कोविडच्या ‘रेअर’ लक्षणांकडे दुर्लक्ष?

कोविडच्या ‘रेअर’ लक्षणांकडे दुर्लक्ष?

शैली बन्सलच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूची तीन कारणे नमूद आहेत : अॅक्युट मेनिंजोसेफॅलिटिस, स्ट्रेस कार्डिओमायोपथी आणि शॉक. २३ वर्षीय शैली दिल्ली पोल

खत टंचाईमध्ये जायबंदी शेतकरी
नोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वोच्च – अभ्यासगटाचे मत
कोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले

शैली बन्सलच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूची तीन कारणे नमूद आहेत : अॅक्युट मेनिंजोसेफॅलिटिस, स्ट्रेस कार्डिओमायोपथी आणि शॉक. २३ वर्षीय शैली दिल्ली पोलिस खात्यात गेल्या दोन वर्षांपासून कॉन्स्टेबल म्हणून काम करत होती. नंदनगरी पोलिस ठाण्यात तिचे पोस्टिंग होते आणि कामावर असतानाच ती आजारी पडली. २५ मे रोजी जेपी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.

शैलीचा भाऊ कपिलने सांगितल्यानुसार, शैलीला खूप ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची कोविड-१९ चाचणी दोनदा निगेटिव आली होती. शैलीच्या पहिल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव येऊनही कुटुंबियांना कोणतीही माहिती न देता तिला विलगीकरणात ठेवण्यात आले. म्हणूनच तिच्या मृत्यूमध्ये कोविड-१९चा काही संबंध नाही यावर विश्वास ठेवणे कपिल आणि त्याच्या कुटुंबियांना जड जात आहे.

७ ते ११ मे या कालावधीत शैलीच्या पोलिस ठाण्यातील चार सहकाऱ्यांच्या कोविड-१९ चाचण्या पॉझिटिव आल्याने त्यांच्या शंकेला पुष्टी मिळाली. भुपेंदर, पवन आणि कुलदीप हे कॉन्स्टेबल्स आणि स्टेशन हाउस अधिकारी अवतार सिंग रावत यांना कोविड झाल्याचे निदान झाले.

जेपी हॉस्पिटलमध्ये असताना शैलीचे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) घेण्यात आले पण त्याची कोणत्याही जीवाणू किंवा विषाणू संसर्गाच्या दृष्टीने चाचणी करण्यात आली नाही, अशी माहिती एम्स रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि या प्रकरणाची माहिती असलेले डॉ. हरजित सिंग भट्टी यांनी दिली. त्यांच्या मते शैली अत्यावश्यक सेवेत काम करत होती, त्यामुळे या चाचण्या करणे गरजेचेच होते.

शैलीला कोविड-१९ची काही सामान्यत: न आढळणारी (रेअर) लक्षणे जाणवत असली पाहिजेत, असा संशय डॉ. भट्टी यांनी व्यक्त केला. तिच्या केसमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव मेनेंजिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंदूच्या बाहेरील पापुद्र्यावर झाला असणार. त्यामुळे तिला मेनिंजोएन्सीफॅलायटिस झाला असावा, असे ते म्हणाले. ऑटोप्सीही करण्यात आली नाही, हेही डॉ. भट्टी यांनी नमूद केले.

कोविड-१९ आजाराची सामान्यपणे आढळणारी व न आढळणारी लक्षणे

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार (५ जून रोजी सकाळी ७ वाजता) लक्षणात्मक कोविड-१९ची सर्वांत सामान्यपणे आढळणारी लक्षणे म्हणजे “ताप, कोरडा खोकला आणि थकवा”. याहून कमी प्रमाणात आढळणारी लक्षणे म्हणजे “अंगदुखी आणि वेदना, घसा खवखवणे, डायरिया, डोकेदुखी, चव किंवा वासाची संवेदना नाहीशी होणे, त्वचेवर पुरळ उठणे किंवा हातापायाची बोटे फिकट होणे”. गंभीर लक्षणे म्हणजे “श्वास घेण्यात अडचण येणे किंवा धाप लागणे, छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे, बोलण्यास किंवा हालचाल करण्यास त्रास होणे”.

अर्थात जगभरातील चाचण्यांच्या निकालांवरून असे दिसून येते की काही लक्षणे सामान्यपणे आढळत असली, तरी त्यापलीकडील लक्षणे आढळू शकतात.

