मुंबईः भीमा-कोरेगाव प्रकरण-एल्गार परिषद व माओवाद्यांशी संबंध असल्या प्रकरणात सध्या अटकेत असलेले तेलुगू कवी वरवरा राव (८१) यांना कोरोना विषाणूची लागण झ
मुंबईः भीमा-कोरेगाव प्रकरण-एल्गार परिषद व माओवाद्यांशी संबंध असल्या प्रकरणात सध्या अटकेत असलेले तेलुगू कवी वरवरा राव (८१) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात तुरुंगात बेशुद्ध पडल्याने वरवरा राव यांना तळोजा कारागृहातून जे.जे.मध्ये हलवण्यात आले होते. त्यांना अनेक आजारांनी ग्रासले असल्याने जामीन मिळावा अशी त्यांची मागणी होती. त्यात तुरुंगात कोरोनाची लागण आपल्याला होईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. पण त्यांना जामीन देण्यात आला नव्हता.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच वरवरा राव यांना शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना कोरोना झाल्याचा अहवाल पुढे आला. वरवरा राव यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्याची शक्यता आहे.
गेल्याच आठवड्यात वरवरा राव यांच्या कुटुंबियांनी एक पत्रकार परिषद घेऊन राव यांची प्रकृती ढासळत असल्याचे सांगत त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार द्यावेत अशी मागणी केली होती.
गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने वरवरा राव यांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घ्यावी असे कारागृह प्रशासनाला सांगितले होते पण त्यांना जामीन नाकारला होता. आता न्यायालयाच्या या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
दरम्यान वरवरा राव यांची प्रकृती ढासळत असूनही त्यांना जामीन मिळत नसल्याच्या निषेध द नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर द राइट्स ऑफ द डिसेबल्ड या संस्थेने केला आहे. सरकार अत्यंत असंवेदनशील पद्धतीने या प्रकरणाकडे पाहात असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.
संस्थेचे सरचिटणीस मुरलीधरन यांनी आरोप केला की, प्रा. जी.एन. साईबाबा यांच्या बाबतीतही सरकार असेच असंवेदनशील पद्धतीने वागत आहे.
COMMENTS