मुंबई: दक्षिण आफ्रिका व आफ्रिकेतील काही देशांत सापडलेल्या ‘B.1.1.529’ या कोरोनाच्या नव्या प्रकारानंतर (व्हेरिएंट) महाराष्ट्र सरकारने कोविड नियमावली अध
मुंबई: दक्षिण आफ्रिका व आफ्रिकेतील काही देशांत सापडलेल्या ‘B.1.1.529’ या कोरोनाच्या नव्या प्रकारानंतर (व्हेरिएंट) महाराष्ट्र सरकारने कोविड नियमावली अधिक कडक करण्याचा निर्णय शनिवारी घेतला आहे. केंद्र सरकारनेही या संदर्भात द. आफ्रिका, सिंगापूर येथून येणार्या विमानांमधील प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. द. आफ्रिकेहून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांना कोविडची लागण झाल्याचे शनिवारी लक्षात आले. हा कोविड नेमक्या कोणत्या कोरोना विषाणूमुळे झाला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण या घटनेनंतर कर्नाटक सरकारने परदेशातून येणार्या प्रवाशांची कसून तपासणी केली जाईल अशी घोषणा केली आहे.
राज्य सरकारने जारी केलेले कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम असेः
कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. कोविड अनुरूप वर्तनाचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे, सर्व संस्थांनी त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा कार्य करताना त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था जबाबदार असतील. सर्व कर्मचार्यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner) इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.
नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा. पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ व निर्जंतुक करा. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिंकावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करा.
कोविड अनुरूप वर्तनविषयक नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती व संस्थांना दंड :
कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था, आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.
ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थाना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.
जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९-ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,
तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सींना, नियमभंग केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.
वारंवार नियमभंग केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता
तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे, कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.
राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPassBot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले ‘कोविन प्रमाणपत्र देखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रवास
महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे त्यांना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
कोणताही कार्यक्रम, समारंभामधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये
कोणताही कार्यक्रम, समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियमप्रमाणे) संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशा क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.
कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे स्थानिक प्रशासन काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर स्थानिक प्रशासनाला सदर कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे अधिकार
कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत. मात्र, जाहीर नोटिसीद्वारे ४८ तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास, अंमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले कोणतेही निर्बंध जर ते पुढे चालू ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर ते ४८ तासांनंतर अंमलात असल्याचे बंद होतील.
संपूर्ण लसीकरणाची व्याख्या
संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. किंवा कोणतीही १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.
COMMENTS