एप्रिलच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या एका केस रिपोर्टनुसार, जपानमधील एका २४ वर्षीय तरुणाला सीएनएफमध्ये “असेप्टिक एन्सिफलायटिस विथ सार्स-सीओव्ही-टू आरएनए”चे निदान झाले. या अहवालाच्या लेखकांमध्ये रुग्णावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यांनी लिहिले आहे- सार्स-सीओव्ही-टूसाठी नॅजोफॅरिंजिअल स्वॅब वापरून आणि सीएसएफ वापरून आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली, कारण, हे सार्स-सीओव्ही-टू साथीशी संबधित आहे असे आम्ही गृहीत धरले. विशिष्ट सार्स-सीओव्ही-टू आरएनए स्वॅबमध्ये आढळला नाही, तरी सीएसएफमध्ये त्याचे निदान झाले.

२३ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या इटलीतील एका ६८ वर्षीय रुग्णाच्या  अहवालातही मायोकार्डिटिस आणि सार्स-सीओव्ही-टू यांच्यातील संबंध दाखवण्यात आला आहे.

डॉ. भट्टी यांच्या मते शैली बन्सलच्या मृत्यूच्या कारणांत समाविष्ट करण्यात आलेली कार्डिओमायोपथी ही अवस्था विषाणू संसर्गामुळेच झाली असावी आणि हा विषाणू सार्स-सीओव्ही-टू असू शकतो.

अर्थात, अनेक प्रकारचे विषाणू मायोकार्डिटिसचे कारण होऊ शकतात आणि शैलीचा मृत्यू कोविड-१९मुळे झाला असे पुराव्याशिवाय म्हणता येणार नाही, असे एका प्रख्यात साथरोगतज्ज्ञांनी ‘द वायर’ला सांगितले. आपल्याला मृत्यू प्रमाणपत्रात लिहिलेली तथ्येच ग्राह्य धरावी लागतील. जर ते लिहिणाऱ्या डॉक्टरांनी असत्याचा आधार घेतला असेल, तर आपल्याला ते असत्य मानावे लागेल, असे ते म्हणाले. शैलीला हा संसर्ग कसा होऊ शकला असता याच्या तपशिलांवरून तिला कोविड-१९ झाला होता की नाही हे निश्चित सांगता येऊ शकेल, असे एम्समधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, ती कोविड-१९चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आली होती की नाही याचा तिच्या रिपोर्टमध्ये कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे याबद्दल माहिती आम्हाला मिळू शकली नाही, असे ते म्हणाले.

मात्र, कोविड-१९ची शक्यता पूर्णपणे फेटाळता येत नाही. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव आलेल्या रुग्णांनाही कोरोनाविषाणूचा संसर्ग झालेला असू शकतो. मज्जासंस्थेत हा संसर्ग असू शकतो, असेही या डॉक्टरांनी नमूद केले.

शैलीच्या भावाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे- “माझ्या बहिणीचा मृत्यू मेंदूज्वराने झाला असे म्हणून प्रशासन जबाबदाऱ्या झटकण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या बहिणीला कर्तव्य निभावताना मृत्यू आलेल्या कोविड शहिदाचा दर्जा मिळायला हवा.” कोविड-१९चा संसर्ग होऊन मरण पावलेल्या फ्रण्टलाइन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी १८ एप्रिल रोजी केली होती.  दुसऱ्या दिवशी या सवलतीचा विस्तार करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही ते देण्यात येईल, अशी घोषणा सरकारने केली. यांमध्ये नागरी संरक्षण कर्मचारी, शिक्षकवर्ग, पोलिस व अग्निशमन कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.

कोविड-१९ आजारामुळे झालेल्या मृत्यूंची गणना करण्याची पद्धत दिल्ली सरकारने बदलल्यामुळे मृत्यूच्या आकडेवारीतील नोंदी कशा सुधारल्या हे गणितज्ज्ञ मुराद बानाजी यांनी ‘द वायर’साठी लेख लिहून स्पष्ट केले आहे.

दिल्ली पोलिसांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त मनदीप रंधावा यांनी ‘द वायर’ला सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी कोणतेही अतिरिक्त निकष नाहीत. ‘कोविड-१९’मुळे झालेल्या मृत्यूसाठीच ही भरपाई मिळू शकते.

शैलीचे कुटुंब गरीब आहे आणि त्यांच्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शैलीचा मृत्यू कोविड-१९ने झाला असावा, असा संशय त्यांना आहे. मात्र, डॉक्टरांनी सर्व संभाव्य लक्षणे ध्यानात घेतली नाहीत व नेजल स्वॅबखेरीज अन्य चाचण्या केल्या नाहीत. त्यामुळे शैलीला कोविड-१९ झाला होता की नाही हे सिद्ध करणे शक्य नाही. एकंदर सामान्यपणे आढळणाऱ्या लक्षणांखेरीज फारशी न आढळणारी लक्षणे लक्षात न घेतल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये कोविडचे निदानच होणार नाही ही शक्यता यातून समोर आली आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0