दैवी देणगी लाभलेला, केवढा हा थोर फुटबॉलपटू. परंतु, व्यसनांच्या विळख्यात गुरफटला आणि त्यातच एक दिवस संपून गेला...अशा दोन वाक्यांत जगाने लिजंड दिएगो मॅराडोनाचे मृत्युपश्चात वर्णन केले. परंतु या दोन वाक्यांच्या मध्ये आयुष्यभर डावी विचारनिष्ठा जपलेल्या ‘डेअर डेव्हिल’ मॅराडोनाची दखल जगाने अभावानेच घेतली. मैदानावरच्या या तुफानाच्या, काही अपरिचित पैलूंवर प्रकाशझोत टाकणारा हा मनोवेधक लेख..
अर्जेंटिना संघाने मेक्सिकोमध्ये विश्वचषक जिंकल्याच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच, १९८७ मध्ये डिएगो अरमांडो मॅराडोना प्रथम क्युबाला गेला. मॅराडोना, त्याची पत्नी क्लॉडिया आणि मुलगी डालमा यांनी २८ जुलै १९८७ रोजी राजधानी हवानाच्या रेव्होल्यूशन स्क्वेअरसमोरच्या ऑफिसमध्ये क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची भेट घेतली. फिडेल यांचे वाचन चौफेर आणि निरीक्षण गहिरे असल्याने सॉकर, बेसबॉल आणि राजकारणावर खुलून बोलले. पुढे जाऊन त्या भेटीचे वर्णन करताना, मॅराडोना म्हणाला, “आणि फिडेलने मनापासून दारे उघडली…जणू मला दुसरे जीवन मिळाले.” फिडेलच्या अंगी असलेल्या क्रांतीच्या भक्कम दृढनिश्चयाने संमोहित झालेला मॅराडोना क्युबा आणि कॅस्ट्रोच्या धोरणांचा खंबीर पाठिराखा बनत गेला…
सन २००० मध्ये कोकेनच्या अतिसेवनाने मॅराडोना मरणाला टेकला होता. फिडेलने क्युबामधल्या मॅटान्झा शहरातल्या ला- प्रादेरा क्लिनिकमध्ये ड्रग्जच्या व्यसनात सापडलेल्या आणि पुनर्वसनाची नितांत गरज असलेल्या मॅराडोनाच्या उपचारांची सोय केली. तो वैद्यकीय उपचारांसाठी क्युबामध्ये दाखल झाला. ४ वर्षे त्याने तिथल्या मानसोपचार इस्पितळात औषधोपचार घेतले. त्याचे व्यसन बरेच कमी झाले. तेव्हा आपला जीव वाचल्याचे श्रेय क्युबाच्या आरोग्य यंत्रणेला आणि फिडेल कॅस्ट्रो यांना देताना तो म्हणाला, “जेव्हा अर्जेंटिनामधील दवाखाने बंद झाले. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी क्युबाचे दरवाजे उघडले”. त्या काळात फिडेल कॅस्ट्रोने कशी-कशी आणि किती प्रकाराने मदत केली याबद्दल मॅराडोना अखेरपर्यंत कृतज्ञ भाव व्यक्त करत राहिला.
उपचारांच्या काळात फिडेल हे मॅराडोनाला सकाळच्या फेरफटक्यासाठी बोलवून घ्यायचे. त्याच्याबरोबर राजकारण आणि खेळांवर प्रदीर्घ चर्चा करायचे. फिडेल कॅस्ट्रो यांची सोबत सर्वार्थाने मेजवानी होती. विविध विषयांवर होणार्या सततच्या चर्चांमुळेच मॅराडोना समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा कट्टर समर्थक बनला. पुढील आयुष्यात त्याने घेतलेल्या अनेक भूमिकांवर त्याचा प्रभाव-परिणाम दिसून आला. फिडेल यांच्या सहवासामुळे मॅराडोनाला आजारातून सावरण्यास मोठी मदत झाली. मनातले नैराश्य हटून नवी उमेद निर्माण झाली. मॅराडोनाने फिडेलबद्दल म्हटले- “ते म्हणाले, मी साध्य करू शकतो आणि मी ते केले. माझ्या जीवनातल्या त्या एक सर्वोत्तम आठवणी आहेत”.
