करोना आणि कृत्रिम बुद्धिमता

करोना आणि कृत्रिम बुद्धिमता

करोनाची साथ वाढू लागली, व्यवहार ठप्प झाले, कारखानदारी थंडावली तसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयुक्ततेवर नव्याने विचार होऊ लागला. आज अशी काही क्षेत्रे आहेत जेथे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे शक्य आहे.

लग्नाच्या सोहळ्याला कोरोनाची झळ
वेश्या व्यवसायातील महिलांसाठी शासनाचा मदतीचा हात
आजार शब्दांच्या खेळाचा

करोनामुळे खूप सारे लोक घरातून काम करत आहेत, तंत्रज्ञानामुळे घरातून काम करणे शक्य झाले आहे. असेच, तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण करोनाच्या संकटाला तोंड देत आहोत. अलीकडे कृत्रिम बुद्धिमता (Artificial Intelligence) या तंत्रज्ञानाबद्दल बरीच चर्चा दिसत आहे. या तंत्रज्ञानाची कोविडच्या काळात गरज आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कृत्रिम बुद्धिमता हे एक प्रभावशाली तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता ही वापरणाऱ्या व्यक्तींच्या ज्ञानावर आणि सृजनशीलतेवर अवलंबून आहे. करोनाची साथ वाढू लागली, व्यवहार ठप्प झाले, कारखानदारी थंडावली तसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयुक्ततेवर नव्याने विचार होऊ लागला. आज अशी काही क्षेत्रे डोळ्यापुढे दिसत आहेत जेथे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे शक्य दिसत आहे. आरोग्य तपासणी, उपचार तसेच लस बनवणे अशा वेगवेगळ्या खालील क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. पण कृत्रिम बुद्धिमत्ता कुठे वापरता येऊ शकते याची काही उदाहरणे पाहता येतील.

अफवांपासून दूर राहण्यासाठी

कोविडच्या काळात अफवांना मोठा ऊत आला आहे. अशा अफवांपासून सावध राहायला हवं. अफवांपासून दूर ठेवण्यासाठी ‘चाटबोट’ या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. ‘चाटबोट’ म्हणजे ‘वापरकर्त्यांशी संभाषण करण्यासाठी बनवलेली संगणकावरील तर्कमाला’. ‘चाटबोट’मध्ये AI या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जे आपल्या कोविड-१९ बद्दलच्या असणाऱ्या शंकांचे निरसन करू शकेल तसेच आपल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊ शकेल. त्यामुळे, अफवांचे निरसन शक्य आहे.

स्क्रिनिंगसाठी :

रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टॅन्ड अशा गर्दीच्या ठिकाणी स्क्रिनिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो. वेळेच्या अभावी लोक स्क्रिनिंग न करताच जाऊ शकतात. प्रशासनावरती याचा भार पडू शकतो आणि मनुष्यबळाचीही कमतरता भासू शकते. त्यामुळे, AI या तंत्रज्ञानाचा वापर करून अशी स्क्रिनिंग सिस्टिम बनवू शकतो की, ज्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांचे स्क्रिनिंग होऊ शकेल. हैद्राबादमध्ये पुन्ना रेड्डी यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त एका सेकंदामध्ये सुमारे ३० जणांचे स्क्रिनिंग करू शकेल अशी एक सिस्टिम बनवली आहे. ही सिस्टिम सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरती सुरू केली गेली आहे. गर्दीच्या ठिकाणी सरकारने अशी सिस्टिम उभे करणे गरजेचे आहे. तसेच, थर्मल कॅमेऱ्याने तपासण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते, AI तंत्रज्ञानाच्या साह्याने मल्टिसेन्सॉर वापरून स्वयंचलित स्क्रिनिंग सिस्टिमची निर्मितीही करू शकतो. ड्रोनच्या वापराने प्रशासनावरील भार कमी होईल तसेच, ड्रोनच्या मदतीने वस्तूंची देवाणघेवाणही होऊ शकते. अशा अनेक गोष्टी अंमलात आणायला हव्या जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्यांना संचारबंदीमध्ये उपयोगाचे ठरेल.

तपासणीसाठी :

करोना आत्ता संपूर्ण जगात पसरला गेला असल्यामुळे आरोग्यसेवांवरचा भार वाढला आहे.  कित्येक देशामध्ये तपासणीसाठी लागणाऱ्या मेडिकल किटचा तुडवडा भासू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या रोगाची तपासणी करणे शक्य होत नाही. याला उपाय म्हणून आपण AI तंत्रज्ञानाचा वापर करून असे साधन बनवू शकतो जे करोनाचे निदान करू शकेल.

नेचरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार, संशोधकांनी AI तंत्रज्ञानावर आधारित असे अल्गोरिदम बनवले आहे, ज्याच्या मदतीने तपासणीशिवाय व्यक्तीला करोना आहे की नाही हे समजू शकते. या संशोधनासाठी संशोधकांनी एका ‘कोविड-सिस्टिम’ स्टडी या अँपच्या मदतीने ३३ लाख व्यक्तींची माहिती गोळा केली गेली. हे अँप वापरणाऱ्या व्यक्ती त्यांच्या तब्येतीमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल दररोज माहिती देत होते. यामध्ये करोनाची लक्षणे असणाऱ्या आणि नसणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. या माहितीवरून एक नवीन अँप बनवले गेले आणि नंतर या व्यक्तींवरती त्याची चाचणी घेण्यात आली. ज्या व्यक्तींमध्ये नुकतीच लक्षणे दिसू लागली आहेत त्यांच्यासाठी हे अँप उपयोगाचे ठरले, त्यानंतर त्यांची तपासणी केली गेली. करोनाच्या काळात लोकसंख्या सर्वाधिक असणार्या भारतासारख्या देशामध्ये असे तंत्रज्ञान उपयोगी ठरेल. अशा तंत्रज्ञानामुळे करोनाचा संसर्ग थांबण्यासाठी मदत होईल. भारतामध्येही आरोग्यसेतू हे अँप बनवले गेले आहे. या अँपच्या मदतीने आपण करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो आहे याची माहिती मिळते पण या अँपची माहिती AI  या  तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केली जाते की नाही हे अजून पुढे आले नाही.

रोगनिदान आणि उपचारासाठी :

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवान रोगनिदान करणे शक्य होऊ शकते. बीजिंगमध्ये झालेल्या संशोधनानुसार AI तंत्रज्ञानावर आधारित सिस्टिम, CT स्कॅनचे परीक्षण करून फक्त एका मिनिटामध्ये करोनाचे निदान लावू शकते. यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. कारण, अनेक व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांचे रिझल्ट करोना पॉझिटिव्ह आले आहेत. करोनाबाधितांच्या उपरासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. करोनाबाधितांना रोबोच्या साह्याने अन्न आणि औषधांचा पुरवठा करू शकतो. करोनामुळे लोक कामावरती येऊ शकत नसल्यामुळे औषधांच्या निर्मितीमध्ये भरपूर समस्या आल्या आहेत. औषधनिर्मितीमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. करोना विषाणूच्या उपचारासाठी AI तंत्रज्ञान अब्जावधी रेणूंचे स्क्रिनिंग करू लागले आहे जेणेकरून वर्तमानकाळात उपलब्ध असणाऱ्या औषधामध्ये काय बदल करावे लागतील हे समजू शकेल.

प्रतिबंधात्मक लस बनवण्यासाठी :

संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस हे एक उत्तम शस्त्र आहे. जगभरामध्ये करोनाची लस बनवण्याचे काम सुरू आहे. दुर्दैवाने, प्रतिबंधात्मक लस बनवण्यासाठी अनेक वर्षे लागतात. AI तंत्रज्ञानामुळे, करोना विषाणूच्या DNA संरचनेतील ठराविक गुणधर्माचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. काही कालावधीत, यंत्र शिक्षणाच्या साह्याने करोना विषाणूच्या प्रथिनांच्या संरचनेबद्दल जाणून घेता येईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लवकरात लवकर लस बनवणे शक्य होईल.

संपूर्ण जगामध्ये AI तंत्रज्ञानाचा प्रभावशाली वापर करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. भारतमध्येही हळूहळू या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. डिसेंबर, २०१९ मध्ये भारत  सरकारने सायबर-फिझिकल सिस्टिममध्ये ३,६६० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे योजिले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण, रोबोटिक्स, विदा (डेटा) विज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे. तरीही ,भारतीय या तंत्रज्ञानामध्ये पाठीमागे आहेत. भारतानेही या तंत्रज्ञानामध्ये मजबूत आणि भक्कम पाया रोवणे गरजेचे आहे. लोकांमध्ये AI तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच, लोकांमध्ये किंवा उपभोगकर्त्यांमध्ये त्यांच्या व्यक्तिगत माहितीच्या संरक्षणासंदर्भात विश्वास निर्माण करायला हवा. फक्त करोनाची समस्या सोडवण्यासाठी नाही तर शेती व शेतीव्यतिरिक्त अनेक व्यसायामध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी वाव द्यावा. त्यामुळे, AI हे एक भविष्यातील असे साधन बनू शकेल ज्याच्या साह्याने अनेक भारतीयांचे जटिल प्रश्न सुटू शकतील.

(लेखाचे छायाचित्र ‘फ्यूचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट’वरुण साभार)

निलम भोसले, या भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय चुंबकत्व संस्थेत संशोधन विद्यार्थीनी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: