छत्रपती संभाजींच्या बदनामीचे कारस्थान

छत्रपती संभाजींच्या बदनामीचे कारस्थान

इतिहासावर आधारलेली कथा लिहिली जाते, तेंव्हा कथेला आधार असलेला इतिहास तपासून घेण्याची जबादारी लेखकाचीच असते. जेंव्हा तुम्ही तुमच्या कथा लेखनाचं माध्यम

किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर सर्वथरातून संताप
छ. शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना; महाराष्ट्रात संताप
सोन्याचे मासे, चवऱ्या आणि सोन्याचा तराजू!

इतिहासावर आधारलेली कथा लिहिली जाते, तेंव्हा कथेला आधार असलेला इतिहास तपासून घेण्याची जबादारी लेखकाचीच असते. जेंव्हा तुम्ही तुमच्या कथा लेखनाचं माध्यम इतिहास आहे असं स्वतःच जाहीर करता आणि एका  पत्रकाराच्या नजरेतून आपण लिहीत असल्याचं सांगता तेंव्हा लेखन म्हणून आणि पत्रकार म्हणून आधारभूत इतिहास हा एकांगी आहे, हे वारंवार सिद्ध झालेले असताना, तीच साधने वापरून पुन्हा तोच खोटा, अर्धसत्य इतिहास लोकांसमोर आणणे याला प्रामाणिक पत्रकारीता तर दूरच प्रामाणिक लेखनही मानता येणार नाही.

ही प्रक्रिया आजची नाही. अनेक शतके याच मध्यवर्ती संकल्पनेवर एक गट सातत्याने काम काम करत असल्याचं दिसतं. या मध्ये तीन बाबी प्रामुख्याने आढळतात.

सगळ्यात पहिली, समर्थ रामदासांना काहीही करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसवणे, यासाठी अगदी तुकोबारायांच्या गाथेतच प्रक्षेप करण्याइतकी स्वघोषित इतिहासकारांची मजल गेली.

दुसरं दिसत, ते ‘महाराष्ट्र धर्म’ या शब्दाच्या भोवती तत्वज्ञानाचं वलय उभं करण आणि त्या शब्दावर आधारलेलं साहित्य निर्माण करणं. हा शब्दही समर्थ रामदासांचाच !

छत्रपती संभाजी महाराज, चित्रशाळा प्रेस पुणे १९००, लिथो प्रिंट.

छत्रपती संभाजी महाराज, चित्रशाळा प्रेस पुणे १९००, लिथो प्रिंट.

तिसरी बाब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यद्रोह्याना केलेल्या शासनाच्या रागापोटी किंवा लहानग्या रामराजांच्या आडून स्वराज्य ताब्यात घेण्याचे मनसुबे उधळून लावल्याने, त्यांची बदफैली, मद्यपी, अशी विपरीत प्रतिमा तयार करण्यासाठी केलेले लेखन.

हे सगळं चिटणीस ते गिरीश कुबेर या अखंड प्रवाहात दिसतंच. बरं हे सगळं खोटं आहे आणि ते तसे एकदा नव्हे अनेकदा, अनेक इतिहासकारांनी सप्रमाण सिद्ध केलेले आहे. तशी संशोधन केलेली पुस्तके सहजी उपलब्ध आहेत. तरी २०२१ मध्ये देखील तोच चिटणीसी इतिहास पुन्हा लिहिला जातो आणि त्याचा प्रतिवाद लिखाणाने करावा असा सल्ला विद्वान देतात, तेंव्हा या सल्लागार विद्वानांनी तरी छत्रपती संभाजीराजेंवरील खोटे नाटे आरोप खोडणारे संशोधन साहित्य, पुस्तके वाचलीत का अशी रास्त शंका येते. रोज तेच खोडसाळ लिखाण करायचे आणि रोज त्याचा प्रतिवाद करायचा असं अपेक्षीत आहे काय? बरं, सरकार तरी काय करत आहे? अशा पुस्तकावर बंदी घाला, ही मागणी होऊन कितीतरी काळ लोटला, बंदी सोडा, साधं या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर वगळावा एवढी सूचना तरी सरकारकडून केली गेली का?

