कोरोनाचा आकड्यांचा खेळ

कोरोनाचा आकड्यांचा खेळ

कोविडची दुसरी लाट आल्यापासून सगळीकडे चिंतेचे सावट पसरले आहे. पण या घडीला बातम्यांच्या मथळ्यावर विश्वास न ठेवता आकडे समजून घेतले तर मनातील भीती कधीकधी आशेचे रूपही घेऊ शकेल.

संकट काळात भारतीय स्टार क्रिकेटर आहेत कुठे?
लसीचा मोठा निर्यातदार भारत आयातदार झाला
इशारा दुर्लक्षिल्यामुळे अधिकृत अंदाज कोसळले?

३१ डिसेंबर २०१९ ला सर्वांनी कोरोनाबद्दल सर्वप्रथम ऐकले आणि २७  जानेवारी २०२० पासून अक्षरशः एक दिवस असा गेला नाहीये की कोरोनाबाबत बातमी नाही. रोज सकाळची सुरुवात आता पुन्हा वाढणारे कोरोनाचे आकडे बघून होते .. भारताचा रुग्णांचा आकडा, महाराष्ट्रातील संख्या, आपल्या जिल्ह्यातील/गावातील रुग्णांची संख्या…आणि त्या पाठोपाठ मृत्यूंची संख्यादेखील येते.

फेब्रुवारी २०२१ पासून भारतातील दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा एकदा कोरोनाचे आकडे रोज नवे विक्रम करू लागले. भारताने नव्या रुग्णांचा ३ लाखांचा टप्पा पार केलाय. मृत्यूदेखील २००० हून जास्त झाले आहेत. सध्या लाट वाढत असल्याने अजून काही काळ हे आकडे वाढणे अपेक्षित आहे.

अशा बातम्या बघितल्या की दडपण येते, मन भीतीने व्याकूळ होते, असहाय्य वाटते आणि मग आपण या आकड्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. बातम्या बघत नाही. शेवटी मनाला जपलेच पाहिजे नं..आणि त्यासाठी आपले मन थोडेसे बधीरही झाले आहे.. आधी रुग्णसंख्या १०० ने वाढली तरीही आपण चिंतीत व्हायचो आणि काळजी घेणे वाढवायचो. पण आता रुग्णसंख्या १ लाखाने वाढली तरीही आपण त्यामानाने निवांत आहोत . कोरोनाखेरीज इतर बाबींवर वाद घालत आहोत.

पण कोविडपासून दूर पळालात तरी कोविड मात्र आपला पिच्छा सोडत नाही. बातम्यांच्या मथळ्यावर विश्वास न ठेवता आकडे समजून घेतले तर मनातील भीती कधीकधी आशेचे रूपही घेऊ शकेल.

आपण एक उदाहरण बघुया !

हे ट्वीट केले होते भ्रमर मुखर्जी यांनी.  (लिंक – https://tinyurl.com/yfuftocf ) यामध्ये १८ एप्रिल रोजीची भारतातील काही राज्यांची तुलना केलेली आहे. त्यांचा फोकस ज्या राज्यांमध्ये R२ हून अधिक आहे त्यावर होता. पण आपण त्या फोटो वरून आपल्या महाराष्ट्रामधील परिस्थिती तसेच विविध आकडे आपल्याला काय सांगतात त्याबद्दल समजून घेऊया..

  • पहिला कॉलम आहे “दैनिक नवी रुग्णसंख्या’’ .

वर्तमानपत्रांमध्ये या संख्येचे मथळे असतात. रोज “नवा विक्रम’’ असे लिहिलेले असते.

याविषयी एक बाब लक्षात घेवूया की जोपर्यंत आपण या लाटेच्या शिखरावर (peak) वर पोचत नाही तोपर्यंत हा आकडा रोज वाढणार. ज्या वेळी हा आकडा सातत्याने खाली उतरायला सुरु होईल, त्याचा अर्थ आपण लाटेचे शिखर पार केले हे आपल्याला समजेल. आणि त्यासाठी आपणा सर्वांना एकजुटीने जोर लावावा लागेल #Bendthecurve साठी !

