राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० ने वाढ

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० ने वाढ

मुंबई : कोरोना (कोविड १९) ग्रस्तांच्या महाराष्ट्रातील संख्येत रविवारी १० ने वाढ झाली असून यातील ५ बाधित हे स्थानिक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे या

राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण
राज्यात ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाचे ८ रुग्ण
वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

मुंबई : कोरोना (कोविड १९) ग्रस्तांच्या महाराष्ट्रातील संख्येत रविवारी १० ने वाढ झाली असून यातील ५ बाधित हे स्थानिक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७४ झाली आहे. या १० बाधितांपैकी ६ रूग्ण मुंबईतील आहेत आणि ४ रूग्ण पुण्यातील आहेत. राष्ट्रीय स्तरावरील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३६० वर गेला आहे आणि रविवारी मुंबईतील एका बाधिताचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला मुंबई आणि महाराष्ट्रात संध्याकाळी ५ पर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लोकांनी उत्साहाच्या भरात रस्त्यांवर उतरून जनता कर्फ्यूच्या उद्देशाचे तीनतेरा वाजवले.

दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या २-४ ने वाढत होती. परंतु मागील दोन दिवसांत ही संख्या प्रत्येकी १० ने वाढली आहे. रविवारी नव्याने बाधित झालेल्या १० रूग्णांपैकी पाच रूग्ण हे स्थानिक आहेत. कोरोनाचा संसर्ग स्थानिक पातळीवर वाढल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सीमा बंद केल्या आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत लोकल रेल्वे, लांब पल्ल्याच्या गाड्या, एसटी सेवा, खासगी बस सेवाही बंद केल्याची आणि संपूर्ण राज्यात जमावबंदीचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आवश्यकता असेल तर हा लॉकडाऊन ३१ मार्चनंतरही वाढवण्यात येईल. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांचं कामकाजही २५ टक्के कर्मचाऱ्यांऐवजी फक्त ५ टक्के कर्मचारी करतील असंही ते म्हणाले. रविवारी मध्यरात्रीपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद केल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आता बाहेरून येणाऱ्या संसर्गांचा प्रश्न उरणार नाही, फक्त आपण आता तिसऱ्या टप्प्यात असल्यामुळे या विषाणूने बाधितांची संख्या गुणाकाराने वाढेल. त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. तरीही आपण घाबरण्याचं कारण नाही, आपल्या यंत्रणा सज्ज आहेत, आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी जनतेला आश्वस्त केलं.

मध्यरात्रीपासून परदेशातून येणाऱ्या विमानसेवा बंद होणार असल्यामुळे आतापर्यंत आलेल्या लोकांना विलगीकरणातच ठेवलेलं आहे आणि आताही येणाऱ्या सर्व लोकांना विलगीकरणात ठेवण्यात येईल. परंतु आतापर्यंत होम क्वारंटाइनचा शिक्का मारून घरी पाठवलेल्या रूग्णांनी घरीच थांबावं आणि समाजात या विषाणूचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा वगळता जनजीवन ठप्प झालं आहे. त्यात आता रेल्वेही बंद झाल्यामुळे मुंबईकरांना बाहेर जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जमावबंदीचे आदेश दिल्यामुळे पाचपेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकणार नाहीत.

मुंबई व महाराष्ट्रात फक्त बेस्ट आणि एसटी सेवा या जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच येत्या ३१ तारखेपर्यंत सुरू राहतील. किराणा, भाज्या, दूध, वीज, पाणीपुरवठा, बँका, शेअरबाजार या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर सर्वांनी वर्क फ्रॉम होमच करावे किंवा सुट्टीवर राहावे. कुठल्याही परिस्थितीत लोकांनी घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं लोकांसाठी बंद राहतील. तेथील पूजा-अर्चा सुरू राहील, पण लोकांना तिथे जाता येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी खासगी आस्थापनांना लोकांना किमान वेतन देण्याचंही आवाहन केलं.

देशभरातील ७५ जिल्हे लॉकडाऊन

दरम्यान दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधील ७५ पेक्षा अधिक जिल्हे लॉकडाऊन केलेले असून या राज्यांनी आपल्या सीमाही बंद केलेल्या आहेत. त्यामुळे या राज्यांमधील दळणवळण थंडावलं आहे. केरळमध्ये नव्याने १५ कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे.

जनता कर्फ्यूचा फज्जा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला महाराष्ट्रातल्या जनतेने संध्याकाळी ५ पर्यंत उत्तम प्रतिसाद दिला. दुकानं, वाहतूक हे सारं काही ठप्प होतं. रस्ते पूर्णपणे मोकळे आणि ओसाड असल्याचं दिसत होतं. संध्याकाळी ५ वाजता लोकांनी आपापल्या दारं, बाल्कनी, खिडक्यांमध्ये येऊन कोरोनाचा सामना करणाऱ्या आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांचा टाळ्या वाजवून गौरव करावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं होतं. मात्र लोकांनी अतिउत्साहाच्या भरात जमावबंदीचे आदेश पायदळी तुडवले. ठिकठिकाणी लोकांनी रस्त्यांवर उतरून एखादी लढाई जिंकल्याच्या आवेशात जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी लोकांनी थाळ्यांनी गरबा खेळला तर काही ठिकाणी ढोलताशे वाजवले, अनेकांनी तर फटाकेही वाजवले. यामुळे जनता कर्फ्यूचं उद्दिष्ट तर अपूर्ण राहिलंच पण संपूर्ण जगात देशाची मान शरमेने खाली गेली. अनेक ठिकाणी लोक रस्त्यांवर गर्दी करून डॉक्टर्स आणि नर्सेसच्या अगदी जवळ जाऊन त्यांना फुलं वाटत होते. या घटनेचा इव्हेंट साजरा करून सरकारचे प्रयत्न धुळीला मिळवण्यासाठी जनता किती उत्सुक आहे हे ठिकठिकाणी दिसलं. गांभीर्याचा अभाव आणि काहीही असो, साजरं करण्याची भावनाच त्यातून दिसली.त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करून सर्व लोकांना घरी पिटाळावं लागलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत घराबाहेर येऊन टाळ्या वाजवल्या आणि या सेवाव्रतींना प्रोत्साहन दिलं.

महाराष्ट्र आता पूर्णपणे लॉकडाऊन झालेला आहे. पुढचे काही दिवस राज्यासाठी आणि एकूणच देशासाठी संवेदनशील आणि चिंताजनक असणार आहेत. मागच्या काही दिवसांत मुंबई, पुणे तसेच देशाच्या इतर भागांमधून आणि परदेशांमधून परतलेले अनेक लोक आपापल्या गावी गेले आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी खेड्यापाड्यांमध्ये घरोघरी जाऊन अशा लोकांबद्दल विचारणा करत असून त्यांची माहिती नोंदवली जात आहे. तसेच त्यांच्या लक्षणांच्या तपासण्याही सुरू केल्या गेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमीत कमी व्हावा आणि परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेले दिसून येत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0