कोरोना रुग्णांत वाढ, दुसऱ्या लाटेची भीती

कोरोना रुग्णांत वाढ, दुसऱ्या लाटेची भीती

‘अन लॉक’ आणि ‘न्यू नॉर्मल’च्या नावाखाली नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी स्वैर हुंडदलेले लोक, पर्यटनस्थळी झालेली तोबा गर्दी याचा परिणाम कोरोना रुग्ण वाढीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून दिसत असून ही एक प्रकारे दुसऱ्या लाटेची घंटा मानली जात आहे. त्यातच कोरोनाचा नवीन विषाणू आणि बर्ड फ्लू असे नवे संकट पुढे येत आहे.

कोरोनावर गुजरात सरकारकडून होमिओपॅथी औषधांचे वाटप
कोव्हिड लसींची परिणामकारकता
….अन्यथा गरीबी-भूकबळीचे संकट

‘अन लॉक’ आणि ‘न्यू नॉर्मल’च्या नावाखाली नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी स्वैर हुंडदलेले लोक, पर्यटनस्थळी झालेली तोबा गर्दी याचा परिणाम कोरोना रुग्ण वाढीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून दिसत असून ही एक प्रकारे दुसऱ्या लाटेची घंटा मानली जात आहे. त्यातच कोरोनाचा नवीन विषाणू आणि बर्ड फ्लू असे नवे संकट पुढे येत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील प्रमुख शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. एरव्ही नव वर्षाच्या आधी ठाणे, पुणे, नाशिक , नागपूर, मुंबई तसेच अन्य ठिकाणी रुग्ण संख्या घटत चालली असल्याचे दिसत होते. राज्यात हा आकडा दोन ते तीन हजार एवढा होता. गेल्या महिन्याच्या तुलनेने ही संख्या कमी होती. पण आता सोमवारपासून त्यात झपाट्याने वाढ होत आहे. आधी हा आकडा तीन हजार एवढा होता पण बुधवारपासून तो साडेचार हजारावर येऊन ठेपला आहे. त्यामध्ये मुंबईची रुग्णसंख्या ही ५०० वरून ९०० वर तर ठाण्यात ५००च्या आसपास, नाशिक ३६६, पुणे शहर आणि जिल्हा मिळून त्यामध्ये पिंपरी-चिंचवड समाविष्ट केले तर ही संख्या ८०० पर्यंत जाते. तर नागपूरमध्ये सुद्धा ४५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये २०० रुग्ण मिळाले असल्याने आता चिंता व्यक्त होत आहे.

याबाबत राज्य कोरोना कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले की, या सर्व स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते का याचा आम्ही नेहमी आढावा घेत होतो. नाताळ आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडले. त्यावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने विविध माध्यमातून आम्ही त्यांना करत होतो. गेली काही दिवस रुग्ण संख्या कमी झाली होती, पण दोन दिवसापासून त्यात अचानक वाढ होऊ लागल्याचे दिसत असून ते काळजीचे निश्चितच असल्याचे ओक म्हणाले. लस मान्यता मिळाली असली तरी लोकांनी काळजी घेतलीच पाहिजे असे स्पष्ट करुन ओक म्हणाले की, लस मिळाली तरी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स हे नियम कायम पाळावे लागतील.

यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांना आता वेगळे त्रास सुरू झाले आहेत, त्याला पोस्ट कोविड म्हणतात. अनेकांचे हृदयविकाराचा झटक्याने अथवा अन्य कारणामुळे मृत्यू झाले आहेत हे प्रमाण २ टक्के आहे. असे डॉ. ओक यांनी सांगितले. यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्यांनी नियमितपणे स्वतःची तपासणी करावी असे आवाहनही ओक यांनी केले आहे.

ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या जनुकीय अवतारामुळे देशात आतापर्यंत ७१ रुग्ण मिळाले असून दिवसेंदिवस त्यामध्येही वाढ होत आहे. विदेशातून येणाऱ्या बहुतांशी लोकांनी मुंबई विमानतळावर होणारी सक्तीची कोरोना चाचणी टाळण्यासाठी हैद्राबाद अथवा अन्य राज्यातील विमानतळ पर्याय स्वीकारला आहे. या विमानतळावर कोरोनाची कोणतीही चाचणी होत नसल्याने हे प्रवाशी विनासायास तेथून महाराष्ट्रमध्ये आंतरदेशीय विमानसेवा अथवा रस्ता मार्गाने येत आहेत. लोकांची ही बेपर्वाई कोरोना रुग्ण संख्या वाढविण्यासाठी भविष्यात हातभार लावणार आहे.

आतापर्यंत देशात कोरोना रुग्णाची संख्या ही १ कोटी, ३ लाख २४ हजारावर पोहचली आहे. मृत्यू संख्या ही १ लाख ४९ हजारावर पोचली आहे. राज्यातील कोरोना रुग्णाची संख्याही आता वाढत असून रुग्णवाहिकेच्या सायरनचे आवाज दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर ऐकू येत आहेत. ही जर खरोखरच दुसऱ्या लाटेची सुरुवात असेल तर सर्वानी आतापासूनच काळजी घ्यावी लागणार आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0