कॅस्ट्रोशी सख्य आणि डाव्या विचारांचा प्रभाव
फिडेल कॅस्ट्रो यांच्यासोबतचे राजकीय, भावनिक आणि वैयक्तिक नाते इतके घट्ट झाले होते, की याचमुळे मॅराडोना क्युबाला वारंवार भेट देऊ लागला नि फिडेल हे ‘माझे दुसरे वडील’ असल्याचे जाहीररित्या मोठ्या अभिमानाने सांगू लागला. उपचार झाल्याच्या पाच वर्षांनंतर, म्हणजेच २००५ मध्ये पूर्वीपेक्षा अधिक उत्तम मनःस्थितीत असलेल्या मॅराडोनाने आपल्या टीव्ही कार्यक्रमात क्युबाच्या या सुप्रीम कमांडरची मुलाखत घेतली. मुलाखत क्युबन प्रेसिडेंशल पॅलेसमध्ये घेण्यात आली. तब्बल पाच तास चालली. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना अमेरिकेने पुन्हा अध्यक्ष म्हणून कसे काय निवडले, असा सहज प्रश्न मॅराडोनाने विचारल्यावर फिडेलने “फ्रॉड, मियामीचा दहशतवादी माफिया” असे म्हणून मनातला संताप बोलून दाखवला.
फिडेल कॅस्ट्रोसारख्या महान कम्युनिस्ट क्रांतिकारकाच्या संपर्कात सातत्याने येण्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. मॅराडोनाने अधिक सडेतोड पद्धतीने साम्राज्यवाद विरोधी आणि डाव्या मतांची विधाने करायला सुरूवात केली. मॅराडोनाने डाव्या पायावर फिडेल कॅस्ट्रोचे आणि उजव्या हातावर महान क्रांतिकारक आणि फिडेलचे एकेकाळचे सहकारी चे गवेरा यांचे चित्र टॅटू म्हणून गोंदले. बर्याच वर्षांनंतर मॅराडोनाने त्याच्या १० क्रमांकाच्या जर्सीच्या नावाने सुरू झालेल्या “ला नोचे डेल 10” (टुनाइट विथ द 10) या टीव्ही कार्यक्रमात कॅस्ट्रो यांची मुलाखत घेत असताना डाव्या पायावर गोंदलेला कॅस्ट्रोंच्या चेहर्याचा टॅटू प्रेक्षकांपुढे आणला. आणि “सध्या काहीही अस्तित्व नसलेला लॅटिन अमेरिका सर्वकाही कसे बनू शकतो,” असा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला.
तत्पूर्वी, २००० मध्ये मॅराडोनाचे “यो सोय एल दिएगो” (मी दिएगो आहे) हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. हे आत्मचरित्र त्याने कॅस्ट्रो यांना समर्पित करत लिहिले. अर्पण पत्रिकेचा मायना होता, “फिडेल कॅस्ट्रो आणि त्याच्यामार्फत, सर्व क्युबाच्या लोकांना.” एवढेच नव्हे तर या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी संपूर्ण रॉयल्टी त्याने क्युबन लोकांच्या कल्याणसाठी दान केली. हा राजकीय, सामाजिक व आर्थिक न्यायासाठीच्या लढ्याचा एक भाग होता. मॅराडोनाच्या या कृतीचा प्रभाव इतका व्यापक होता की, कॅरेबियन देश त्याकडे आकर्षित झाले. निळ्याशार समुद्रात तरंगणाऱ्या एका बोटीवर तोंडात क्यूबन सिगार ओढत उजव्या हातावरचा चे गव्हेराचा टॅटू अभिमानाने मिरवत असलेल्या मॅराडोनाचे छायाचित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. तो मोठ्या हौशीने स्वत:ला “फुटबॉलचा चे गव्हेरा” म्हणायचा. फिडेल आणि चे प्रमाणेच त्याने साऱ्या लॅटिन अमेरिकेत जोमात असलेल्या समाजवादी कम्युनिस्ट चळवळींना आपलेसे करून घेतले.
२५ नोव्हेंबर २०१६ रोजी कॅस्ट्रो यांचे निधन झाले, तेव्हा मॅराडोना क्रोएशियात अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाला पाठिंबा देण्यासाठी गेला होता. निधनवार्ता कळल्यावर तो अक्षरशः कोलमडला. तो म्हणाला, “जेव्हा मला निधनाची वार्ता कळली, तेव्हा मी नरकात असल्यासारखा प्राणांतिक वेदनेने ओरडलो. मी अनियंत्रितपणे रडत राहिलो. मला उध्वस्त झाल्यासारखे वाटले. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला माहीत असलेला हा सर्वात मोठा असा दुःखद क्षण होता. ते माझ्यासाठी वडिलांसारखे होते. अर्जेंटिनाची दारे माझ्यासाठी बंद झाली असताना त्यांनी माझ्यासाठी क्युबाचे दरवाजे उघडले होते. आज ते हयात नाहीत, पण ते चावेझ आणि चे यांच्याप्रमाणेच मला मार्गदर्शन करीत राहतील. स्वर्गातून मार्गदर्शन करणारी व्यक्ती स्वर्गात गेली आहे.”
त्यानंतर मॅराडोना क्युबाच्या राजधानी हवानालाही गेला आणि अत्यंत जवळचे मित्र आणि ‘दुसर्या वडिलांना’ त्याने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हवानात असताना, तो क्युबाच्या राज्य दूरचित्रवाणीसमोर बोलला, “फिडेलसाठी धडधडणार्या हृदयात ते अजूनही जिवंत आहेत.” कॅस्ट्रो गेले आणि चार वर्षांनंतर २५ नोव्हेंबर २०२० रोजी ब्युनोस आयर्स येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने मॅराडोनाचे निधन झाले. आधी खंदा पाठिराखा गेला आणि पाठोपाठ त्याचा लाडका कॉम्रेडही गेला. ज्यावेळी युरोप मॅराडोनाकडे धोकेबाज म्हणून पाहात होता आणि अर्जेंटिना त्याकडे अविश्वासाच्या नजरेने पाहत होती, तेव्हा निराश आणि हताश झालेल्या मॅराडोनाला अमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ते प्रेम, प्रोत्साहन, साहस आणि विश्वास फिडेल कॅस्ट्रोकडूनच मिळाले होते. मॅराडोनाच्या राजकीय भूमिकेला, राजकारणाला आकार देण्यात कॅस्ट्रोंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मॅराडोनाच्या आत्मचरित्रात प्रत्येकाची टोपणनावे आली आहेत. तिथे त्याने फिडेल कॅस्ट्रोना “देव” संबोधन वापरले आहे. मिष्किलपणे लिहिलेय- ‘खरं तर, दाढी आणि गुणांमध्ये साम्य असल्याने कॅस्ट्रो आणि गॉड एकच आहेत.’ याचा अर्थ, तो भाग्यवादी किंवा दैववादी नव्हता. “जेव्हा लोक यशस्वी होतात तेव्हा ते कठोर परिश्रमांमुळे घडते. नशिबाचा यशाशी काही संबंध नाही.” हे त्याच्या आत्मचरित्रातले वाक्य त्याची भूमिका जाहीर करण्यासाठी पुरेसे ठरावे.
राजकीय कार्यकर्ता– मॅराडोना
मॅराडोनाने डाव्या विचारसरणीचा अंगिकार केला होता. त्याने ते कधीही लपवले नव्हते. आता तो अमेरिकन सत्ताधीशांनी इतर देशांमध्ये केलेल्या हस्तक्षेपाविरुद्ध आवाज उठवू लागला होता. कामगार व शोषित वर्गाच्या बाजूने बेधडक विधाने करू लागला होता. प्रिय असलेल्या दक्षिण अमेरिकन खंडाने भोगलेल्या गरिबी आणि शोषणास कारणीभूत ठरलेल्या नव-उदारमतवादी धोरणांवर कडक टीका करू लागला होता. राजकीय भूमिकेमुळे मॅराडोनाला वेळोवेळी मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. टीकाही सहन करावी लागली. पण घेतलेल्या भूमिकांशी कधी तडजोड केली नाही. तो याचे कारण विचारल्यावर म्हणाला, “फिडेलने एकदा सांगितले होते- विचारांशी तडजोड होत नाही.”
चे गव्हेराप्रमाणेच मॅराडोना केवळ आपल्या देशाच्या राजकारणावरच नाही, तर सीमेपलीकडच्या देशांच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून असायचा. मोठे ऐक्य घडवून आणणे नि वाढवत नेणे ही लांब पल्ल्याची गोष्ट असल्याचे तो सांगायचा. अलिकडच्या वर्षांत दक्षिण अमेरिकेच्या ब्राझीलसह काही देशांमध्ये उजव्या पक्षांची वाढ होत गेली. तेव्हा मॅराडोना डाव्या पक्षांचा बचाव करण्याची आणि उजव्या विचारसरणीच्या राजकरणावर हल्ला करण्याची संधी गमावत नव्हता. मॅराडोना हा क्रिस्टिना फर्नांडीजच्या नेतृत्वाचा प्रभाव असलेल्या जस्टिसिस्ट, या डाव्या मध्यममार्गी पेरोनिस्ट पक्षाचा नोंदणीकृत सदस्य होता.
मायदेश असलेल्या अर्जेटिनामध्ये, मॉरसिओ मॅक्री सरकारने गरीबांना नाडणारी नव-उदारमतवादी धोरणे लागू केली तेव्हा, मॅराडोना अनेकदा मीडिया-सोशल मीडियावर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांशी वाद घालत असे. भांडण करीत असे. आणि त्यामुळे राजकीय चर्चेलाही आवश्यक ते तोंड फुटत होते. “त्यांच्या निर्णयामुळे अर्जेंटिनिअन्सच्या दोन संपूर्ण पिढ्यांचा जीव गेला.” गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झालेल्या मॅक्रिविषयीचे मॅराडोनाचे हे तिखटजाळ शब्द होते.