फार नाही गेल्या काहि वर्षातील बातम्या पाहू –

‘शिवराय अवमानप्रकरणी याचिका फेटाळली’ (२०१८, २० जुलै महाराष्ट्र टाइम्स)

समर्थ प्रशाला अहमदनगर येथील प्रचार फेरीतील देखावा प्रकरणातील समर्थ रामदासस्वामींना छ.शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून दाखवल्या प्रकरणात कोर्टाने ‘गुरू नाहीत’, असं मत नोंदवलं होतं.

न्यायालयाचा २०१८ चा निर्णय एका बाजूला तर रायगड जिल्ह्यातील उरण येथे  १७ फेब्रुवारी २०१९ ला त्याच देखव्याचं शिल्प उभारलं. त्या कार्यक्रमास बरेच मान्यवर उपस्थित होते. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी तसं ट्विटही केलं आणि मुख्यमंत्र्यांचं त्या ट्विटला कुणी न्यायालयात ना आव्हान दिलं, ना कोणी त्यास विरोध केला. जी गोष्ट न्यायालयाने चुकीची ठरवली ते दर्शवणाऱ्या शिल्पाचं तत्कालीन मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत अनावरण केलं गेलं. एका  शाळेत घडला तो गुन्हा आणि भव्य स्मारक हा मात्र गुन्हा नाही, ते ही एकाच राज्यात! हे उदाहरण एवढ्यासाठी देण्याचं कारण की विचारांची लढाई केवळ विचारांनीच नव्हे तर कायदेशीर मार्गाने लढून, जिंकून देखील विशिष्ठ गट ते सगळं जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतो आणि पुन्हा खोटा इतिहास कायमस्वरूपी राहील अशा भव्य स्मारकाच्या रुपात उभा करत अधिकृतरित्या मुख्यमंत्र्याच्या अकाउंटवर येतो, हा न्यालायचा अपमान कुणालाच वाटत नाही. किती केसेस केल्या आणि किती पुरावे दिले म्हणजे हे थांबेल?

दुसरी बातमी –

‘सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या डॉ शुभा साठे लिखित  समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकावर बंदी’ (माय महानगर २३ ऑक्टोबर २०१८)

या पुस्तकातही संभाजी महाराजांबद्दल पारंपरिक खोटे मुद्दे घेऊन बदनामी करणारी विधाने केली आहेत, त्यावर गदारोळ तक्रारी झाल्यानंतर बंदी घालण्यात आली. सर्वशिक्षा अभियानात अशी पुस्तके असणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेतच घुसून लहानग्यांच्या मनात संभाजी राजांबद्दल चुकीचं मत तयार करणे, हे सोडून दुसरा उदात्त हेतू असूच शकत नाही. बरं, शिक्षण व्यवस्थेत हे घुसवलं पाहिजे ही धारणा कधी पासूनची असावी याचं मूळ शोधताना, समर्थ विद्यालयाने विद्यार्थ्यांचे ‘शील’ उत्तम असावे म्हणून नीती आणि धर्म’ या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात असावा, या हेतूने ‘व्यवहार पद्धती’ नावाने एक पुस्तक कृष्णाजी पळनीटकर यांच्याकडून लिहून घेतलेलं दिसतं. त्यात एखादा शब्द इकडे तिकडे करून छ. संभाजी राजांविषयी चिटणीस बखरीतील दाखले देत ‘स्वतःचा जीवही गमावला आणि राज्य ही शत्रूच्या घशात घातले’, अशी मखलाशी केली आहे. पुस्तक प्रकाशनाचं साल आहे इ.स. १८९४!

तिसरी बातमी आहे, तीही संदर्भ पुस्तके आणि कला शाखेतील, तृतीय वर्षाच्या पुस्तकाबाबत. ७ मार्च २०२१ ला ‘फडके हाउस’, या कोल्हापुरच्या प्रकाशनाने मराठ्यांचा इतिहास या पुस्तकात पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांबाबत मागे लिहिलेल्या चिटणीशी परंपरेनुसारच बदनामीकारक लिखाण केले. ते पुस्तक विद्यापीठाने अभ्यासक्रमातून काढून टाकले. त्या वेळीही या विषयावर भरपूर ससंदर्भ चर्चा झाली होती. त्या नंतर लगेचच ‘रेनेसान्स स्टेट’ हे कुबेरांचं पुस्तक आलं संभाजी महाराजांच्या बदनामीचे तेच मुद्दे घेऊन!

छत्रपती संभाजी महाराज, चित्रकार राव बहादूर एम. व्ही. धुरंदर. राजपीपाला येथील मानवेंद्रसिंग गोहील यांच्या संग्रहातून.

छत्रपती संभाजी महाराज, चित्रकार राव बहादूर एम. व्ही. धुरंदर. राजपीपाला येथील मानवेंद्रसिंग गोहील यांच्या संग्रहातून.

किती वेळ एखाद्या गोष्टीचा प्रतीवाद करायचा, कुणी करायचा आणि कसा करायचा?

हे सारे दोन तीन मुद्द्यावर आधारित आहेत. त्यातील पाहिलं म्हणजे

चिटणीस बखर. छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्यद्रोहाबद्दल शिक्षा दिलेल्या व्यक्तीच्या खापर पणतूने लिहिलेली, १२२ वर्षानंतरची– बखर ! या वाङ्मयाच्या बाबत इतिहासाचार्य राजवाडे यांचं मत प्रसिद्ध आहे, की एक अस्सल चिटोरे बखरीतील ढीगभर माहिती हाणून पाडू शकते ! आणि इथे एक नव्हे अनेक अस्सल पुरावे चिटणीस बखरीच्या विधानांपेक्षा वेगळी हकीकत सांगतात. ते वा. सि. बेंद्रे, कमल गोखले, जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या संशोधनात दाखवून दिलं आहे, ते ही जवळपास अर्धशतका पूर्वी. मग हे संशोधन विशिष्ट कंपूतील लेखकांनी वाचले नसेल, असे मानावायचे काय? त्यांचे लिखाण अवास्तव आहे असं तरी ‘विचारांच्या’ लढाईत सिद्ध केलय का? मग हे नवीन संशोधन दूर सारून स्वतःच्या मानसिकतेला आणि कंपू विचारधारेस पूरक आहे म्हणून फक्त चिटणीस आणि मनूची आधारभूत मानायचा हे कसलं इतिहासावर आधारित लिखाण? ही तर विकृती. मी इथं फक्त इतिहासावर आधारित असा दावा करणाऱ्या लिखाणाबाबत बोलतोय. नाटके, कादंबऱ्या या विषयी नव्हे. तो विषय तर आणखीनच क्लिष्ट. त्यावर एक डॉक्टरेट प्रबंध शोधगंगावर साहित्यातील छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा या नावाने उपलब्ध आहे.

‘रेनेसान्स स्टेट’च्या लेखकांनी ‘अजून उत्तम लोकमान्यता मिळण्यास योग्य अशा प्रा.नरहर कुरुंदकरांना हे पुस्तक अर्पण केलं आहे. केवढा मोठा विनोद आहे! ज्यांना समाजमान्यता मिळायला हवी अशा कुरुंदकरांनी संपादित (श्री स.रा. गाडगीळ यांच्या सह) केलेल्या शिवदिग्विजय बखरीच्या प्रस्तावात इतिहास म्हणून बखर साहित्याचं जे मूल्यमापन केलं आहे, ते लेखकाने वाचलं नसेल असं म्हणवत नाही. शिवाय कुरुंदकर – गाडगीळ संभाजी महाराजांचा  शिवदिग्विजय बखरीत जेथे उल्लेख येतो तिथे तळ टिपेत स्वतःच मत न देता बेंद्रे यांचाच हवाला देत म्हणतात– ते मुळातून पाहू