या आकड्यावरून काय काय समजते? ते पाहू.

सामान्य जनतेसाठी –

  • ही संख्या जेवढी जास्त तेवढी संसर्गाची जोखीम जास्त. जोखीम समजून घेण्यासाठी हा अंक महत्त्वाचा आहे.
  • लाट वाढत आहे की ओसरत आहे, तसेच ही वाढीची गती किती आहे हे रोजच्या आकड्यावरून समजते.
  • लाटेचे शिखर पार झाले का हे देखील समजते.

प्रशासकांसाठी

  • ही रुग्णसंख्या त्यांना किती सुविधांची आवश्यकता आहे याची कल्पना देते. यामध्ये बेड्स, औषधे, ऑक्सिजन आणि तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचारी या सर्व बाबी येतात .
  • हा आकडा सांगतोः रुग्ण वाढत आहेत किंवा आपली रुग्ण सापडवण्याची क्षमता – टेस्टिंग – वाढत आहे. म्हणून हा आकडा नेहमी ३ ऱ्या व ६ व्या कॉलममधील आकड्याशी जुळवून बघायचा असतो.
  • हे रुग्ण नक्की कोण आहेत याचा अभ्यास केला की ज्या गटामध्ये केसेस पसरत आहेत त्या गटाला सावध करता येते. जसे – दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमधील संसर्ग व गंभीर आजाराचे प्रमाण पहिल्या लाटेहून अधिक आहे. आपल्याला मुलांना जपायला हवे!

मात्र हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेसाठी मात्र वापरायचा नाही! कारण ज्या राज्यांमध्ये दाटीवाटीची शहरे अधिक, आंतरराष्ट्रीय प्रवास जास्त, मुख्य म्हणजे लोकसंख्या जास्त, आणि जनतेमध्ये एकजूट कमी व नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्ती देखील कमी अशा राज्यांमध्ये अधिक रुग्ण दिसणे स्वाभाविक आहे.

महाराष्ट्राचा रुग्णसंख्येचा वाटा सर्वात जास्त आहे. मात्र एकजुटीने आपण #Breakthechain नक्कीच करू शकू आणि ही संख्या कमी करू शकू. इतर राज्यांमधील संख्या वाढली की महाराष्ट्राचा वाटा आपोआप कमी होईल.

  • दुसरा कॉलम “दैनंदिन मृत्युसंख्या”

ही संख्या मात्र अतिशय संवेदनशीलपणे बघायला हवी. कारण ही केवळ एक संख्या नसते तर एक व्यक्ती असते. हा आकडा कमीतकमी राहील याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण हे देखील लक्षात ठेवायला हवे की जेव्हा केसेस जास्त असतात, तेव्हा ही मृत्यूंची संख्या देखील जास्त दिसणारच आहे. केसेस कमी झाल्या की ती आपोआप कमी होईल.

मात्र या संख्येवर कडक नजर हवी. यासाठी नियमितपणे Death ऑडिट केले जात आहेत. तसेच हे मृत्यू कोणत्या गटामध्ये होतात आणि मृत्यूसाठी काही कारणे आहेत का यावरून आपल्याला जोखमीचे गट समजतात .

जसे – दुसऱ्या लाटेमध्ये ४५च्या खालील वयोगटांमधील मृत्यूंमध्ये वाढ झालेली आहे. वय कमी आहे म्हणून नियम न पाळणे धोकादायक ठरू शकेल. तसेच वेळेवर तपासणी न केलेले व घरी असताना गंभीर रूप धारण केलेले रुग्ण दवाखान्यामध्ये उशीरा पोचत आहेत. लोकांचे याबाबत प्रबोधन करणे तसेच जनतेच्या मनातील भीती दूर करणे अतिशय आवश्यक आहे.

हा आकडा देखील तुलना करण्यासाठी वापरू नये आणि चौथ्या कॉलम सोबत जोडून बघायला हवा.