आणि मॅराडोना लॅटिन अमेरिकेत विस्तारला
कॅस्ट्रोंच्या संपर्कात आल्यानंतर मॅराडोना फुटबॉल जगतापासून लांब गेला आणि तो अधिक प्रखरपणे राजकीय विधाने करू लागला. आपल्या लोकप्रियतेचा होईल तितका फायदा डाव्या चळवळींना करून देण्याची धडपड त्याने सुरू केली. तसे करताना तो बोलिव्हियन क्रांतीचा समर्थक आणि लॅटिन अमेरिकेत नव-उदारमतवादी धोरणांचा कठोर टीकाकार बनला. दक्षिण
अमेरिकेतल्या अधिकाधिक देशांनी डाव्या विचारांकडे-पक्षांकडे वळावे म्हणून १९९८ मध्ये व्हेनेझुएलापासून त्याने दौर्याची सुरुवात केली. एका देशातून दुसर्या देशात, तो सामाजिक न्यायाबद्दल भाषणे करत फिरत राहिला. निवडणुकांमध्ये समाजवादी कम्युनिस्ट विचारधारेवर आधारित डाव्या पक्षांचा धडाडीने प्रचार-प्रसार करीत राहिला. त्याची अर्जेटिनाच्या नेस्टर किर्चनर आणि क्रिस्टिना किर्चनर या दोन सर्वात पुरोगामी राष्ट्रपतींशी मैत्री होती. अर्थातच क्युबाच्या कॅस्ट्रोंसह व्हेनेझुएलाचे ह्युगो चावेझ व निकोलस मदुरो आणि बोलिव्हियाचे इव्हो मोरालेस यांचा तो प्रशंसक, समर्थक व प्रचारक होता.
मॅराडोनाने स्वत: ला अर्जेटिनापुरते जखडून ठेवले नव्हते. तो ब्राझीलला वारंवार भेट देत असे. ब्राझीलचे माजी अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या राजकीय आणि कायदेशीर छळाला त्याने जाहीरपणे विरोध केला. लॅटिन अमेरिकेतील लोकप्रिय कम्युनिस्ट सरकारांना समर्थन देण्यापासून ते जमवण्यापर्यंतच्या प्रयत्नात मॅराडोना कधीही मागे हटला नाही. त्याचे राजकारण परिष्कृत नव्हते. त्याच्या भूतकाळातल्या चुकांची डाव्या विचारसरणीच्या उच्च नैतिक मापदंडांशी एकप्रकारे विसंगती होती. परंतु, पण शुद्ध अंतःकरणाने आणि प्रामाणिक निःस्वार्थी हेतूने त्याने केलेले प्रयत्न डाव्या नेत्यांना भावले होते.
व्हेनेझुएलाचे नेते ह्युगो चावेझ देशातील गरिबांना उत्पन्नाचे पुनर्वितरण आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी योजना लागू करू पाहात होते, तेव्हा तिथे उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांचा विरोध सुरू झाला. वेळेची गरज ओळखून मॅराडोना जाहीरपणे चावेझ यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला. व्हेनेझुएलामध्ये २००७ साली झालेल्या कोपा अमेरिकेच्या सलामीच्या खेळामध्ये मॅराडोना चावेझचा सन्माननीय अतिथी होता. मार्च २०१३ मध्ये जेव्हा चावेझ यांचे निधन झाले तेव्हा मॅराडोनाने दुःख व्यक्त केले. तो म्हणाला, “माझ्या जवळचा मित्र मला सोडून गेला. ह्यूगो चावेझ यांनी लॅटिन अमेरिकेचा विचार करण्याचा मार्गच बदलला आहे. त्या आधी आम्ही युनायटेड स्टेट्सचे निष्ठावंत बनून गेलो होतो. पण ह्युगोने आमची डोकी वळवून, स्वतंत्र मार्गावर चालण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.”
एप्रिल २०१३ मध्ये मॅराडोनाने चावेझ यांच्या समाधीस भेट दिली. समाजवादी नेत्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे उत्तराधिकारी निकोलस मादुरो यांची निवड करण्याचे जनतेला आवाहन केले. तिथच्या न्यूज चॅनेल्सवर “संघर्ष सुरू ठेवा” असे आवाहन केले. निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होत कराकसमधील माडोरोच्या अंतिम प्रचार मोहिमेस हजेरी लावली. फुटबॉलवर स्वाक्षर्या केल्या आणि मादुरोला अर्जेटिनाची जर्सी भेट दिली.
