
COMMENTS