न्यूझीलंडमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात?

न्यूझीलंडमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात?

कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या जगातील अनेक देशांमध्ये दिवसागणिक वाढत असतानाच न्यूझीलंड मात्र ही साथ आटोक्यात आणण्याच्या दिशेने द

तेलुगू कवी वरवरा राव यांना कोविड-१९ची लागण
करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला
कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले

कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या जगातील अनेक देशांमध्ये दिवसागणिक वाढत असतानाच न्यूझीलंड मात्र ही साथ आटोक्यात आणण्याच्या दिशेने दमदार पावले टाकत आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोना प्रादुर्भाव झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे.

९ एप्रिल रोजी देशात २९ नवीन कोरोना पॉझिटिव तसेच संशयित रुग्णांची नोंद झाली. यामुळे न्यूझीलंडमधील एकूण रुग्णांची संख्या १,२३९ झाली आहे. यापैकी केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १४ जण रुग्णालयात आहेत, तर ३१७ या आजारातून बाहेर आले आहेत.

 न्यूझीलंड हे एक छोटेसे द्विपराष्ट्र आहे. लोकसंख्या ५० लाखांहून कमी आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठीच नव्हे तर मुळापासून नष्ट करण्यासाठी न्यूझीलंडने जाहीर केलेल्या महिनाभराच्या लॉकडाउनपैकी निम्मा काळ सरला आहे. एकंदर आत्तापर्यंत न्यूझीलंडचा कोरोनाविरुद्ध चाललेला लढा यशस्वी म्हणण्यासारखा आहे. देशाची परिस्थिती सुधारत आहे, असे पंतप्रधान जसिंदा अर्डर्न यांनी गुरुवारच्या भाषणात नमूद केले. अर्थात तूर्त लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परिस्थिती इतपत आटोक्यात आल्यानंतर अनेक राष्ट्रांनी लॉकडाउन शिथिल करण्याबद्दल विचार सुरू केला आहे. किमान ५,५९७ रुग्ण आणि २१८ मृत्यू अशी स्थिती असलेल्या डेन्मार्कने हीच स्थिती कायम राहिल्यास पुढील आठवड्यात लॉकडाउन शिथिल करणार, अशी घोषणा केली आहे. याउलट न्यूझीलंडमधील स्थिती याहून अधिक आटोक्यात असूनही, सीमेवरील निर्बंध अधिक कडक करण्याची घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी केली आहे. परदेशांतून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वत:च्या घरात विलग न राहता (होम क्वारंटाइन) मान्यताप्राप्त आस्थापनांत दोन आठवडे घालवावे असा नियम केला जाणार आहे. परदेशी नागरिकांना तर २० मार्चपासून न्यूझीलंडमध्ये प्रवेशबंदीच करण्यात आलेली आहे.

न्यूझीलंडवासीयांनी गेल्या दोन आठवड्यांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान अर्डर्न यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशवासीयांचे कौतुक केले. आपण सगळे एकमेकांचे रक्षण करत आहोत. मात्र, ही साधी शर्यत नसून मॅराथॉन आहे, असे त्या म्हणाल्या.

 भौगोलिक स्थान आणि योग्य वेळ

कोरोनाच्या साथीविरोधातील लढ्यामध्ये न्यूझीलंडकडे दोन बलस्थाने होती. एक म्हणजे भौगोलिक स्थान आणि दुसरे म्हणजे योग्य वेळी उचललेली पावले. अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यानंतर महिनाभराने, २८ फेब्रुवारी रोजी, न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. २९ मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा रुग्ण मृत्युमुखी पडला. त्यानंतर देशात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

कोरोनाच्या साथीला अटकाव करण्यासाठी न्यूझीलंडला थोडा अधिक वेळ मिळाला आणि चीनच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली, असे येथील आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

अन्य देशांपासून मोठ्या अंतरावरील एक बेट असल्याचा फायदाही न्यूझीलंडला मिळाला. अन्य देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमधील हवाई वाहतुकीचे प्रमाणही कमी आहे. द्विपराष्ट्र असल्याचा फायदा आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखण्यात मिळाला, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनीही नमूद केले आहे.

