दोन खुराकांमधील विलंब; सरकारचा परस्पर निर्णय

दोन खुराकांमधील विलंब; सरकारचा परस्पर निर्णय

नवी दिल्लीः कोविशिल्डच्या लसीच्या दोन खुराकांमधील अंतर ६-८ आठवड्याऐवजी १२-१६ आठवड्याचा करण्याचा निर्णय मोदी सरकारला वैज्ञानिक सल्लागार समितीने दिलेला नाही, असे उघडकीस आले आहे. सरकारने कोविड लसीच्या संदर्भात १४ वैज्ञानिकांचा एनटीएजीआय समूह स्थापन केला आहे. या गटाकडून देशव्यापी लसीकरणासंदर्भात सरकारला सूचना व धोरण ठरवण्याचे अधिकार देण्यात आले होते. तसेच देशातील लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम त्यांच्या दिशादर्शनाखाली चालत आहे.

पण एनटीएजीआयमधील तीन वैज्ञानिक सल्लागारांनी सरकारला कोविशिल्ड लसीच्या दोन खुराकांमधील अंतर वाढवण्याबाबत कोणताही सल्ला दिला गेला नाही, असे स्पष्ट केले. आमच्याकडे कोविशिल्ड लसीच्या दोन खुराकांमधील कालावधी वाढण्यासंदर्भात कोणतीही आकडेवारी नाही, त्यामुळे सल्ला दिला गेला नाही, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजीचे माजी संचालक एम.डी. गुप्ते यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने कोविशिल्डच्या दोन खुराकामधील कालावधी ८ ते १२ आठवड्यांचा करण्याचा सल्ला दिला होता. तो एनटीएजीआयने मान्य केला होता पण एनटीएजीआयकडे १२ आठवड्यापेक्षा अधिक कालावधीची कोणतीही आकडेवारी नसल्याने सरकारचा कालावधी वाढवण्याचा निर्णय आम्ही स्वीकारला नाही. हा निर्णय योग्यही ठरू शकतो वा नाही पण याची माहिती आमच्याकडे नाही, असा खुलासा गुप्ते यांनी केला.

गुप्ते यांच्या मताला त्यांचे सहकारी मॅथ्यू वर्गीज यांनी सहमती दर्शवली असून खुराकामधील अंतर ८ ते १२ आठवडे असावे यावर सहमती झाली होती, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य खात्यातील मतभेद

मंगळवारी केंद्रीय आरोग्य खात्याने एनटीएजीआयचे अध्यक्ष एन. के. अरोडा यांच्या हवाल्याने कोविशिल्डमधील दोन खुराकांमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असे स्पष्टीकरण दिले होते. हा निर्णय वैज्ञानिक अभ्यास व पारदर्शी पातळीवर घेतला गेला असा दावा आरोग्य खात्याने केला होता. कोविशिल्डच्या दोन खुराकामधील कालावधी वाढावा या निर्णयावर कोणाचेही मतभेद नव्हते असे सरकारने म्हटले होते.

केंद्रीय आरोग्य खात्याने गेल्या १३ मे रोजी एनटीएजीआयच्या सूचनांनुसार कोविशिल्डच्या खुराकामध्ये अंतर ६-८ आठवड्याऐवजी १२-१६ आठवडे केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामागे वैज्ञानिक कारणे आहेत, असेही सरकारने सांगितले होते.

पण त्या वेळी देशभर लसीची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने सरकारने आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी दोन खुराकांमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला अशी टीका सर्वच थरातून होऊ लागली.

गेल्या महिन्याच्या सुरवातीला दक्षिण कोरियाने एस्ट्राजेनेका व फायझरच्या लसीचा पहिला खुराक लसीकरण मोहिमेंतर्गत जनतेला दिला. त्यात असे दिसून आले की, या दोन लसींचा पहिला खुराक दिल्याने ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये कोरोना संक्रमण रोखण्याची क्षमता ८६.६ टक्के इतकी वाढली. त्यामुळे दोन खुराकांमधील अंतर खूप ठेवू नये अन्यथा ते हानीकारक ठरेल असे एनटीएजीआयमधील एक सदस्य जे.पी. मुलियाल यांचे मत आहे.

भारतात उपलब्ध असलेल्या २३.७५ कोटी लसींमधील ९० टक्के लसी या कोविशिल्डच्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS