गुजरातेत कोविड मृत्यू १० हजार पण ९० हजार दावे

गुजरातेत कोविड मृत्यू १० हजार पण ९० हजार दावे

नवी दिल्लीः गुजरातने राज्यात कोविड-१९ पीडितांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे ६८,३७० दावे मंजूर केले असल्याची माहिती १६ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात दिली. पण राज्य सरकारने पूर्वी राज्यात कोविडचे १०,०९४ मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते. या आकड्यातील विसंगतीमुळे गुजरात सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गुजरात सरकारने १६ जानेवारी २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयात आर्थिक मदत हवी म्हणून ८९,६३३ कोविड-१९ पीडित कुटुंबांचे अर्ज आले होते त्यापैकी सरकारने ६८,३७० अर्ज मंजूर केले असे स्पष्टीकरण दिले होते. या शिवाय सरकारने ४,२३४ अर्ज नामंजूर केले आणि १७ हजार अर्जांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली होती. पण सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेली माहिती अपुरी असून गुजरातमध्ये कोविड-१९ महासाथीत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या अधिक असून मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे आर्थिक मदतीसाठीचे ९ पट अर्ज आले आहेत. पण सरकार मृतांची संख्या कमी असल्याचे सातत्याने सांगत आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या रुग्णांना पहिल्यापासून एखादा आजार असेल वा वयानुसार शारीरिक समस्या असतील अशा रुग्णांचा कोविड-१९मुळे मृत्यू झाला असला तरी तो कोविड-१९ मृत्यू वर्गात नोंद केला जात नाही. पण ज्यांना असे कोणतेही आजार नाही व वयाच्या प्रश्न नाही अशांचे मृत्यू कोविड-१९मुळे झाले असल्यास तो कोविड मृत्यू समजला जावा, असे स्पष्ट केले होते

पण गुजरातमध्ये आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वाकडे साफ दुर्लक्ष केलेले दिसत आहे.

एका सायन्स जर्नलने दावा केला आहे की २०२१मध्ये कोविड-१९मुळे मरण पावलेल्यांची संख्या ही २०१८-१९च्या तुलनेत २३० टक्के अधिक आहे.

द वायर सायन्सनेही या संदर्भातील एक वृत्त देताना एखाद्या रुग्णाला कोविडचा संसर्ग झाला असेल तर त्याच्या मृत्यूचे कारण अन्य आजारामुळे झाले आहे हे सांगणे अशक्य असते. कारण अन्य आजार असलेल्या एखाद्याला कोविडचा संसर्ग झाल्यास त्याचा मूळ आजार बळावतो व त्यात रुग्णाचा मृत्यू होतो अशा घटना दिसून आल्या आहेत. पण भारतात असे निकष न पाळल्याने अनेक मृत्यू ‘कोविड-१९ मृत्यू’ म्हणून नोंद झाले नाहीत.

साथरोग तज्ज्ञ प्रभात झा यांनी द वायरला एका मुलाखतीत सांगितले होते की, भारतातील कोविड-१९मुळे झालेल्या मृत्यूंच्या आकड्यावर जागतिक आरोग्य संघटनेचा विश्वास नाही. कारण भारताने अन्य देशांच्या तुलनेत कोविड मृत्यूची नोंद कमी केलेली आहे.

६ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास अहवालानुसार भारतात कोविड-१९मुळे मृत झालेल्यांची आकडेवारी सहापट अधिक असू शकते.

COMMENTS