वाघांच्या प्रजातीमधील लहानशी मांजर जशी माणसाच्या घरचीच होऊन गेली, त्याचप्रमाणे महाकाय संगणकांच्या पाच पिढ्यांमधून उत्क्रांत झालेली ही प्रजाती आता ‘पाळीव’ झाली आहे.
१९७१ साली इंटेल (Intel) या आजच्या अग्रगण्य मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपनीने पहिला मायक्रोप्रोसेसर (Microprocessor) तयार केला आणि वैयक्तिक संगणकांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण वैयक्तिक वापराच्या अर्वाचीन संगणकांच्या पिढीचा मूळपुरुष म्हणावा असा Xerox Alto हा संगणक १९७४ साली तयार झाला. जरी याचे व्यावसायिक उत्पादन आणि विक्री झाली नसली तरी आजच्या वैयक्तिक संगणकांची बाह्य रचना किंवा Skin and Bones यानेच प्रथम वापरली. आजच्या संगणकाच्या रचनेत असलेला मॉनिटर, मध्यवर्ती कार्य यंत्रणा (C.P.U.) यांच्या सोबत की-बोर्ड आणि मुख्य म्हणजे माऊस ही रचना प्रथम यातच वापरली गेली.
त्यापूर्वी ९ डिसेंबर १९६८ रोजी एका कॉन्फरन्समध्ये अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डग्लस एंजलबार्ट यांनी सुमारे नव्वद मिनिटांच्या एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अर्वाचीन संगणकांच्या विकासातील काही मूलभूत संकल्पनांची मांडणी केली. यात ‘माऊस’ या वैयक्तिक वापराच्या संगणकांचा अविभाज्य भाग असणाऱ्या उपकरणाचा वापर प्रथमच करण्यात आला. (की-बोर्डची संकल्पना टाईपरायटर, टेलेप्रिंटरसारख्या आधीच वापरात असलेल्या उपकरणांमुळे जुनीच होती.) त्याप्रमाणेच एकाहून अधिक खिडक्या (विंडोज)च्या माध्यमातून संगणकाला आज्ञा देण्याची सोय, की-बोर्ड आणि माऊसच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी विकसित केला गेलेली Command Input ची पद्धत, दस्त ऐवज निर्मितीसाठी (आजच्या Microsoft Word किंवा संगणकावरील सोप्या Notepad सारखा) वर्ड प्रोसेसर, एकच दस्तऐवजात एकाहून जास्त संगणकांवर एकाच वेळी बदल करता येतील याची सोय (Dynamic File Linking), मजकुरातील एखादा शब्द वा शब्दसमूहाला अन्य दस्त-ऐवज अथवा मजकुराशी जोडणारी हायपरलिंक (Hyperlink) इतकेच नव्हे तर संगणकामार्फत व्यक्ति-संवादासाठी व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग अशा अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची मांडणी केली. आणि या शक्यतांना प्रात्यक्षिकांची जोड देऊन त्यांचे स्थान पक्के केले. या एकाच प्रात्यक्षिकात इतक्या नव्या नि मूलभूत संकल्पना मांडल्या गेल्या की त्याला पुढे ‘Mother of All Demos’ अथवा प्रात्यक्षिकांची आदिमाता म्हटले जाऊ लागले. हे संपूर्ण प्रात्यक्षिक आता यू-ट्यूबवर इथे पाहता येईल.
पुढे या एंजलबार्ट यांनी झेरॉक्सच्या अॅलन के यांच्यासह ‘ग्राफिक्स यूजर इंटरफेस’ (GUI) ची निर्मिती केली. आज आपले बहुसंख्य वैयक्तिक संगणक मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या Windows नावाच्या संगणकप्रणालीवर काम करतात. त्यातील सर्वाधिक वापरला जाणारी Microsoft Word ही सुविधा पाहिलीत आणि त्याची तुलना त्याच संगणकावरील Notepad या सुविधेशी करुन पाहिलीत तर GUI आणि त्यापूर्वीची ‘Command Input’ पद्धत यातील फरक ढोबळमानाने लक्षात येईल. यापूर्वीच्या संगणकांमध्ये एक एक आज्ञा स्वतंत्रपणॆ आणि निव्वळ अक्षरे नि आकडे यांच्याच स्वरुपात द्यावी लागत असे.