तसेच ही संख्या जर योग्य प्रकारे नोंदली गेली असेल तरच त्यातून काही बोध होऊ शकतो. उदा. वेळेवर तपासणी न झाल्यास rtPCR रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. अशावेळी असा मृत्यू नोंदला जाणार नाही. मृत्यू कोविडऐवजी सहव्याधीचे असल्याची नोंद काही वेळा जाणून बुजून / नजरचुकीने देखील होऊ शकते. त्यामुळे ही संख्या फार काळजीपूर्वक तपासायला हवी.

महाराष्ट्राची मृत्युसंख्या नक्कीच जास्त आहे मात्र रुग्ण जास्त असल्याने असे चित्र दिसत आहे हे मृत्यूदर बघितल्यावर लक्षात येईल.

  • तिसरा कॉलम आहे –रोजच्या टेस्ट positive येण्याचा जो दर आहे त्याची एका सप्ताहाची सरासरी.

असे केल्याने दररोज टेस्टची संख्या बदलत असते त्याचा परिणाम   काही अंशी दूर केला जातो.

हा दर तुलनेसाठी वापरता येतो मात्र ६व्या कॉलमकडेही लक्ष ठेवायचे. कारण जिथे टेस्ट जास्त केल्या जातात, सच्चेपणाने केल्या जातात, योग्य प्रकारे नोंदवल्या जातात, योग्य / पात्र व्यक्तीच्या टेस्ट केल्या जातात, जिथे नागरिक देखील लक्षणे येताच तपासण्यासाठी येत आहेत, जागरूक आहेत अश्या ठिकाणी हा दर नक्कीच जास्त असेल. म्हणून दर दशलक्ष लोकसंख्येनुसार टेस्टची संख्या देखील याला जोडून बघायला हवी.

हा दर कमी होऊ लागला म्हणजे साथ कमी होऊ लागली हे आपण समजू शकतो. हा दर जर काही आठवडे स्थिर राहिला तर आपण करत असलेले प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत असाही त्याचा अर्थ होऊ शकतो.

त्यामुळे या आकड्यानेही दुःखी न होता अपेक्षित रुग्णसंख्येचा अंदाज घेता येऊ शकतो. बातम्या वाचल्या असतील ना की दिल्लीमध्ये तीन व्यक्तीमधील एक व्यक्ती बाधित असू शकते.

महाराष्ट्राचा test positivity rate (TPR) नक्कीच जास्त दिसतोय पण जर टेस्टची संख्या देखील बघितली तर आपण जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोचत आहोत याचा अभिमान वाटेल. सर्व लक्षण असलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्या आणि हा दर अजून वाढवा , कारण रुग्ण शोधणे हे लाट थांबवण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्राचा दर आहे ०.२४७ म्हणजे १० टेस्टमधील साधारण २ टेस्ट positive येत आहेत. हा दर वाढत असेल तर प्रसार वाढत आहे का हे पाचव्या कॉलम वरून बघायला हवे. प्रसार वाढत नसेल तर आपण योग्य मार्गावर आहोत हे जाणावे.

  • चौथ्या कॉलममध्ये आहे मृत्यू दराची (Case Fatality Rate) ७ दिवसांची सरासरी.

तुलनेसाठी मृत्यूंची संख्या न वापरता CFRची संख्या वापरायला हवी कारण यातून रुग्णांना मिळणारी वैद्यकीय मदत दिसून येते. ही सरासरी वैश्विक व राष्ट्रीय सरासरीहून जास्त असल्यास त्याची कारणे शोधायला हवीत जसे – रुग्ण वेळेमध्ये पोहोचत आहेत ना? योग्य उपचार मिळत आहेत ना? उपचारामध्ये काही बदल करायला हवा का? इ.

भारताचा राष्ट्रीय दर आणि महाराष्ट्राचा दर आहे ०.००५ म्हणजे रोज १००० रुग्णांमधील ५ रुग्ण दगावत आहेत. म्हणजेच महाराष्ट्राची मृत्यू संख्या जास्त दिसत असली तरी ती देशातील CFR प्रमाणाहून अधिक नक्कीच नाही.

