नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथीचे देशावरचे गंभीर संकट पाहता काँग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. सध्या
नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथीचे देशावरचे गंभीर संकट पाहता काँग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम करत आहेत.
काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने आपला निर्णय सर्वसंमतीने घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याचे कोरोना महासाथीचे संकट अत्यंत गंभीर असून आपल्या पक्षाची ऊर्जा वाचवण्यासाठी व कोविड प्रभावित रुग्णांची मदत करण्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याबाबत सर्व सदस्य एकमत झाल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. ही निवडणूक पुढील दोन महिन्यांनंतर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०१९मध्ये लोकसभा निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्ष पदाच्या जागी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत अध्यक्षपदी सोनिया गांधी राहतील असा निर्णय अखेर काँग्रेसला घ्यावा लागला होता.
पराभवाची मीमांसा करण्यासाठी समितीची स्थापना
नुकत्याच झालेल्या ४ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील पक्षाच्या दारुण कामगिरीची मीमांसा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत समिती नेमण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. सोमवारी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कामगिरीबद्दल चिंता प्रकट करत काँग्रेसला आंतरिक सुधारणा कराव्या लागणार असे स्पष्ट केले. ही समिती पराभवाची कारणे शोधून काढेल व तो अहवाल पक्ष कार्यकारिणीला व अध्यक्षांना देणार आहे.
मूळ बातमी
COMMENTS