दिव्यांचा अंधःकार

दिव्यांचा अंधःकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला लोकांनी इतका प्रतिसाद दिला, की ज्यांनी स्वेच्छेने दिवे लावले नाहीत आणि घरातील लाईट बंद केले नाहीत, त्यांना दमदाटी करण्यात आली.

लॉक डाऊनचा पर्याय अपुरा – जागतिक आरोग्य संघटना
मोदींची उघडलेली मूठ…अर्थात संघ काय करणार?
राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना रविवारी रात्री कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपण सगळे एक आहोत, हे दाखवण्यासाठी घरातील दिवे घावून पणती, मोबाईलचे फ्लॅश, असे दिवे लावण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन ऐच्छिक होते. पण काही जणांनी याचा अर्थ वेगळाच घेतला. काही जणांनी फटाके उडवले, काही जणांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. तर काही जण रस्त्यावर आले.

ज्यांनी दिवे लावले नाहीत, त्यांना धमक्या देण्यात आल्या. दमदाटी केली गेली. घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगोदरच कोरोनामुळे घबराट पसरली असताना अजून ही एक वेगळी दहशत निर्माण झाली आहे.

यातील काही अनुभव त्यांच्याच शब्दात.

– पुण्यात सिद्धार्थ प्रभुणे यांचा अनुभव

स्थळ – आमचे घर, एरंडवणे,पुणे
वेळ – रात्री ८.४५  आम्ही सगळे गच्चीत गेलो. घरातल्या आणि गच्चीतल्या लाईट सुरू होत्या. छान गप्पा मारत बसलो होतो. ९ वाजले. आजूबाजूला लोकांनी पणत्या, मेणबत्या लावल्या. घरातले लाईट घालवले.
आमच्या घरात लाईट चालूच होते. कारण मी आजारी होतो…
आमच्या समोरच्या घरात राहणारे बिल्डर (श्री.गजेंद्र पवार) जोरात ओरडले. लाईट बंद करा. आम्ही शांत बसलो. ते २-३ वेळा ओरडले. आम्ही शांत बसलो. नंतर ते आम्हाला जोरात ओरडून ‘नालायक’ म्हणाले.  आम्ही शांत बसलो. ते खाली आले. शेजारील लोकांना गोळा करून आरडा-ओरडा करायला लागले. हे नालायक आहेत. नीच आहेत. कधीच ‘भारत माता की जय’ म्हणणार नाहीत. पोलीस तक्रार करतो. देशद्रोही आहेत हे. ३ महिने जेलमध्येच पाठवतो, घरातून बाहेर निघू देत नाही. बघूनच घेतो, माजले आहेत साले, इत्यादी. म्हणत होते.
या सरळसरळ धमक्या आहेत आणि संपूर्ण कुटुंबाला घाबरवणे आहे…
हे पंतप्रधानांनी केलेले आवाहन होते,आणि ते ऐच्छीक होते.या बाबतीत अशी दादागिरी करणे अतिशय चुकीचे आहे.

– मुंबईमध्ये शेखर देशमुख यानाही असाच अनुभव आला.

आपल्या देशाचे रुपांतर एका झुंडीमध्ये होत असल्याचे काल दिसून आले. ५ तारखेला आम्ही रात्री घरामध्ये बसलो होतो आणि लाईट सुरु होते. ९ वाजल्यावर सोसायटीतील इतरांचे लाईट गेले मात्र आमच्या घरातील लाईट सुरूच होते. हा आमच्या इच्छेचा विषय होता. मात्र अनेक लोकांनी त्यांच्या गच्चीत येऊन आमच्या घराच्या दिशेने मोबाईलचे फ्लॅश टकले आणि ‘ए लाईट बंद करो, भारत माता की जय’, अशा घोषणा दिल्या. हा प्रकार बराच वेळ सुरु होता. मला समाजात नाही, की हा काय प्रकार आहे. आपण कोरोनाशी सामना करतोय, की या सगळ्या उन्मादी दहशतवादाशी?

