मुंबईः मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजाचे योगदान असून महाराष्ट्रामध्ये विशेषतः
मुंबईः मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजाचे योगदान असून महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई आणि ठाण्यामधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जाते ते आर्थिक राजधानी म्हटले जाणार नाही, असे वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी अंधेरी येथील एका कार्यक्रमात केले.
कोश्यारी यांच्या हस्ते अंधेरी (प) येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी राजस्थानी-गुजराती समाजाचे कौतुक करत त्यांनी मराठी समाजावर अप्रत्यक्ष टीका केली.
महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांच्या भाषणावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. पण या पैकी एकाही नेत्याने राज्यपालांच्या टिप्पण्णीवर भाष्य केले नाही.
कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हीडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व थरातल्या मराठी भाषिकांकडून टीका झाली.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, असे ट्विट सचिन सावंत यांनी केले. त्यांनी कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हीडिओही आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे.
राजस्थानी मारवाडी समाजाचे कौतुक
आपल्या भाषणात कोश्यारी यांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचेही कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे ते म्हणाले.
भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे कोश्यारी म्हणाले.
COMMENTS