ही संख्या सर्वाधिक पंजाबमध्ये व त्यानंतर छत्तीसगढ, झारखंड आणि गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रातील चित्र त्यामानाने चांगले आहे. आणि हा दर अजून कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न प्रत्येक स्तरावर सुरूच आहेत.

  • पाचवा कॉलम सर्वात महत्वाचा आहे साथीच्या दृष्टीने. R संख्या !

कोरोना आला तेव्हा सर्वांना R0 (R naught) या संकल्पाने बद्दल समजले. जेव्हा एखादा नवा आजार त्या आजाराचा पूर्वानुभव नसलेल्या समाजामध्ये पसरतो त्यावेळी एका बाधित व्यक्तीकडून संसर्ग किती लोकांपर्यंत पोचू शकेल याची माहिती R0 वरून समजते. १९१८ च्या फ्लू च्या साथीमध्ये R केवळ १.१६- १.१८ एवढाच होता आणि त्या साथीमध्ये ५० दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले होते.

कोरोनाचा R0 आधी २.२ असावा असा अंदाज केला होता मात्र तो ६.६ इतका देखील असू शकतो अश काही स्टडीज झाल्या आहेत. Seasonal flu चा R0 १.३ असतो आणि गोवरचा मात्र बराच जास्त असतो – १२ ते १८. गोवरचा एक रुग्ण १२ ते १८ जणांना संसर्गित करू शकतो मात्र कोरोनाचा रुग्ण साधारण २ ते ७ लोकांना संसर्गित करेल.

R ची संख्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो – जसे लोकांचा आपापसातील संपर्क, विषाणूची संसर्गक्षमता (infectivity), लोकांचे नियम पाळण्याचे प्रमाण , आजारावर पक्का उपचार उपलब्ध आहे का?, रुग्ण आयसोलेशनचे नियम पाळतात का? इ.

आता आपण R मोजतो – Effective Reproduction Number . आता आपल्या समाजामध्ये लसीकरण सुरू झालेले आहे, विविध नियम आणि निर्बंध देखील आहेत. तसेच काही जणांना नैसर्गिक आजारामुळे प्रतिकारशक्ती आलेली आहे. त्यामुळे R हा R0 पेक्षा कमी असायला हवा.

R ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर पुढील लिंक उपयुक्त ठरेल.

https://www.weforum.org/agenda/2020/05/covid-19-what-is-the-r-number/

जेव्हा R ची संख्या १ असते तेव्हा केसेस स्थिर राहतात . R जेव्हा १ पेक्षा वाढतो तेव्हा R जेवढा मोठा तेवढा रुग्णवाढीचा वेग देखील जास्त. साथ थांबवायची असेल तर R १ पेक्षा कमी असायला हवा. म्हणजेच जेव्हा एका बाधित व्यक्ती कडून कोरोना संसर्ग इतर एकाही व्यक्ती कडे जात नाही तेव्हा साथ संपायला सुरु होते. R अगदी एखाद्या दशांशाने देखील वाढला किंवा कमी झाला की रुग्णसंख्या मात्र हजारोंनी बदलते.

 

 

 

 

केसेस वाढत असताना R कमी करणे हा महत्त्वाचा उपाय असतो. आणि जर जनता मनाचा लॉक डाऊन (नियम ) पळत नसेल तर निर्बंध आणि मिनी लॉकडाऊन करणे आवश्यक होऊ शकते .

भारतातील विविध राज्यांमधील R वाढत आहेत याबाबत तज्ज्ञांनी दिलेला सावधानतेचा इशारा द प्रिंटच्या या बातमीमध्ये वाचता येईल.

या लेखामध्ये उल्लेख आहे की इतर राज्यांमधील R वाढत असले तरी महाराष्ट्रामधील R १.२६ पासून १.१८ पर्यंत कमी झालाय.

आणि आपण जो फोटो / टेबल बघितले त्यामध्ये तर महाराष्ट्राचा R हा अजून कमी झालाय आणि आता १.१६ आहे . आणि ही माझ्यासाठी अतिशय आशादायक गोष्ट आहे.