– नाशिकच्या काजल बोरास्ते यांचा अनुभव

रात्रीचे ते ऐतिहासिक ९ वाजत आले. हळूहळू आजूबाजूच्या घरांमधले दिवे बंद होऊ लागले. मी दिवे बंद करणार नाही हे आधीच ठरवलं होतं. संपूर्ण कॉलनीतल्या सगळ्या घरांमधले दिवे एकसाथ बंद आणि फक्त माझ्या घरातले लाईट सुरू.

हळूहळू शेजारपाजारचे लोक खुसपुस करायला लागले. मग एका शेजाऱ्याने ओरडून, अधिकारवाणीने दिवे बंद करायच्या सूचना दिल्या. करणार नाही हे सांगितल्यावर ‘दळभद्री पोर’ अशा अर्थाच्या नजरेने पाहत नाराजी दाखवली. मग एकेक करत समोरच्या बिल्डिंगमधल्या बायका आईला फोन करून घरातली लाईट बंद करा हे सांगायला लागल्या. दिवे का बंद करायचे नाही याचे कारण घरातल्यांना पटवून त्यांची संमती मिळवून हे केलं होतं. इतका वेळ माझ्या निर्णयाला पाठिंबा देणारी आई लोकांचे फोन यायला लागल्याने जरा बिथरली. “का असं उगाच वाकड्यात जायचं, सगळे करताय तर आपणही करायला काय हरकत!” म्हणत विरोधाचा सूर काढायला लागली.

या सगळ्यांच्या सुरुवातीला आपण आपला विरोध व्हिज्युअली दाखवु शकतोय याचं मलाही कौतुक वाटत होतं. ९ मिनिटांपैकी पहिली ५ मिनिटं सरल्यावर आजूबाजूच्या अंधारात फक्त माझंच घर कसं लख्ख चमकून प्रवाहाच्या विरुद्ध पोहतंय हे ठळक व्हायला लागलं. लोक माना वर करून बघायला लागली. एकमेकांना दाखवु लागली. अंधाराच्या विरोधात जाऊन आपण प्रकाशाची वाट उजवत असू, तर किती एकटे असतो हे भयासकट जाणवलं. तुम्ही फक्त एकटे आहात याचं भय नाही तर तुम्ही एकटे आहात म्हणून चूक ठरता आणि बहुसंख्यांक गटाकडून मग तुम्ही दडपले जातात याचं भय! आपल्या देशात अल्पसंख्याकांना वाटणारी असुरक्षितेची भावना नेमकी काय असेल हे दाखवून देणारी ही ९ मिनिटं होती! सवंग प्रवृत्तीने तुमचा समुदाय करत असलेली गोष्ट तुम्ही विवेकाने नाकारत असाल तर तुम्ही करंटे आणि समाजद्रोही ठरतात. या साऱ्या असुरक्षित भावनांचा आणि भीतीचा शेवट ९ मिनिटात होणार हे माहीत होतं पण येत्या काळातली परिस्थिती बहुसंख्याकांच्या गोटातला विचार नाकारून नवीन विचार करणाऱ्यांसाठी किती अवघड असणार आहे याचा ट्रेलर, या ९ मिनिटांनी दाखवून दिला.

औरंगाबादमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आहेत आणि एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच सह्यांद्री नगर भागामध्ये फटाके वाजविण्यात आले.

पत्रकार महेश देशमुख यांनी लिहिले आहे, “औरंगाबादेत आज दहा पॉझीटीव्ह आढळले, एकाचा मृत्यू झाला. रात्री मुर्खांनी फटाके फोडून दिवाळी केली.”

त्याच भागात राहणाऱ्या दिपाली कुलकर्णी यांनी लिहिले आहे, “जे गेले ते आमचे शेजारी होते. एरिया सील केलाय. दिवसभर फवारणी चालू होती. भयंकर तणाव होता आणि आता शेजारच्याच घरातले लोक फटाके उडवत होते.

दिवा लावणं मान्यच होतं. खरतर त्यांना श्रद्धांजली म्हणून दिवा लावायला हरकत नव्हतीच. पण मूर्ख लोकं फटाके उडवत होते, त्यांच्या घरासमोर. विवेक कुठे गहाण टाकतात देव जाणे.”

सोलापूरच्या विमानतळ परिसरामध्ये दिवे लावण्याच्या प्रकारामध्ये एका जुन्या विहिरीला आग लावण्यात आली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे, की देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0