तीच आज्ञा पुन्हा थोड्या फरकाने पुन्हा द्यायची झाल्यास पुन्हा नव्याने टाईप करावी लागे. ‘GUI’ने या मर्यादा दूर केल्या. जुनी आज्ञावली साठवून ठेवून पुन्हा वापरणे, कॉपी-पेस्टची सुविधा अशा काही सुधारणांसह त्याने संगणकाचा वापर बराच सुलभ केला. लगेचच आजची अग्रगण्य कंपनी ‘अॅपल’ने आपल्या ‘लिसा’ संगणकामार्फत या GUIच्या व्यावसायिक वापरास सुरुवात केली.
१९८१ मध्ये या सुधारणांसह झेरॉक्सने आपला पुढचा संगणक पार्क (PARC) तयार केला. यात प्रथम ‘ETHERNET’ कनेक्शनची सुविधा देण्यात आली होती, जिच्यामार्फत असे दोन संगणक परस्परांना जोडून त्यांच्यात माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले. संगणक-जाळ्याची (नेटवर्क) संकल्पना आकाराला येऊ लागली.
झेरॉक्सखेरीज डिजिटल इक्विपमेंट कार्पोरेशन (Digital Equipment Corporation) अथवा DEC ही कंपनी देखील संगणकांचे व्यावसायिक उत्पादन करत होती. आणि संगणकाच्या तंत्रात, वेगामध्ये आणि आकारामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने तिचे प्रयत्न चालू होते. या कंपनीने प्रोग्रामेबल डेटा प्रोसेसर अर्थात PDP या नावाने संगणकांची एक पिढीच निर्माण केली. १९५९ साली यातील पहिला संगणक जेव्हा तयार झाला तेव्हा कम्प्युटर किंवा संगणक हे नाव प्रचलित नव्हते आणि संगणकाचे कामही डेटा-विश्लेषणापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे याला डेटा प्रोसेसर म्हटले गेले. यातील पहिल्या पिढीच्या संगणकामध्ये, म्हणजे PDP -१ मध्ये, प्रथमच टेक्स्ट-एडिटर किंवा डॉक्युमेंट तयार करणाऱ्या प्रणालीचा समावेश करण्यात आला. आता संगणक प्रथमच निव्वळ गणिती कामापलिकडे अन्य उत्पादक कामासाठी वापरता येऊ लागला. गंमत म्हणजे या प्रणालीचे नाव ’Expensive Typewriter’ म्हणजे महाग टाईपरायटर असेच ठेवले होते, जे त्यावेळची संगणकाची किंमत पाहता अगदी सयुक्तिक होते. अर्थात ही प्रणाली टाईपरायटरच्या पातळीवरची प्राथमिक प्रणाली होती. आजच्या अद्ययावत प्रणालीचे स्वरुप येण्यास अजून दोन दशकांचा काळ जावा लागला.
याहून मनोरंजक बाब म्हणजे स्टीव रसेल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्पेस-वॉर नावाचा पहिला व्यावसायिक व्हिडिओ-गेम या संगणकावर उपलब्ध करून दिला. त्याच्या धर्तीवर पुढे अनेक गेम्स पुढे विकसित केले गेले. एका अर्थी या गेमनेही आपली एक परंपरा निर्माण केली आणि संगणकाला गणित, दस्तनिर्मिती यांच्यासोबतच मनोरंजनाचे साधन म्हणून पुढे आणले. पुढे अनेक दशके हा गेम संगणक वापरणाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता आणि रुपडे बदलून नव्या आवृत्त्यांसह वापरला जात राहिला.
या PDP संगणकांच्या पुढच्या पिढ्या अनेक मोठ्या आस्थापनांच्या आर्थिक पाठबळावर विकसित होत गेल्या. पीडीपी-३ या पिढीचा वापर अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’च्या अधिपत्याखालील ‘सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ने रेडार संशोधनासाठी, तर प्रसिद्ध विमान उत्पादक लॉकहीड (पुढे लॉकहीड-मार्टिन) यांनी ‘सीआयए’साठीच बनवलेल्या लॉकहीड ए-१२ या टेहळणी विमानाच्या संशोधनासाठी केला. PDP -४ वा वापर कॅनडामध्ये अणुसंशोधनासाठी केला गेला. PDP -७ मध्ये युनिक्स या प्रसिद्ध संगणक-प्रणालीचा वापर केला गेला. आज ही प्रणाली वैयक्तिक संगणकांमधून जवळजवळ अस्तंगत झालेली असली, तरी Microsoft Windows या आज सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्रणालीच्या पूर्वी तिचाच वापर सर्वत्र केला जात असे. आजही Linux सारखे तिचे भाईबंद वैयक्तिक संगणकावर नसले तरी संगणक-जाळ्याला आवश्यक असणाऱ्या महासंगणकांत तसंच उपकरणांमध्ये वापरले जातात.
