चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाला मागील वर्षाच्या शेवटी सुरूवात झाल्यानंतर काही आठवड्यांतच रूग्णांचा आकडा ८१,२८५ वर गेला आणि त्यापाठोपाठ इटलीमध्ये
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाला मागील वर्षाच्या शेवटी सुरूवात झाल्यानंतर काही आठवड्यांतच रूग्णांचा आकडा ८१,२८५ वर गेला आणि त्यापाठोपाठ इटलीमध्ये रूग्णांची संख्या ८६,४९८ वर गेली. शुक्रवारी एका दिवसात इटलीमध्ये ९१९ तर स्पेनमध्ये कोरोनाचे ७६९ मृत्यू झाले. त्याचबरोबर अमेरिकेने कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत चीनला मागे टाकले असून येथे रूग्णांची संख्या ८२ हजारांवर गेली आहे आणि मृतांची संख्या १२०० पेक्षा अधिक झाली आहे. दरम्यान, अमेरिकन सिनेटने २ ट्रिलियनचे पॅकेज कोरोनाचा सामना करण्यासाठी जाहीर केले असून त्यानंतर अमेरिकेतील वॉलस्ट्रीट शेअरबाजार कोसळला आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर कोरोना विषाणूग्रस्तांचे केंद्रस्थान झाल्यानंतर पाठोपाठ लुइझियानामध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. बघता बघता रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. अमेरिकन सरकारने चीन आणि इटलीमध्ये विषाणूचा कहर झालेला असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही असा आरोप आता केला जात आहे.
दरम्यान, अमेरिकेत व्हेंटिलेटर्स, मास्क आणि इतर उपकरणांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून काही रूग्णालयांनी दोन रूग्णांसाठी एक व्हेंटिलेटर वापरण्याचा प्रयोग सुरू केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी आपल्या उद्योगक्षेत्राला मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
याच पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस चांगला चाललेला वॉलस्ट्रीट शेअरबाजार आज शुक्रवारी ३ टक्क्यांनी कोसळला. हे १९३३ नंतर प्रथमच घडते आहे. दरम्यान आशियाई शेअरबाजारही सध्या चढत्या स्थितीत आहेत. त्यामुळे देशाची एकूणच आर्थिक घडी विस्कटण्याची काळजी व्यक्त केली जात आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोना बाधा
ब्रिटिश सिंहासनाचे वारस आणि राजपुत्र प्रिन्स चार्ल्स, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे तेही आता विलगीकरणामध्ये गेले आहेत. प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या विंडसर कॅसलमध्ये राहायला गेल्या आहेत. जॉन्सन यांनी आपल्या घरातील खोलीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले काम सुरूच ठेवले आहे. ब्रिटिश आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. बर्मिंगहम विमानतळावर एक तात्पुरते रूग्णालय उभारण्यात आले असून येथे सध्या १५०० रूग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्याची क्षमताही वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोनाला चिनी विषाणू असे संबोधल्यानंतर नाराजी निर्माण झाली होती. चीन आणि अमेरिका या देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही ट्रंप यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. शुक्रवारी ट्रंप यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला आणि विषाणूच्या संसर्गापासून रोखण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबाबत त्यांचे कौतुक केले. त्यामुळे या देशांमधील संबंध निवळतील अशी आशा निर्माण झाली आहे. जिनपिंग यांनीही अमेरिकेतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत काळजी व्यक्त केली असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेत ३.३ दशलक्ष बेरोजगारीचे दावे दाखल करण्यात आले असून हा सुरूवातीचा आकडा आहे आणि इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दावे दाखल केले गेले आहेत.
इटली-स्पेनमध्ये एका दिवसांत शेकडो मृत्यू
इटली आणि स्पेनमध्ये मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून इटलीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत एका दिवसांत ९१९ मृत्यू झाले आहेत. तर स्पेनमध्ये ही संख्या ७६९ इतकी आहे. इटलीमध्ये मृतांचा एकूण आकडा ९,१३४ तर स्पेनमध्ये मृतांची संख्या ४,८५८ झाली आहे.
दरम्यान मागील तीन आठवड्यांपासून इटलीतील अनेक लोक लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे येथील गुन्हेगारीचे प्रमाण तब्बल ६४ टक्क्यांनी घटले आहे. अनेक लोक घरातच असल्यामुळे घरफोडीचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. पाकीटमारीचे प्रमाण ७५.८ टक्के कमी झाल्याचे इटालियन गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र ऑनलाइन गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे येथे दिसून आले.
जगात मृत्यूचे तांडव
जगातील सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या कोरोना विषाणूशी संबंधित निर्बंधांमध्ये सध्या राहत असून शुक्रवारी कोरोना विषाणूने बाधितांची संख्या जगभरात ५,५८,९६४ झाली आहे आणि मृतांची संख्या २५,२७० वर गेली आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या ८८७
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८८७ असून २० जण या विषाणूच्या संसर्गामुळे दगावले आहेत. भारतात सध्या संपूर्णपणे लॉकडाऊन असून फक्त जीवनावश्यक वस्तूच बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ आणि उद्योग व्यवसाय थंडावले आहेत. दरम्यान भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूची पहिली मायक्रोस्कोपिक इमेज तयार केली आहे. संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या गरीब मजुरांची स्थिती गंभीर झालेली आहे. त्यांना आपापल्या गावी परतायचे आहे. परंतु बसगाड्या आणि रेल्वे बंद असल्यामुळे ते शेकडो किलोमीटर आपल्या गावी पायी चालत निघाल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाराष्ट्रातील अशा मजुरांची जबाबदारी शासन घेणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी आज केले.
केरळमधील आयएएस अधिकारी अनुपम मिश्रा मलेशियाहून आपल्या हनीमूनवरून परतल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु ते आपल्या घरातून नाहीसे होऊन आपल्या सुलतानपूर येथील गावी गेल्याचे आढळले. त्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई रामन यांनी त्यांना निलंबित केल्याचे सांगितले.
राज्यात ११ हजार गुन्हेगारांची पॅरोलवर सुटका
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने महाराष्ट्र सरकारने सुमारे ११,००० गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टँकर आणि खासगी रूग्णवाहिकांमधून लोकांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनाही पोलिसांनी अटक तसेच दंड केल्याचे शुक्रवारी दिसून आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याशी संवाद साधताना आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत असून पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. किराणा तसेच अत्यावश्यक साहित्याची दुकाने २४ तास सुरूच राहणार असून लोकांनी गर्दी करू नये असेही आवाहन त्यांनी केले.
सांगलीतील इस्लामपूरमधल्या हज यात्रेला गेलेल्या ४ लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळल्यानंतर आता त्याच घरातील एकूण १२ जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसले आहे. त्यांना मिरज येथील रूग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
COMMENTS