उ. प्रदेशात काँग्रेस ४० टक्के तिकिटे महिलांना देणार

उ. प्रदेशात काँग्रेस ४० टक्के तिकिटे महिलांना देणार

लखनौः आगामी उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांत काँग्रेसकडून ४० टक्के उमेदवार या महिला असतील अशी घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मंगळवारी केली. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने काँग्रेसचे हे पाऊल असून उ. प्रदेशातील महिलांना आपल्या राज्यात बदल, परिवर्तन हवे आहे, त्यांना आपले राज्य प्रगतीपथावर जावे असे वाटत असल्याने काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रियंका गांधी यांची ही घोषणा काँग्रेसच्या प्रचाराची सुरूवात असल्याचे मानले जात आहे. कार्यकर्त्यांनी परिवर्तनाच्या कार्यास सुरूवात करावी, आता थांबू नये, राज्यात परिवर्तन अटळ आहे, असे त्या म्हणाल्या.

रविवारी काँग्रेसचे निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख पी. एल. पुनिया यांनी प्रियंका गांधी या उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा चेहरा असतील असे जाहीर केले होते. काँग्रेस कधीतरी मुख्यमंत्रीपदाचा आपला चेहरा जाहीर करत असते. प्रियंका गांधी यांची राज्यातील लोकप्रियता, त्यांचा वाढता जनसंपर्क व भाजपच्या राजकारणाविरोधात त्यांचा सुरू असलेला संघर्ष सर्वांना माहीत असल्याचे पुनिया यांनी स्पष्ट केले.

उ. प्रदेशात सत्ताधारी भाजपव्यतिरिक्त काँग्रेसचा मुकाबला समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी या दोन बड्या पक्षांशीही आहे. काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्या माध्यमातून उ. प्रदेशात आपले पुनरुज्जीवन करायचे आहे.

COMMENTS