मात्र, न्यूझीलंडमधील वैज्ञानित दृष्टिकोन आणि उत्तम नेतृत्व यांचे योगदानही लक्षात घेतले पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. न्यूझीलंडने कोरोनाच्या चाचण्या व्यापक स्तरावर घेतल्या. आत्तापर्यंत देशभरात ५१,१६५ चाचण्या झाल्या आहेत. न्यूझीलंडच्या १३ पट लोकसंख्या असलेल्या यूकेमध्ये आत्तापर्यंत केवळ २०८,८३७ चाचण्या झाल्या आहेत, यावरून हा फरक लक्षात येईल. अमेरिका व ब्रिटनच्या तुलनेत मर्यादित संसाधने असलेल्या न्यूझीलंडने चाचण्यांबाबत दाखवलेली कार्यक्षमता कौतुकास्पद आहे आणि निर्णायकही ठरत आहे, हे यावरून स्पष्ट होते. आपल्या जवळच्यांना गमावण्याची तयारी ठेवा, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ब्रिटनवासीयांना सांगत होते, तेव्हा अर्थव्यवस्थेइतकेच आमच्या नागरिकांचे प्रमाण महत्त्वाचे आहेत, यावर अर्डर्न भर देत होत्या याकडे न्यूझीलंडमधील तज्ज्ञांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. १४ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना दोन आठवड्यांचे स्वयंविलगीकरण सक्तीचे होते. हे जगातील सर्वांत कठोर सीमानिर्बंध आहेत आणि देशात कोरोनाविषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ ६ असतानाच हे निर्बंध न्यूझीलंडने लागू केले होते, हे महत्त्वाचे आहे. ही संख्या २८ झाल्यानंतर १९ मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आणि रुग्णांची संख्या १०२ झाल्यानंतर, २३ मार्च रोजी, देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला.

न्यूझीलंडमध्ये अन्य देशांच्या तुलनेत अतिदक्षता सुविधा तुटपुंज्या असल्याने पंतप्रधानांनी त्वरेने पावले उचलली, असे म्हटले जात आहे.

 कोरोनाग्रस्तांपैकी केवळ एकाचा मृत्यू

न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांपैकी आत्तापर्यंत केवळ एक जण दगावला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लागण झालेल्यांपैकी बहुतांश तरुणवयीन आहेत. न्यूझीलंडमधील करोनाग्रस्त तसेच संशयितांपैकी सुमारे २५ टक्के लोक २० ते २९ वयोगटातील आहेत, तर १५ टक्के ३० ते ३९ वयोगटातील आहेत. अमेरिकेत २९ टक्के कोरोनाबाधित २० ते ४४ या वयोगटातील आहेत. जगभरात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण ही बहुतांशी प्रवासातून झाली आहे. ४० टक्क्यांहून अधिक रुग्णांना परदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे आणि यातील बहुतेक तरुण आहेत. साधारणत: प्रवास करणाऱ्यांमध्ये निरोगी लोकांचे प्रमाण अधिक असते. वयस्कर तसेच व्याधीग्रस्तांमध्ये प्रवासाचे प्रमाण कमी असते. तरुणांना लागण अधिक प्रमाणात झाली आणि त्यांनी या प्रादुर्भावाला चांगला लढा दिला.

अर्थात कोरोनाची साथ आटोक्यात आल्यासारखी वाटत असली तरी अद्याप साजरीकरणाची वेळ आलेली नाही, याची न्यूझीलंडमधील यंत्रणेला कल्पना आहे. लॉकडाउन शिथिल करण्याची घाई करणार नाही, असे पंतप्रधान अर्डन यांनी स्पष्ट केले आहे.

यानिमित्ताने वैद्यकीय अतिदक्षता सुविधांचा दर्जा व व्याप्ती वाढवण्यावर न्यूझीलंड काम करणार आहे. आम्ही उत्तम लसीकरण व विषाणूप्रतिबंधकांच्या प्रतिक्षेत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0