२०१७ मध्ये, जेव्हा व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने निर्बंध कडक जारी केले, तेव्हा मॅराडोना खंबीरपणे मदुरोच्या बाजूने उभा राहिला. त्याने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर लिहिले- “मी डाव्या सरकारसाठी संघर्ष करायला तयार आहे. आम्ही मरेपर्यंत चावेजवादी आहोत, जेव्हा मादुरो आदेश देईल, मी साम्राज्यवादाविरुद्ध व्हेनेझुएलाचा शिपाई म्हणून पुढे येईन. मी सैनिकाची वर्दी घातली आहे, जी आपल्याकडची सर्वात पवित्र गोष्ट आहे. क्रांती चिरायू होवो !! ”
व्हेनेझुएलामधील २०१८ च्या अध्यक्षीय निवडणुकीत निवडणूक प्रचार सभेत मॅराडोनाने भाग घेतला होता आणि तो नाचत गाजत प्रचारात फिरत होता. मदुरो यांना ६७.८ टक्के मते मिळून ते आणखी सहा वर्षासाठी पुन्हा निवडून आले. निकाल कळल्यावर त्याने आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले. “काल, व्हेनेझुएलाने पुन्हा निकोलस मादुरोला पाठिंबा दर्शविला. व्हेनेझुएलियन्सना हल्ला नको आहे. चांगल्या व्हेनेझुएलवासीयांनी कमांडर ह्युगो चावेझचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी पुन्हा त्यांची निवड केली. आज व्हेनेझुएला कायमस्वरूपी मुक्त आहे”
मॅराडोना आणि अमेरिका
मॅराडोनाने नोव्हेंबर २००० मध्ये, अमेरिकेने अर्जेंटिनाच्या मार डेल प्लाटा येथे भरवलेल्या शिखर परिषदेत बोलिव्हियाच्या इव्हो मोरालेस आणि व्हेनेझुएलाचे ह्युगो चावेझ यांच्यासह भाग घेतला होता, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी अमेरिकेसाठीच्या फ्री ट्रेड एरियासाठी (एफटीएए) दबाव आणला होता. यातून अमेरिकन कंपन्यांना गडंगज नफा तर दक्षिण अमेरिकन देशांची व त्यांच्या नैसर्गिक संसाधंनांची आर्थिक लूट होणार होती. डाव्या नेत्यांबरोबर उभे राहून मॅराडोनाने एफटीएएला यशस्वीपणे विरोध केला. “मी पूर्णपणे डाव्या बाजूचा आहे” असे मॅराडोना ठामपणे म्हणत अमेरिका देत असलेल्या निर्बंधांच्या धमक्यांविरुद्ध लॅटिन अमेरिकेच्या प्रतिरोधाचा तो एक प्रतीक बनला होता.
मॅराडोनामध्ये साम्राज्यशाही व भांडवलशाही विरोध ठासून भरला होता. आयुष्यभर त्याने याचा विरोध केला. त्यासाठी त्याने मुक्त व्यापारविरोधी निषेध सभांमध्ये भाग घेतला होता. २००५ मध्ये जॉर्ज बुश यांच्या अर्जेटिना दौर्याच्या वेळी, निषेध सभा झाल्या होत्या. त्यांच्या प्रमुख आयोजनकर्त्यांमध्ये मॅराडोना एक होता. एका स्टेडियममध्ये बुशविरोधी रॅली भरली होती. त्या वेळी त्याने परिधान केलेला टी शर्ट आणि त्यावर बुशच्या प्रतिमेवरची ‘मानवी कचरा’ अशी ओळ लक्षवेधी ठरली होता. चावेझ यांच्या सोबतच्या एका मेळाव्यात “स्टॉप बुश” असा संदेश लिहिलेला शर्ट घालून त्याने भाषण केले होते. त्यात तो म्हणाला होताः “जॉर्ज बुश या मानवी कचर्याची उपस्थिती नाकारण्याचा मला अर्जेटिनियन म्हणून अभिमान वाटतो.”
२००५ मध्ये अर्जेंटिनाच्या मार डेल प्लाटा व ब्रुनोस आयरिस शहरांमध्ये अमेरिकेच्या एएलसीए मुक्त व्यापार करारासाठी होणार्या चौथ्या शिखर परिषदेच्यावेळी प्रचंड निषेध सभा झाल्या. त्यात करण्यात आलेल्या भाषणात मॅराडोना म्हणाला, ‘कोल्हा आणि कोंबड्या यांना एकाच ठिकाणी एकाच वेळी समानतेचे स्वतंत्र दिले जाऊ शकत नाही’. त्याकाळात तो बुश राजवटीचा आणि इराक युद्धाचा ठाम विरोधक होता आणि बुशला युद्ध गुन्हेगार म्हणून घोषित करणारी स्लोगन्स असलेले टी-शर्टस घालायचा. एकदा तो म्हणाला, “अमेरिकेतून येणाऱ्या सर्व गोष्टींचा मला तिरस्कार आहे. मी माझ्या सर्व सामर्थ्याने त्याचा द्वेष करतो.” या भावनेने त्याला या देशाने बुटाखाली चिरडलेल्या इतर देशांच्या कोट्यवधी लोकांचा नायक बनविले. तो एका मुलाखतीत म्हणाला होता- “अर्जेंटिनामध्ये बुशला विरोध करणारे बरेच लोक आहे. परंतु त्यात मी पहिला आहे. त्याने आमचे बरेच नुकसान केले. तो एक खुनी आहे; तो आमच्याकडे खाली वाकून पाहतो आणि आम्हाला पायदळी तुडवितो. त्याने माझ्या देशाच्या जमिनीवर पाय ठेवले, तर मी माझ्या मुलीसमवेत मोर्चा काढणार आणि त्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.”