“–संभाजी क्रूर होता. तो व्यसनी होता, त्याने अनेक मंत्र्यांना नाहक ठार केलें, सावत्र मातेला भिंतीत चिणून मारिलें. इ. सर्वच रूढ समजुती त्यांनी सप्रमाण खोडून काढिल्या आहेत.- ”

आता हा आपण ज्यांना आदराने ज्याना पुस्तक अर्पण केले आहे, त्यांचं हे मत आहे, मग ते तुम्ही वाचलं नसेल असं वाटत नाही. तरीही ‘रेनेसान्स स्टेट’मध्ये चिटणिशी बखर आधारभूत म्हणून काशी वापरली याचं काय कारण देता येईल ?

ज्या चिटणिस घराण्याने स्वराज्याची सेवा केली, स्वार्थापायी एकाने जीव गमावला, तरी पुढच्या पिढीने प्रामाणिक सेवा दिली, त्या  चिटणीस घराण्याचा थोडा पण अधिकृत इतिहास ‘चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व सनदा-पत्रे’ (बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी मुबई सन १९१५) यात आला आहे. या वाक्यात संभाजी राजे क्रूर असा उल्लेख आहेच पण अजून महत्वाची ही माहिती येते, पुढच्या पानावर मात्र क्रूर छत्रपती संभाजी एका स्वराज्यद्रोही कर्मचाऱ्याच्या मुलाला नुसतेच प्रेमाने वागवत नाहीत तर त्याला त्याच्या पित्याच्या जागेवर नियुक्त करतात आणि चिटणीसाच्याच वकायती नुसार पोटाशीही धरतात. मूळ नोंद अशी, ‘– येशश्री होऊन माघारे आलीयावर राजश्रीनी घोड्यावरूनच आपास पोटासी धरून शाबास तुझी, चिटनीस तुजला वतनी बाहाल ह्मणोन बोलले’.

पुस्तकातील मजकूर असा—संभाजी महाराज क्रूर. कितेक मारिले. आण्णाजी दत्तो व रघुनाथपंताचे भाऊ जनार्दनपंत याणी विषप्रलय करून प्राण दिल्हे. पहिले मसलासीत बाळाजी बावाकडे कायेपेच आहे हे लिहीणार कारभारी याणी सांगितले तसे यानी लिहीले असेच जाले होते मागती बहुपांचा वर्षांनी आमचेच स्वज्ञाती गृहस्थानी खोविले चिटनीसी आपणास प्राप्त व्हावी अशी आशा धरली होती. तन्मुळे राजश्री बाळाजी वावा शामजी बावा जवळ होते है व आवजी बावा धरुन कैद केले. घर जप्त करुन वित्त विषय नेला. आपा आणाजी व बायका व बाळाजी बोवाची मातोश्री आदिकरून खासा स्वारी आली होती तेथे धरून आणिली. चिमणाजीबाबा कांहीं कामा बद्दले नेऊल प्रांती गेले होते. तन्मुळे वाचले. बाळाजी बावा व शामजी बावा व आवजी बावा तिघांस उरमोळीचे कांटी मारिले.’ या हकीकतीत महाराणी मातोश्री सोयराबाई यांचा उल्लेखही नाही, अण्णाजी दत्तोने आत्महत्या केली आणि नंतर बाळाजी आवजी आणि बंधू याना दंड दिला.