आपला प्रवास योग्य दिशेने चालला आहे. R १ पासून खाली आणायचा असेल तर आपण सर्व मदत करू शकतो.

  • लक्षण आले कि लगेच rtPCR तपासणी
  • आयसोलेशनचे सर्व नियम पाळणे
  • लक्षणे असतील तर घरी मास्क वापरणे आणि विलग होणे तसेच कामाच्या ठिकाणी न जाणे
  • मास्कचा योग्य वापर

महाराष्ट्रासाठी R १ पेक्षा खाली नेणे शक्य आहे.. आपली एकजूट हवी.

महाराष्ट्र आणि पंजाब शिवाय इतर राज्यांची R ची संख्या बघून परिस्थिती चिंताजनक आहे हे जाणवतंय. १९१८ च्या फ्लूच्या महासाथी मध्ये R केवळ १.१८ होता आणि आत्ता भारताची सरासरी आहे १.५६ जी भविष्यामध्ये अजून जास्त वाढू शकते. तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे.

  • सहाव्या कॉलम मध्ये आहेत रोजच्या टेस्टची संख्या.

इथे मात्र जेवढी मोठी संख्या असेल तेवढे आपण खुश व्हायला हवे. कारण जास्त टेस्ट झाल्या तरच रुग्ण शोधून आपण त्यांचे विलगीकरण करून संसर्ग शृंखला तोडू शकू नाही का?

मात्र इथेही एक मेख आहे. केवळ संख्या वापरून तुलना करू नये . त्यासाठी लोकसंख्येनुसार तपासणीचा दर काय आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. तो कॉलम या टेबलमध्ये नाही.

पण महाराष्ट्रातील टेस्टची संख्या २,७२,०३५ ही सर्व राज्यांपेक्षा अधिक दिसतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. ही दैनिक संख्या असल्याने सतत बदलत राहणार त्यामुळे यावरून राज्य टेस्टची संख्या वाढवत आहे की कमी करत आहे हे केवळ समजते आणि राज्य रुग्ण शोधण्यासाठी किती प्रयत्न करीत आहे हे देखील समजते.

  • आणि सातवा कॉलम साथ रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे – रोजची लसीकरण संख्या आपल्याला आपण साथ रोखण्यासाठी किती प्रयत्न करीत आहोत हे सांगते .

लसीकरण अधिकाधिक गतीने व्हायला हवे. अजून काही माहिती जसे एकूण लसीकरण क्षमता आणि केलेले लसीकरण यातून अधिक माहिती मिळू शकते जसे- जनतेमधील लसीकरण संकोच किती प्रमाणामध्ये आहे किंवा राज्याला मिळालेला लसींचा पुरवठा पुरेसा आहे की नाही इ.

१८ एप्रिलला केवळ राजस्थानमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त लसीकरण झालेले दिसतेय. लस उपलब्ध असल्यास महाराष्ट्र वेगाने लसीकरण करीत आहे.

मात्र याला जोडूनच अजून एक आकडा महत्त्वाचा असतो, तो म्हणजे लसीकरण झालेल्या लोकसंख्येचे प्रमाण!

आपण सर्वांनी सुरक्षितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने लस घेऊन साथ आटोक्यामध्ये आणण्यासाठी आपला सहभाग नोंदवायला हवा! लसीकरणाचे प्रमाण वाढवायला हवे.

तर, एवढी सगळी माहिती या एका टेबलमध्ये सामावलेली आहे. कोरोनाचे आकडे खूप काही सांगतात. सर्वच आकडे भीतीदायक नसतात .. एकूण रुग्णसंख्येहून जरा खोलात गेले की अगदी आशादायक चित्र देखील दिसू शकते. योग्य आकड्यांची मागणी करा! आणि या कोरोनाच्या आकड्यांना न घाबरता आपले मित्र बनवा! हे आकडे तुम्हाला सुरक्षित ठेवण्यामध्ये सहाय्यकारी आहेत.

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (साथरोगतज्ज्ञ ), सहयोगी प्राध्यापक, जनऔषधवैद्यक शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0