नवी दिल्लीः गेल्या १० वर्षभरात जगभरात २७८ पत्रकारांच्या हत्या झाल्या त्या पैकी ८१ टक्के हत्यांचे मुख्य सूत्रधार अद्याप सापडले नसल्याची धक्कादायक माहिती कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट (सीपीजे)ने आपल्या वार्षिक ग्लोबल इम्प्युनिटी इंडेक्स अहवालात प्रसिद्ध केली आहे.
सीपीजे ही स्वतंत्र नॉन प्रॉफिट संस्था असून ती जगभरात निर्भय, नीडर पत्रकारितेचा प्रसार करत असते. या संस्थेने मिळवलेल्या माहितीनुसार १ सप्टेंबर २०११ ते ३१ ऑगस्ट २०२१ या १० वर्षांच्या काळात जगभरात २७८ पत्रकारांच्या हत्या झाल्या. त्या पैकी २२६ पत्रकारांची हत्या करणारे मुख्य सूत्रधार अद्याप पोलिस यंत्रणांना सापडलेले नाहीत वा या हत्यांचा तपासच पूर्ण झालेला नाही. हे सर्व पत्रकार भ्रष्टाचारी यंत्रणा, संघटित गुन्हेगारी, दहशतवादी संघटना व सरकार यांच्या हितसंबंधांचे बळी ठरलेले आहेत.
सीपीजे पत्रकारांच्या हत्यांसंदर्भातील जागतिक आकडेवारी प्रसिद्ध केली असून सर्वाधिक पत्रकारांच्या हत्या सोमालिया येथे झाल्या असून गेली ७ वर्ष तेथे अशी प्रकरणे वाढीस लागली आहेत. त्या नंतर सीरिया, इराक, द. सुदान येथे पत्रकारांना ठार मारण्याचे प्रकार अधिक आहेत. या यादीत भारताचा क्रमांक १२ वा असून भारतातील २० पत्रकारांच्या हत्यांसंदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत. भारताच्या खालोखाल अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेश या देशांची नावे असून येथील परिस्थितीही चिंताजनक असल्याचे सीपीजेचे म्हणणे आहे.
सीपीजे नुसार अफगाणिस्तानमधील पत्रकारितेची अवस्था अत्यंत चिंताजनक असून गेल्या १० वर्षांत तेथे १७ पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. त्यात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे.
मूळ बातमी
COMMENTS