मॅराडोनाला एका वैयक्तिक खटल्यासाठी अमेरिकेला जायचे होते. त्यासाठी अमेरिकन सरकारची परवानगी मिळणे होते. त्याच दरम्यान व्हेनेझुएला नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्याला डॉनल्ड ट्रम्पबद्दल त्याचे मत विचारण्यात आले. मॅराडोनाने त्याच्या शैलीत उत्तर दिले–“तो ‘करोलिता’ आहे”. त्याचे हे म्हणणे जगभरातल्या टीव्ही वाहिन्यांवर दाखवले गेले. हे एक वाक्य ट्रम्प महाशयांच्या इतक्या जिव्हारी लागले, की पित्त खवळलेल्या ट्रम्पसाहेबांनी त्याचा व्हिसा रद्द करू अमेरिकेची दारे त्याच्यासाठी कायमची बंद करून टाकली. ‘करोलिता’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ, दुसर्यांची भाषा बोलणारी बाहुली. आपल्याकडे रामदास पाध्ये हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ दाखवतात. मॅराडोनाच्या मते ट्रम्प हे जगभराच्या नैसर्गिक संसाधने आणि संपत्तीवर ताबा मिळवण्याचा हव्यास सुटलेल्या अमेरिकी भांडवलदारांच्या हातातले बोलके बाहुले होते.
‘मॅराडोना इन मॅक्सिको’ या माहितीपटात एक दृश्य आहे, सिनालोआ इथल्या डोराडोस या अत्यंत सुमार क्षमता असलेल्या दुय्यम दर्जाच्या टीमचे त्याने प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर अचानक हा संघ प्रकाशझोतात आला. त्या संदर्भाने एका पत्रकाराने त्याला विचारले, डोराडोसला स्थानिक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकवत ठेवणे हे त्याचे काम आहे का, ज्याला मॅराडोना गंभीरपणे उत्तर देतो- “जर ते मॅराडोनाबद्दल बोलत नाहीत, तर ते कशाबद्दल बोलतील? ते ट्रम्पबद्दल बोलतील? तो रबरी बाहुला?”
मॅराडोना आणि मध्य-पूर्व देश
मध्य-पूर्वेतल्या अरब देशांमध्ये सर्व वयाचे संघर्षशील लोक मॅराडोनाकडे स्वातंत्र्य, चळवळ आणि अभिव्यक्तीचे प्रतीक म्हणून पाहतात. त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. २००४ मध्ये इराकवर करण्यात आलेल्या हल्ल्याविरोधात आवाज उठवत ठिकठिकाणच्या निषेध मोर्चांमध्ये मॅराडोना सहभागी झाला होता. नव्हे, मॅराडोना मध्य पूर्वेतल्या युद्धखोर अमेरिकेच्या हस्तक्षेपाविरोधात कायमच निषेध नोंदवत आला होता. सिरियात नागरी युद्धाला धग देणाऱ्या अमेरिकेच्या भूमिकेबद्दल विरोधाचे सूर मांडत आपले मत व्यक्त करताना तो म्हणाला होता: “अमेरिका सीरियाचे अस्तित्व पुसून टाकू इच्छित आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला विद्यापीठात जाण्याची गरज नाही.” स्वाभाविकपणे, सीरियात त्याचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. याचा प्रत्यय इडलिब प्रांतातील बिनीशमध्ये, अझीज अस्मर या कलावंताने मॅराडोनाच्या सन्मानार्थ भित्तीचित्र उभे करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली, तेव्हा आला होता.
१९८६ च्या वर्ल्ड कप फायनलनंतर जगप्रसिद्ध पॅलेस्टाइन कवी महमूद दारविश (विसाव्या शतकातले श्रेष्ठ मानवतावादी कवी, पॅलेस्टिनी लढ्याचे खंदे समर्थक फैज अहमद फैज यांचे दारविश हे बैरुत वास्तव्याच्या दरम्यानचे जवळचे मित्र-मार्गदर्शन होते.) यांनी फुटबॉल सामन्याच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात मॅराडोनाच्या रक्तात रक्त नव्हे, तर मिसाइल्स वाहत असल्याचे म्हटले होते. मॅराडोना नेहमी पॅलेस्टाइन- इस्रायल वादात पॅलेस्टाइनच्या बाजूने राहिला होता. २०१२ मध्ये, दुबईस्थित क्लब अल-वसलचे व्यवस्थापन करीत असताना मॅराडोनाने पत्रकारांना सांगितले: “मी पॅलेस्टाइन लोकांचा पहिला क्रमांकाचा चाहता आहे. मी त्यांचा आदर करतो आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.” तो त्या वेळी असेही म्हणाला की, ब्युनोस आयरिसच्या झोपडपट्टीत वाढलेला फॅक्टरी कामगाराचा मुलगा म्हणून पॅलेस्टिनी लोकांना माझी नेहमीच सहानुभूती राहील.
२०१५ मध्ये एएफसी आशियाई चषक स्पर्धेदरम्यान पॅलेस्टाइन फुटबॉल असोसिएशनबरोबर पॅलेस्टाइन राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्याबाबत मॅराडोनाशी चर्चादेखील झाली होती. इतकेच नव्हे, २०१८ मध्ये मॅराडोनाने रशियामधील मॉस्को येथे फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान पॅलेस्टाइन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली. अब्बासना स्वाक्षरीकृत राष्ट्रीय संघाचा टीशर्ट भेट दिला. म्हणाला, “मनाने मी पॅलेस्टिनी आहे.” पॅलेस्टिनी अरब समाजाबद्दल अशी आपुलकी अशा जिव्हाळा असल्यानेच मॅराडोनाच्या निधनावर हमासचे प्रवक्ते सामी अबू झुहरींपासून ते पॅलेस्टाइन फुटबॉल राष्ट्रीय संघाचे माजी प्रशिक्षक जमाल महमूदपर्यंतच्या अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
मधल्या काळात लिबियाचे हुकुमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी यांनी जागतिक आर्थिक शक्तींविरोधात आफ्रिकन राष्ट्रांची एकजूट घडवून आणण्याचे प्रयत्न चालवलेले होते. याला मॅराडोनने जाहीर समर्थन दिले होते. तो पाश्चात्य शक्तींनी लादलेल्या नाकाबंदीविरूद्ध लिबियाच्या समर्थकांपैकी एक होता.
आमी तोमाये भालोबाशी
बंगाल आणि दक्षिण अमेरिकेचे नाते तसे खोलवर रुजलेले. कोलकाताजवळील बंगालच्या आरबेलिया गावाचे नरेंद्र नाथ भट्टाचार्य म्हणजेच मानवेंद्र नाथ रॉय यांनी १९१९ मध्ये सोव्हिएत युनियनच्या बाहेर पाहिल्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली, तो मेक्सिकन कम्युनिस्ट पक्ष होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ची स्थापना केली. अर्जेंटिनियन लेखक ओकॅम्पो यांच्या सॅन इसिड्रो इथल्या व्हिला मिरॅलिरिओ येथे १९२४ साली रवींद्रनाथ टागोर यांनी दोन महिने मुक्काम करून साहित्यिक देवाणघेवाण केली होती. नंतर ओकॅम्पो यांनी १९३० मध्ये पॅरिसमध्ये टागोरांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. दोन्ही देशांमध्ये दारिद्र्य आणि शोषणाची परिस्थिति सारखी असल्यानेच साहित्यात ती प्रतिबिंबित होत गेली आणि बंगाल व अर्जेंटिनाचे सूत जुळत गेले.
फुटबॉलचे वेड आणि कम्युनिस्ट विचार या दोन्ही बाबतीत साम्य असल्याने चे आणि फिडेलला आदर्श मानणार्या मॅरेडोनाचे २००८ मध्ये प. बंगाल येथे भव्य स्वागत करण्यात आले. मॅरेडोनाच्या शब्दांत कोलकात्यातले त्याचे झालेले स्वागत “नापोलीनंतरचे (इटलीमधला मॅराडोनाला यशोशिखरावर पोहोचवणारा फुटबॉल क्लब) दुसरे सर्वात मोठे स्वागत” होते. २०१७ ला तो पुन्हा आला. त्याच्या शहरापासून १६,५०० कि.मी. अंतरावर असलेल्या भारताशी त्याचे भावनिक नाते असल्याचे तो सांगायचा. केरळ आणि पश्चिम बंगाल ह्या दोनही फुटबॉलवेड्या आणि कम्युनिस्ट विचाराकडे कल असलेल्या राज्यांमध्ये येण्याचा मॅराडोनाला विलक्षण आनंद झाला होता. गरिबीतून उठून संघर्ष करू पाहणार्या फुटबॉलपटूंना प्रेरणा देण्यासाठी २०१७ मध्ये कोलकाता येथे १९८६ च्या विजयाची आठवण म्हणून मॅराडोनाचा १२ फुटी उंच पुतळा बसवण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन खुद्द मॅराडोनानेच केले. याच भेटीदरम्यान तो सॉल्ट लेक स्टेडियम येथे चॅरिटी सामना खेळला, तेव्हा कोलकात्याला अक्षरशः उधाण आले होते. कोलकाता येथील न्यू टाऊनमधील मदर वॅक्स म्युझियममध्येसुद्धा त्याचा डाव्या पायाने कीक मारतानाचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्या अर्थाने, मॅराडोना नावाची अख्यायिका भारताने कायमस्वरुपी जपून ठेवली आहे.
