छ. शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना; महाराष्ट्रात संताप

छ. शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना; महाराष्ट्रात संताप

दिल्लीतले भाजपचे एक नेते जयभगवान गोयल यांनी आपल्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छ. शिवाजी महाराज यांच्

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
इंग्रजीतून शिक्षण हा केवळ उच्चभ्रूंचा अधिकार असू नये
एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची

दिल्लीतले भाजपचे एक नेते जयभगवान गोयल यांनी आपल्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छ. शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याने त्याची संतप्त प्रतिक्रिया सर्व थरातून व्यक्त केली जात आहे. या पुस्तकावर तात्काळ बंदी घातली जावे व हे पुस्तक बाजारातून मागे घेतले जावे अशी मागणी राजकीय व सामाजिक थरातून केली जात आहे. सोशल मीडियातील ट्विटर व फेसबुकवर हजारो नेटीजननी ही बातमी व्हायरल होताच अशा तुलनेवर आक्षेप घेतला असून भाजपचे समर्थक असलेल्यांनाही ही तुलना पसंत पडलेली दिसत नाही.

दिल्लीतले सर्व राजकीय विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्याच प्रचाराचा एक भाग म्हणून रविवारी जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या कार्यालयात झाले. त्या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी व अन्य नेते उपस्थित होते. या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर काही काळातच जयभगवान गोयल यांनी ट्विटरवर या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगाचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि काही मिनिटांतच ते व्हायरल होऊन संतापाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. छ. शिवाजी महाराज हे उत्तुंग व्यक्तिमत्व असल्याने त्यांची कोणाशीही तुलना केली जाऊ शकत नाही, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी व सामान्य माणसाकडून येऊ लागल्या.

राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या तुलनेवर आक्षेप घेत ‘जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही,’ असे ट्विट केले आहे.

त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. ज्यांनी  दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!’ असा संताप व्यक्त केला.

संजय राऊत यांनी नंतर आणखी एक ट्विट करून भाजपमध्ये गेलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. या ट्विटमध्ये त्यांनी ‘जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?’ असा खोचक सवाल या दोन नेत्यांना उद्देशून केला आहे.

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनीही भाजपवर टीका करत ‘भाजपने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं ज्यात मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली आहे. ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख दिली त्यांचा अपमान भाजपने केला. महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ही तुलना करणं हे बौद्धिक दिवाळखोरीच लक्षण आहे. ह्या प्रवृत्तीचा निषेध.’ असे ट्विट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0