माणसाच्या बुद्धीच्या मर्यादेत नसलेल्या गणिती वा अन्य विज्ञानाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किंवा बुद्धीच्या मर्यादेत असणाऱ्या पण प्रचंड वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची आवश्यकता असणाऱ्या कामांचा उरक वाढवण्याच्या उद्देशाने संगणकाची निर्मिती झाली. संगणकाची संपूर्ण क्षमता पणाला लावणारी किचकट आणि व्यापक कामे त्याच्या करून घेणारे वैज्ञानिक आणि ती क्षमता सातत्याने वाढवत त्यांना आणखी मोठी नि व्यापक काम करून घेण्याचे आव्हान किंवा संधी देणारे तंत्रज्ञ यांची स्पर्धा सुरू झाली.
‘मायक्रोप्रोसेसर’च्या शोधामुळे संगणकाच्या मुख्य भागाचा – C.P.U. – चा आकार लक्षणीयरित्या घटला. याचा फायदा घेऊन तंत्रज्ञांनी दोन हातांनी सहज उचलता येईल अशा आकाराचा आणि वजनाचा संगणक तयार केला आणि संगणकाला ‘स्थानबद्धते’मधून मुक्त केले. संगणक-उत्क्रांतीच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा होता. कारण आता हा संगणक हा मूठभर वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांच्या मक्तेदारीतून मोकळा होऊन सर्वसामान्यांच्या वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध झाला .
खऱ्या अर्थाने Personal Computer अथवा P.C. म्हणता येईल असा पहिला संगणक म्हणजे Altair 8800. यात Intel 8080 या मायक्रोप्रोसेसरचा वापर करण्यात आला होता. याचा आकार साधारणपणे आज वापरात असलेल्या विंडो-एसी किंवा खिडकीवर बसवण्यात येणाऱ्या एसीच्या आकाराइतका होता. याला वापरासाठी स्विचेस होते, ज्यांच्या माध्यमातून याला आवश्यक त्या आज्ञा पुरवल्या जात असत. याच संगणकावर सर्वसामान्य माणसांना वापरता येईल अशा BASIC नावाची programing language अथवा आज्ञावली किंवा संगणक-भाषा उपलब्ध करून देण्यात आली. उत्पादक जरी Altair असले तरी ही भाषा उपलब्ध करून देणाऱ्या संशोधकांची नावे होती ‘बिल गेट्स’ आणि पॉल अॅलन, वैयक्तिक वापराच्या ‘विंडोज’ या संगणक-प्रणालीचे आणि मायक्रोसॉफ्ट या दिग्गज व्यावसायिक कंपनीचे संस्थापक. त्यापूर्वी संगणक वापरकर्त्यांना संगणकाला समजेल अशा यांत्रिक भाषेत आज्ञावली लिहावी लागे. हे काम केवळ त्या क्षेत्रातले तज्ज्ञच करू शकत असत.
बोली इंग्रजीनुसार आज्ञा देण्याची सोय करून देणारी Altair BASIC ही सर्वसामान्य माणसाला संगणकाच्या अधिक जवळ घेऊन गेली. आजच्या पी.सी. संगणकांमधे GUI इतका प्रचंड विकसित झाला आहे की सामान्य वैयक्तिक वापरासाठी अशा कोणत्याही भाषा शिकण्याची आवश्यकताही नाहीशी झालेली आहे.
बॅबेजच्या अॅनलिटिकल एंजिनपासून सुरू झालेली संगणकाची पिढी MARK-I, ABC, Colossus, ENIAC, UNIVAC या मार्गाने उत्क्रांत होत माणसाच्या टेबलवर बसेल इतक्या लहान पी.सी.पर्यंत येऊन पोचली आहे.
वाघांच्या प्रजातीमधील लहानशी मांजर जशी माणसाच्या घरचीच होऊन गेली, त्याचप्रमाणे महाकाय संगणकांच्या पाच पिढ्यांमधून उत्क्रांत झालेली ही प्रजाती आता ‘पाळीव’ झाली आहे. माणसाने वाघ-सिहांना ‘मार्जारकुला’चे प्राणी म्हणत घरच्या मांजरालाच कुलप्रमुखाचा मान दिला. तसेच आज संगणक म्हटले तर हा टेबलवर निमूटपणे बसलेला पी.सी.च डोळ्यासमोर येतो… कारण तो घरातला असतो, आपल्या आज्ञेतला असतो.
डॉ. मंदार काळे, संख्याशास्त्रज्ञ संगणकतज्ज्ञ आहेत.
COMMENTS