या लेखांचा कालावधी साधारणतः उत्तर पेशवाईतील आहे. पुढे याच पुस्तकात छत्रपती शाहू महाराजांसमोर कुटुंबकथा सांगताना समोर कुणीतरी गैरसमज करून दिल्याने चिटणीसास देहदंड (छत्रपती संभाजी राजांकडून) झाला, असा उल्लेख चिटणीस करतात. ही नोंद राज्याभिषेक शके ६१ मधील आहे. ‘हा’ कुणीतरी म्हणजे कवी कलश. कलश म्हणजे अष्टप्रधानमंडळात नसलेली बाह्य व्यक्ती आणि अष्टप्रधानांहून जास्त अधिकार त्याच्याकडे आणि महाराणी येसूबाई यांच्याकडे होते. सरळ आहे की अष्टप्रधान ज्या पद्धतीने वागत होते ते पाहता छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणं धोक्याचंच होतं. बिनखात्याच्या मंत्र्यासारखे प्रधानमंडळ सत्तेवाचून तळमळत होते आणि संभाजी महाराज छत्रपती असेपर्यंत आपल्या हाती सत्ता नाही याची जाणीव त्यांना झाली होती. म्हणूनच एकसंध स्वराज्यामध्ये दुहीचे बीज पेरण्याचे पापही यांच्या माथी आहे हे विसरून चालणार नाही.

छत्रपती संभाजी यांची बदनामी करण्यासाठी थोरातांची कमळा आणि गोदावरी यांच्या कथाही रचण्यात आल्या. थोरातांची कमळा तद्दन फिक्शन पात्र! सरदार थोरातांच्या घरातील सरदार यशवंतराव थोरात व सती गोडूबाई थोरात या मृत दाम्पत्याचे थडगे कमळाचे थडगे म्हणून दाखवले जात होते तर गोदावरीचे म्हणून दाखविले जाणारे थडगे हे  प्रत्यक्षात एका पेशविणीचे थडगे असल्याचे सिध्द होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. अशा रीतीने गोदेच्या कल्पनेचे जनक जे लिहीतात, त्याची सुरवात वाचून त्याच्या ऐतिहासिक मूल्याची कल्पना येईल-

‘संभाजी राजा आणि गोदावरीची लोककथा’ लेखक : द. ग. गोडसे (केसरी, दिवाळी १९८५)

“आडवाटेला एखादी प्राचीन भग्न मूर्ती सापडावी तशी प्रस्तुत लोककथा आड वाटेवरच ऐकली. वाडीला..रायगडाच्या पायथ्यालगत असलेल्या किल्लेवाडीला ! रायगडाच्या परिसरात हिंडत होतो. रायगडाच्या खुबलढा बुरूजाकडून खाली उतरताना वाटेत एक समाधी दिसली. काळ्या कातळाची चिरेबंद समाधी. समाधीच्या चौथाऱ्यावर वृंदावनासारखी दिसणारी देवळी. या देवळीचा काही भाग खंडित झालेला आढळला. तरी समाधी अजून बरीच शाबूत होती. समाधीभोवती फिरत असतानाच प्रश्न पडला कोणाची ही समाधी. समाधीच्या एकंदर थाटावरून ती कोणा स्त्रीची समाधी असावी असे जाणवले. मी अधिक निरखून पाहू लागलो. इतक्यात कानावर शब्द पडले “गोदावरीची समाधी हाय ती… सती गोदावरीची.”

माहिती देणारा धनगर होता. साठी उलटलेला. शेजारच्या रानात त्याची मेंढरं-बकऱ्या इतस्तत: ओरबाडीत होती. समाधीजवळ एका झाडाची सावली धरून तो उभा होता. तो जवळ आला तसे मी विचारले “कोण ही गोदावरी?”

“तुम्हासनी माहीत न्हाय? मोठी पुन्यवान बाई व्हती ती. साध्वी! इथंच ती सती गेली म्हनत्यात. आमचे वाडवडील सांगत आले.”

या अशा लोककथा आमच्या इतिहासाचा आधार! आणि अशा पूराव्याआधारे आम्ही छत्रपती संभाजी राजांना बदफैली ठरवणार. वा रे इतिहास ! लोककथा या इतिहास होऊ शकत नाहीत !

