अधीर रंजन चौधरींनी मागितली राष्ट्रपतींची माफी

अधीर रंजन चौधरींनी मागितली राष्ट्रपतींची माफी

नवी दिल्लीः देशाच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ केल्या प्रकरणात लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी

मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका
भाजपची ७५ लाख रोजगार कार्डची घोषणा मागे
कॉर्पोरेट कंपन्या, देणगीदारांची भाजपला पसंती

नवी दिल्लीः देशाच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ केल्या प्रकरणात लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी मुर्मू यांची माफी मागितली. तसे एक पत्र त्यांनी राष्ट्रपतींना पाठवले आहे. आपल्या तोंडातून चुकून राष्ट्रपत्नी असा उल्लेख झाला, आपला अवमान करण्याचा हेतू नव्हता, बोलताना चुकून तसे शब्द गेले असे रंजन यांनी पत्रात म्हटले आहे.

गेल्या बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला व त्याचे पडसाद गुरुवारी लोकसभेत दिसून आले. भाजप व काँग्रेस खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते.

भाजपच्या महिला खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा करून एका आदिवासी महिलेचा, देशाच्या सर्वोच्च पदाचा, देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसवर केला व या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

हा गोंधळ करण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी होत्या. त्यांनी लोकसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रपत्नीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी मुर्मू यांचा अवमान केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर बसवल्याचे काँग्रेसला पाहवत नाही. मुर्मू या काँग्रेसच्या पहिल्या पासून लक्ष्य होत्या. अधीर रंजन चौधरी यांचे हे म्हणणे आदिवासीविरोधी, महिलाविरोधी असल्याचा आरोप त्यांचा होता.

स्मृती इराणी एवढ्यावर थांबल्या नाहीत त्यांनी अधीर रंजन यांच्या या म्हणण्यामागे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे, त्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसलेली पाहावत नाही, असा आरोप केला.

स्मृती इराणी यांच्या आरोपाला अनेक भाजप खासदारांनी जोरजोरात घोषणा देत अनुमोदन दिले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका महिलेवर लैंगिक टिप्पण्णी सहन केली जाणार नाही, काँग्रेस अध्यक्षांनी त्या बाबत माफी मागितली पाहिजे, अशीही मागणी केली होती.

अधीर रंजन चौधरी यांची माफी

भाजपने लोकसभेत हंगामा सुरू केल्यानंतर अधिर रंजन चौधरी यांनी आपण मुर्मू यांचा अवमान केला नाही असा दावा केला. भाजप राईचा पर्वत करत असून मुर्मू यांचा अवमान करण्याचा आपण विचारही केला नव्हता. आपण हिंदी भाषिक नाही तर बंगाली असून चुकून शब्द तोंडून गेला, आपण मुर्मू यांची माफी मागण्यास लवकर जाऊ व त्यांची माफी मागू अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

सोनिया गांधीच भाजपचे खरे लक्ष्य

अधीर रंजन यांनी मुर्मू यांच्यावर केलेल्या टिप्पण्णीचा राजकीय फायदा भाजपने घेण्याची संधी सोडली नाही. अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितल्यावरही भाजपचे खासदार गप्प बसण्यास तयार नव्हते. भाजपच्या आक्रमक महिला खासदार सोनिया गांधी यांच्या माफीची मागणी करत होत्या.

गदारोळात सोनिया गांधी भाजपच्या खासदार रमा देवी यांच्यापाशी गेल्या आणि त्यांनी मला या वादात का ओढताय असा सवाल केला. चौधरी यांनी माफी मागितली आहे व या वादावर पडदा पडला आहे, असे त्या म्हणत असताना स्मृती इराणी यांच्यासह काही भाजप महिला खासदारांनी सोनिया गांधी यांना गराडा घातला व त्यांच्याकडे पाहून जोरजोराने राजीनाम्याची मागणी केली. यात सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांना मी तुमच्याशी बोलत नाही, असे म्हटले. त्यावर इराणींसह अन्य खासदार खवळले व त्यांनी जोरात घोषणाबाजी सुरू ठेवली. या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार तरुण गोगोई यांनी सोनिया गांधी यांना बाजूला नेले.

या घटनेच्या साक्षीदार असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, भाजपच्या काही महिला खासदारांनी सोनिया गांधी यांना घेराव घातला होता व घोषणाबाजी सुरू होती. सोनिया गांधी रमा देवी यांच्याशी बोलत होत्या त्या दरम्यान मागून स्मृती इराणी आल्या व त्या सोनियांना उद्देशून काही बोलू लागल्या, त्यांनी बोटेही दाखवली. त्या वेळी भाजपच्या सर्व महिला खासदार जवळ आल्या आणि त्यांनी सोनिया गांधी यांना घेराव घातला. त्यात भाजपचे निशिकांत दुबे आले. नंतर सुप्रिया सुळे, प्रतिमा मंडल, अप्पारुपा पोद्दार आदी नेते आले. एका ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नेत्याला घेराव घालून धमकावले जात होते, लांडग्यांचा जसा कळप जमा होतो, तसे दृश्य दिसत होते, आजपर्यंत आपण असे दृश्य पाहिले नव्हते. सोनियांना आपण बाजूला नेले त्यावेळी, मी अशा प्रसंगाना अजिबात घाबरत नाही, असे त्या म्हणाल्याचे मोईत्रा यांनी सांगितले. मोईत्रा यांनी अनेक ट्विट करून विरोधकांना लोकसभा सभापती जो न्याय लावतात तो भाजपच्या महिला खासदारांना लावतील का, असा खोचक सवाल केला.

दरम्यान भाजप महिला खासदारांचे सोनिया गांधी यांच्यासंदर्भातील वर्तनावर काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध करत लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. हे प्रकरण हक्कभंग समितीकडे नेले जाणार असून या सदस्यांच्या वर्तनाबाबत त्यांना निलंबित केले जावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0