मॅराडोना आणि चर्च
मॅराडोना धार्मिक वृत्तीचा कॅथलिक ख्रिस्ती होता. पण धर्माच्या आड चाललेल्या ढोंगबाजीचा त्याला प्रचंड तिटकारा होता. २००० मध्ये जेव्हा त्याने व्हॅटिकन चर्च आतून पहिले. तो म्हणाला, “मी व्हॅटिकनमध्ये गेलो. सोन्याने मढलेले ते छप्पर पाहिले. मनात आले, सोन्याच्या छपराखाली राहिलेली कुत्र्याची अवलाद गरीब देशांत जाऊन पूर्ण भरलेल्या पोटाने गरीब मुलांचे चुंबन कसे काय घेऊ शकते? मी जे पहिले, माझा विश्वासच उडून गेला.” हे उघडच होते, की मॅराडोनाला पोपचा रहस्यमय
दिखाऊपणा आवडत नसे. २०१६मध्ये तो पुन्हा एका चॅरिटी सॉकर (फुटबॉल) सामन्यासाठी गेला असताना त्याने पोप फ्रान्सिसला भेट दिली होती आणि त्याच गोष्टी सुनावल्या. म्हणाला, चर्चला गरीब मुलांच्या भल्याबद्दल काळजी वाटत आहे… अरे, मग तुमचे सुवर्ण छत विका की, काहीतरी करा ना!”
१३ मार्च २०१३ रोजी अर्जेंटिना इथे जन्मलेल्या जॉर्ज मारिओ बर्गोग्लियो यांना पोप फ्रान्सिसको या नव्या नावाने कॅथोलिक चर्चचा प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी स्टेटचा सार्वभौम म्हणून निवडण्यात आले. आहे. फ्रान्सिस हे दक्षिणी गोलार्धातील पहिले आणि युरोपच्या बाहेरून आलेला पहिले पोप होते. ते त्यांच्या तरुणपणापासून डाव्या विचारांचे समर्थक होते. तिथल्या हुकुमशाहीविरुद्ध झालेल्या उठवात चर्चच्या पारंपरिक भूमिकेविरुद्ध जाऊन अनेक डाव्या समर्थक चर्च, धर्मगुरू आणि नन्स यांना सोबत घेऊन आंदोलने केली होती. गर्भपात, समलैंगिक संबंध, वित्तीय भांडवलशाही, बँका आणि उजव्या राजकारण्यांवर ते जाहीरपणे टीका करत आले होते. रोमन कॅथलिक चर्चच्या मध्ययुगीन विचारांच्या परंपरावादी भूमिका बदलण्यासाठी ते आग्रही होते. बर्गोग्लियो यांनी पोप म्हणून निवड झाली, तेव्हा मॅराडोनाने पहिल्यांदा त्याचा विश्वास परतल्याचे सांगितले. तो बोलला- “मी चर्चपासून दूर गेलो होतो, परंतु फ्रान्सिस्कोने मला परत आणले”. यानंतर मॅराडोना पुष्कळ वेळा फ्रान्सिस्को बर्गोग्लियो यांना भेटत राहिला.
………
केवळ फुटबॉलमधील दर्जेदार खेळामुळेच नव्हे, तर जगातील बलाढ्य शक्तींच्या विस्तारवाद आणि शोषणाविरोधात ठाम भूमिका घेतल्याबद्दलही मॅराडोनाची इतिहासात नोंद घेतली जाईल. खेळातून प्रचंड पैसा मिळवण्यामुळे खेळाडू वेगळे ठरत नाही, तर समाजाच्या भल्यासाठी निधड्या छातीने उभे राहणे, त्यांना इतरांपासून वेगळे बनवते, याचा आदर्शही मॅराडोना नावाचा हा लिजंडची आठवण काढताना चर्चेला येत राहील.
(लेखक कायद्याचे आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत. )
(साभारः मुक्त संवाद नियतकालिक, १ फेब्रुवारी २०२१)
COMMENTS