पुढचा आरोप छत्रपती संभाजीराजे पकडले गेले, तेंव्हा दारूच्या कैफात होते, या बाबत फार्सीचे तज्ज्ञ आणि मराठ्यांच्या इतिहासातील अग्रगणी श्री सेतू माधवराव पगडी काय म्हणतायेत ते पाहू

(समग्र सेतुमाधवराव पगडी : खंड २ रा,पान क्र ८०२)

“संभाजीराजे मद्यपानामुळे बेहोष होते आणि त्यामुळे पकडले गेले अशी चुकीची विधाने करण्यात आली आहेत. मोगल साधने त्यांच्याबद्दल “ते गाफील राहिले’ असे म्हणतात. हे म्हणताना त्यांनी “गफलतीच्या दारूत धुंद होते”  असे शब्द वापरले आहेत. म्हणजे दारू ही गफलतीची. प्रत्यक्ष दारू नव्हे. हे लक्षात न आल्यामुळे इतिहासकारांनी अर्थाचा अनर्थ केला आहे. शब्दांच्या वादंगात आणि चुकीच्या अर्थात संभाजी राजांचे जीवन कसे सापडले हे पाहिले की विस्मय वाटू लागतो.”

शेवटी प्रश्न हा पडतो, की आजही छत्रपती संभाजी राजे यांची बदनामी करण्यामागचे कारण काय असावे? एक म्हणजे स्वज्ञातीतल लोक योग्य ठरवण्यासाठी छत्रपती चुकीचं वागले हे दाखवणं गरजेचं वाटत असावे. छत्रपती संभाजी राजे शाक्त होते, असे इतिहासकार मानतात, शाक्त परंपरा जातीभेद पळत नाही, की वर्णवर्चस्व मानत नाही. कर्मकांडासाठी विशिष्ठ वर्णात पुरोहित हवा असे गरजेचे नव्हते, त्यामुळे धार्मिक व्यवस्थेवर उपजीविका असणाऱ्या समाजास ते नकोसे वाटणे स्वाभाविक होते. आज देखील हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या मनुस्मृतीलाच मानणारी परंपरा तिनशे वर्षापूर्वी त्या व्यवस्थेला दूर करू पाहणाऱ्या, धार्मिकदृष्ट्या हक्क नसताना, सातसतक सारखा धार्मिक ग्रंथ लिहीणाऱ्या राजाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करते यात आश्चर्य काय? याच ग्रंथात छत्रपती संभाजी महाराज स्वतःच याचं कारण सांगतात–

“छत्र, गज, चमर, तुरंग अगनित संग ।

एते पर मन ना गरुर गहियतु है। असन विहूँने अंग वे वसन सुने राषो। लोक निंदा भाषो सुष मानि सहियतु है।”(छत्र चामर हत्ती घोडे अगणित असूनही गर्व परी नाही-अंगावर वस्त्र असले काय नसले काय, आसन(घर यार्थी सुद्धा) असल्या नसल्याची ही चिंता नाही- (ही विरक्ती पाहून) कोही लोक माझी निंदा करतात, ती ही मी गोड मानून घेतो)

हे सगळं सत्य वारंवार मांडलं गेले आहे, तरीही खोडसाळपणे आणि नियोजनपूर्वक हा वाद जिवंत ठेवला जातोय आणि विद्वान त्याला पोकळ सल्ले देतायत हे दुर्दैव आहे. या बाबत सेतु माधवराव पगडी यांचेच मत त्यांच्या शब्दात उद्धृत करून हा लेख थांबवतो.

‘.. ..सारांश, अफवा, बखरीतील भाकड कथा आणि तर्क पुण्यश्लोक नृपतीच्या अंतकाळात अशी विधाने आणि तीही समकालीन पुरावा विरुद्ध असताना, हे विलक्षण म्हटले पाहिजे! या विषयावरील संपूर्ण पुरावा पुढे ठेवला आहे. लेखकांना नव्हे, तर त्यांना ग्रस्त करणाऱ्या संशयपिशाच्चांना म्हणावेसे वाटते – –

त्रस्त समंधानो, आता तरी शांत व्हा!’

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0