कोविड मृत्यूः अंगणवाडी सेवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख

कोविड मृत्यूः अंगणवाडी सेवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख

मुंबईः राज्यात विविध ठिकाणी सेवा बजावताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाचे संकट कोसळलेल्या अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना काळात राज्यात वाड्या वस्त्यांवर जाऊन अंगणवाडी सेविकांनी आपले काम इमाने-इतबारे केले. गरोदर महिला आणि स्तनदा महिला तसेच किशोरवयीन  मुलींपर्यंत पोषण आहार आणि औषधोपचार पोहोचवला. अत्यंत जिकिरीच्या काळातही या महिलांनी सेवा बजावली. मात्र, कर्तव्यावर असताना कोरोनामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आपले प्राण गमवावे लागले. याची दखल घेत राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील ९ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ललिता मोरे या अंगणवाडी सेविका तसेच आशा धनेधर औरंगाबाद येथील अंगणवाडी सेविका, बीडमधील अंगणवाडी सेविका शामल पुजारी, पुणे येथील अंगणवाडी सेविका सविता शिळीमकर तर जळगावमधील कल्पना विजयसिंग पाटील, सुनंदा रामदास चौधरी आणि लतिका सुरेश सोनावणे या अंगणवाडी मदतनीस महिलांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील भारती कुपले आणि बीड येथील मदनबाई कर्डिले या कर्मचाऱ्यांनाही मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागाने शासन निर्णयाद्वारे दिली आहे. तसेच राज्यातील पोषण आहाराच्या खर्चासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासही शासनाने मान्यता दिल्याची माहिती या शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे.

COMMENTS