प्रेमभावनेचा समकालीन सामाजिक-राजकीय पैस

प्रेमभावनेचा समकालीन सामाजिक-राजकीय पैस

एखाद्या तरुणाच्या प्रेमप्रस्तावाला एखाद्या तरुणीने स्पष्टत: नकार देणे ही स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याची साधीसरळ बाब स्वीकारून ती खुल्याने मान्य करण्याइतपत तरुण पुरुषाचे लोकशाहीपर संस्कार घडवण्यात येथील शिक्षणव्यवस्था व सामाजिक चळवळी अपयशी ठरल्या आहेत.

केंद्रात ब्राह्मणी फॅसिस्ट सत्तास्थानी आल्यानंतर हिंदुत्ववादी झुंडींकडून प्रेम करणा-या तरुण जोडप्यांवर हिंसक हल्ले करण्याच्या राज्यपुरस्कृत अभियानाला अधिक गती आल्याचे  दिसून येईल. विरोधक म्हणून लक्ष्य केलेल्या व्यक्ती, विशिष्ट्य जाती व धर्मसमूह यांना शत्रू मानून द्वेष करणे अशी द्वेषमूलक व हिंसाजन्य मानसिकता घडवण्याची राजकीय मोहीम संघ-भाजपने राबवली. त्यामुळे माणूस म्हणून व्यक्तीवर प्रेम करण्याची, शांततापूर्ण सहजीवनाची उदार भूमिका घेवून २०१४-१५ नंतर ‘किस ऑफ लव्ह’, ‘लव्ह जिहाद’विरोधी ‘लव्ह आजाद है’ अशी वरवर अराजकीय वाटणारी अभियाने तरुणसमुहांनी भारतभर  सुरू केली. परंतु या आंदोलनातून प्रेम करण्याच्या कृतीला व्यापक राजकीय अर्थ प्राप्त झाल्यासारखे प्रतीत होऊ लागले. थोडक्यात भारतातील लहान-मोठ्या शहरात तरुणांच्या लहानलहान गटांनी सुरू केलेले हे प्रेमाचे नागरी आंदोलन समकालीन भारताच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे राहील.

महाराष्ट्रात २००० नंतर एकतर्फी प्रेमातून केलेल्या तरुण मुलींच्या क्रूर हत्येच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने ‘प्रेम आणि हिंसेला नकार’ देणारी सामाजिक मोहीम सुरू केली होती. वर्गजातीपितृसत्ताक व्यवस्थेत स्त्री-पुरुष विषमसंबधात निर्माण होणाऱ्या कुंठीततेवर या मोहिमेने नेमके बोट ठेवून प्रेम आणि लैंगिकतेचा सम्यक विचार जनतळात रुजवण्याचा प्रयास केला होता. ‘किस ऑफ लव्ह’, ‘लव्ह आजाद है’यासारखी अलीकडच्या काळातील तरुणांची अभियाने त्या मोहिमेप्रमाणे जातजमातवादअंताची पायाभूत भूमिका घेणारी नव्हती. किंबहुना जागतिकीकरणाच्या ह्या पर्वात स्त्रीमुक्तीच्या चळवळी संपुष्टात आल्यानंतर स्त्रीमुक्तीच्या अंगाने लिंगसमतेच्या आधारावर प्रेम कल्पनेची मांडणी करण्याचा प्रयत्न या आंदोलनांनी केला नव्हता

जागतिकीकरणाच्या आर्थिक-सांस्कृतिक बदलाच्या टप्प्यावर त्याकाळात स्त्रीहिंसेची वेगळी मालिकाच सुरू झाली. तरुण मुलींनी तरुण मुलाच्या प्रेमप्रस्तावाला नकार देताच या तरुणांनी त्या मुलींना पेट्रोल टाकून जाळून मारणे, तीक्ष्ण शस्त्रांनी भोकसून ठार मारणे, चेह-यावर अॅसिड फेकून चेहरा विद्रुप करणे किंवा अपहरण करून मित्रांसोबत गँगरेप करणे यासारख्या हिंसेच्या कृती केल्या, त्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने प्रेम, नकार, हिंसा या संबंधी जनप्रबोधनाची मोहीम हाती घेतली. त्या दरम्यान प्रेम व्यक्त करून व्हॅलेन्टाइन डे साजरा करणा-या तरुण-तरुणींवर हिंदुत्ववादी झुंडींनी संस्कृतीरक्षणाची भूमिका घेत हिंसक हल्ले करण्याची मोहीम गतिमान केली. तरुणांनी प्रेमप्रणय करण्याची कृती सामाजिकदृष्टया आंतरजातधर्मीय मेलमिलाफ वाढविणारी गोष्ट ठरणार आणि स्त्रीवरील लैंगिक बंधने मोडून पडतील, त्यातून जातीशुद्धतेला, जातीच्या सामाजिक बंदिस्त साच्याच्या पुनरुत्पादनाला आव्हान निर्माण होणार हा ब्राह्मणीपितृसत्ताक भयगंड या हल्ल्यांमागे सुप्तपणे काम करीत होता. स्त्रीवरील लैंगिक निर्बंधनाला धोका म्हणजे जातीपुरुषवर्चस्ववादी हितसंबंधी सुरक्षेच्या चिंतेच्या जाणीव-नेणीवेवर आघात करणारी सामाजिक मानसशास्त्रीय प्रक्रियेचा भाग असल्याने याबाबतीत सामाजिक, राजकीय जनप्रबोधन करणे हे समाजपरिवर्तक चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेवर मध्यवर्ती स्थानावर असणे अपेक्षित होते. परंतु या प्रबोधन आघाडीवर सामसुमीचेच अधिक वातावरण राहिले.

एखाद्या तरुणाच्या प्रेमप्रस्तावाला एखाद्या तरुणीने स्पष्टत: नकार देणे ही स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याची साधीसरळ बाब स्वीकारून ती खुल्याने मान्य करण्याइतपत तरुण पुरुषाचे लोकशाहीपर संस्कार घडवण्यात येथील शिक्षणव्यवस्था व सामाजिक चळवळी अपयशी ठरल्या आहेत. जातपितृसत्ता याप्रकारचे टोकाचे बीभत्स पुरुषवर्चस्वाचे मानस घडवते, हे मूळाशी भिडून समजून घेण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नाही.

डावी चळवळ आणि फुले-आंबेडकरवादी चळवळ या सखोल प्रबोधन अभ्यासाच्या सातत्यशील व्यापक कार्यक्रमात उतरून काम करणार नसतील तर प्रस्थापित प्रचार यंत्रणा केवळ प्रतिहिंसेचे भावनिक व कागदी कायदे बळकट करण्याचे उथळ जनमानस उठवण्याचे नाटक करीत राहतील आणि जातीपितृसत्ताक शोषण पीडन दमनातून बहुसंख्य जनसमुहाची सोडवणुकीच्या प्रकल्पाला क्षीण करीत राहतील. सद्य काळात संघ-भाजप सत्तेवर असल्याने त्यांचे संस्कृतीरक्षक मुखंड व सार्वजनिक अवकाशात तयार केलेल्या संस्कृतीरक्षक झुंडी यांच्याद्वारे जातीपितृसत्ता टिकवून  ठेवण्याचा अजेंडा थेट राज्ययंत्रणेमार्फत अमलात आणला जात आहे. उत्तरेत लवजिहादचा गैरप्रचार करून प्रेमी जोडप्यांना मारहाण करणे, स्त्रीचा लैंगिकछळ करणे, झुंडींनी स्त्रीपुरुषांना नग्न धिंडी काढणे, लैंगिक अत्याचार करणे या मोहिमा हिंदुत्ववादी राज्यसरकारपुरस्कृत राहिल्या आहेत. जातजमातीय अत्याचारातील स्त्रीहिंसेचे स्वरुप अधिक भयानक झाले आहे, अत्याचार करतांनाचे व्हिडीओ शुटींग करून ते सोशल मीडीयातून पसरविण्याच्या कृती नियोजनबद्ध पद्धतीने  आयटी सेल किंवा एका गटाच्या मार्फत केल्या जात आहेत. फाशीवादी सत्ताधारीवर्ग वर्चस्व राखण्याच्या इराद्याने भयाच्या मनोसांस्कृतिक बळजोरीच्या करामतींचा वापर करीत आहे. स्त्रीहिंसेचे व जातजमातीय हिंसेचे हे विविध प्रयोग फॅसिस्ट राजनीतीचे हातखंडे आहेत.

हे संस्कृतीरक्षक स्त्रीचारित्र्याच्या जातीपितृसत्ताक संकल्पनांचे गौरवीकरण करत भांडवलशाहीने आणलेल्या स्त्री-पुरुष मैत्री, प्रेमाच्या  उदार खुल्या अवकाशावर  सक्त नियंत्रण ठेवण्याकरिता रात्रंदिन  कार्यरत आहेत. हिंदू-ब्राह्मणी सांस्कृतिक परंपरेतील स्त्रीपुरुष चरित्र गुणांचे दाखले देत प्रेम आणि लैंगिकता यांची फारकत केली जाते. एकीकडे  स्त्री-पुरुष प्रेमाचे आध्यात्मिकीकरण केले की दुसऱ्या टोकाला लैंगिकतेचे अमानवीकरण घडण्याची प्रक्रिया यातून सुरू होते. भारतीय जातीसमाजात लैंगिकता ही जातीपितृसत्ताक विषमतेची कळीची पुनरुत्पादक शक्ती असल्याने  जाती संस्कृतीच्या कुटुंबातून स्त्रीपुरुषांचे विकृत स्वरूपाचे लैंगिक कुपोषण होते. त्यामुळेच भारत आज जगातील पोर्नोग्राफीच्या क्षेत्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

मानवी विकासाभिमुख बदलांसाठी भारतीय जातीपितृसत्ताक विषमसंबंधांमध्ये आमुलाग्र परिवर्तन झाली पाहिजेत. त्यासाठी स्त्रीपुरुषामधील आंतरजात-धर्मीय प्रेमाचा अवकाश विस्तारणे आवश्यक आहे. पारंपरिकरित्या जातधर्मबाह्य विवाह करण्याच्या प्रेरणा फारशा प्रबळ नसल्याने सद्याचे राज्यकर्ते सजातीय विवाहाच्या धारणाकक्षा संरक्षित व संवर्धित करण्याचे जालीम काम मोठ्या तडफेने पार पाडीत आहेत. प्रेमाच्या अपरिपक्व व अपुऱ्या समजाबद्दल केवळ तरुण-तरुणींनाच एकतर्फी दोष देता येणार नाही. जातवर्गीयपितृसत्ताक भारतीय समाजातच अशी परिपक्व जाण विकसित होणे अत्यंत अवघड प्रक्रिया आहे. प्रेम आणि लैंगिकता यांच्याविषयी समतामूलक, विवेकी व्यक्ती स्वातंत्र्यपूरक, मुक्त प्रवाहमान,सौंदर्यपूर्ण व शास्त्रीय समज असणारी सम्यक दृष्टी सामुदायिक शोषणमुक्तीच्या व्यापक भौतिक-मानसिक-बौद्धिक परिवर्तनशील प्रक्रियेतूनच वृद्धिंगत होणे शक्य आहे.

(छायाचित्रे फेमीनिझम इंडियावरून साभार)

(लेखक डाव्या व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असून इस्लामपूर येथील क. भा. पा. कॉलेजमध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक आहेत. )

COMMENTS