‘कोविड-१९’ संकटामुळे ४१ लाख तरुण बेरोजगार

‘कोविड-१९’ संकटामुळे ४१ लाख तरुण बेरोजगार

नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथ व लॉकडाऊनमुळे देशातील ४१ लाख रोजगार गेले असून बांधकाम क्षेत्र व कृषी क्षेत्राला याचा जोरदार फटका बसल्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय मजूर संघटना व आशियाई विकास बँकेने जाहीर केला आहे.

कोविड-१९च्या महासाथीत निर्माण झालेली बेरोजगारी ही अत्यंत आव्हानात्मक असून तिचा मुकाबला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतात २५ किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील युवकांपेक्षा १५-२४ वयोगटातील युवकांचे रोजगार महासाथीत गेले आहेत. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन राहील व त्याने अनेक सामाजिक समस्यांना खतपाणी घातले जात असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतात तीन प्रकारे बेरोजगारी वाढली आहे. एक म्हणजे कामाचे तास कमी करण्यात आलेले आहेत. दुसरी म्हणजे रोजंदारीवर असलेल्यांचा रोजगार गेला आहे व तिसरा म्हणजे स्वयंरोजगार नष्ट झाला आहे.

याच बरोबर महासाथीमुळे शिक्षण व प्रशिक्षणात अडथळे आले आहेत. स्थलांतरणामुळे रोजगाराला मुकावे लागले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

आशिया व पॅसिफिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार झाले असून २०१९च्या तुलनेत २०२०च्या तिमाही ही बेरोजगारी वेगाने वाढली आहे. ही बेरोजगारी ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, चीनमध्ये दिसून आली आहे.

मूळ बातमी

COMMENTS