दिल्लीत गोंधळ राज्यातही गोंधळ…

दिल्लीत गोंधळ राज्यातही गोंधळ…

सीरम आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेली लस ही किती परिणामकारक आहे आणि त्याचा बदलत्या जनुकीय विषाणूच्या लक्षणावर किती फरक पडेल याबाबत तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.

कोरोनावरील लस ही दुसऱ्या टप्प्यातच असतांनाच त्याला मान्यता दिली असून ती घेणे सर्वांसाठी घातक आहे. मी भाजपची लस घेणार नाही अशा संमिश्र विधानांनी कोरोनावरील लस येण्याआधीच वादात सापडली आहे. एकीकडे प्रचंड घाई करून केंद्र सरकार लस आणण्याची तयारी करत असतानाच त्याला विविध राज्यातून विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीला अटकाव करण्यासाठी सध्या जगभरात विविध औषध कंपन्या लस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लशीना विविध देशात आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारतात भारत बायोटेक आणि सिरम यांनी उत्पादित केलेल्या लसीना तशी मान्यता नव वर्षांच्या पहिल्या दिवशी देण्यात आली. त्यात भारत बायोटेक ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची लस असून सीरमची लस ही ऑक्सफर्डच्या मदतीने आणि तिथेच संशोधित करून भारतात आणण्यात आली आहे. पुणेस्थित सीरम कंपनीत केवळ या लसीचे बॉटलिंग होणार आहे. त्याबाबतचे कोणतेही संशोधन येथे झालेले नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

या दोन्ही लसींना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने आपत्कालीन वापरासाठी जरी मान्यता दिली असली तरी या दोन्ही लसीचे चाचणी अहवाल हे केवळ तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष वर आधारित आहेत. लस आणण्यासाठी जगभरात जी घाई सुरू आहे त्याला भारत ही अपवाद ठरलेला नाही. कारण कोविड 19 हा विषाणू त्याचे जनुकीय बदल सातत्याने करत आहे. परिणामी लक्षणे आणि त्यापासून असलेला धोका याचा अजूनही अभ्यास सुरू आहे. अलीकडेच ब्रिटनमधून आलेला नवीन विषाणू हा ७० टक्के वेगाने पसरत आहे. आणि त्यापासून येणारी लक्षणे वेगळी आहेत.

एका पाहणी अहवालानुसार हा विषाणू २५ ते ३० हजार वेळा आपल्यात जनुकीय बदल करू शकतो. याबाबत तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत १२,११५ वेळा या विषाणूने जनुकीय बदल केले आहेत. तर केवळ २०० बदलापर्यंत शास्त्रज्ञांनी संशोधन केल्याचे समजते.

सीरम आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेली लस ही किती परिणामकारक आहे आणि त्याचा बदलत्या जनुकीय विषाणूच्या लक्षणावर किती फरक पडेल याबाबत तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी जरी १०० टक्के ही लस परिणामकारक ठरेल असा दावा केला असला तरी त्याचो खात्री कोणालाच देता येणार नाही. त्यामुळे घाईघाईने लस आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्या गोंधळाचे चित्र नवी दिल्लीत दिसत आहे.

इकडे विविध राज्यातही लस रंगीत तालीम घेण्यात आली. सर्वत्र उत्साह असला तरी लोकांचा यानिमित्त असलेला बेफिकीरीपणा हा उलटण्याची चिन्हे आहेत. लस आली आता कोरोना संपला या अविर्भावात असलेल्या जनतेला खरे तर लस हे औषध नाही तर ती एक क्रिया आहे, त्यामुळे त्या विषाणूला अटकाव करण्याची क्षमता मानवी शरीरात येऊ शकते हे सांगणे गरजेचे आहे. विषाणू हा कधी नष्ट होत नाही तर त्याचा प्रभाव हा कालांतराने क्षीण होतो हे जनतेला सांगणे गरजेचे असताना केवळ लस आली याच आनंदात सर्वजण बुडाले आहेत.
दुसरीकडे त्याला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न विविध राज्यात करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तर भाजपने ही लस आणली असून ती मी घेणार नाही असे जाहीर करून वादाला तोंड फोडले आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी दुसऱ्या चाचणीत मान्यता देऊन केंद्र सरकारने घाई केली आहे अशी टीका करून त्याच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ही लस घेतल्यास हानिकारक ठरू शकते असे सांगून काँग्रेसच्या नेत्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

ज्या राज्यात निवडणुक होत आहे त्या पैकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथे भाजप लसीच्या माध्यमातून मतांची बेगमी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी अशी कोणतेही मोहीम अथवा लसीकरण कार्यक्रम राज्यात होऊ नये यासाठी ममता दीदी सक्रिय झाल्या आहेत. तिकडे तामिळनाडूमध्येही एआयडीएमकेने सुद्धा हीच भूमिका घेतली असल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. पहिल्या टप्यात देशात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असली तरी त्याचा प्रत्यक्ष काय परिणाम होतो यावरच सर्वसामान्य नागरिकांना लस देण्याच्या मार्ग अवलंबून आहे.
थोडक्यात घाईघाईने आणलेल्या लसीमुळे दिल्लीतही गोंधळ आणि राज्यातही गोंधळ अशी स्थिती झाली आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS