अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील एक आरोपी व सध्या तुरुंगात असलेले विक्रम भावे यांना मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रु.च्या जातमुचलक्यावर शुक्रवारी जामीन दिला आहे. भावे पुण्यातल्या येरवडा कारागृहात होते. दाभोलकरांची हत्या करणार्या मारेकर्याला भावे यांनी मदत केल्याचा व हत्येच्या ठिकाणाची टेहळणी भावे यांनी केली होती असा आरोप सीबीआयने लावला होता.

विक्रम भावे
जामीन देताना न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीश पितळे यांनी भावे यांना ट्रायल कोर्टाचे ज्युरिडिक्शन सोडून जाऊ नये अशीही अट घातली आहे. त्याच बरोबर भावे यांनी या आठवड्यात दररोज पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक असून नंतर पुढील दोन महिने आठवड्यातून दोन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा खटला संपेपर्यंत भावे यांनी आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे, असेही न्यायालयाने जामीन देताना स्पष्ट केले आहे.
आपल्याला जामीन मिळावा म्हणून भावेंने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता पण तो फेटाळून लावण्यात आला होता. उच्च न्यायालयाने मात्र भावेंना जामीन मिळू नये असा सीबीआयचा आग्रह फेटाळून लावला.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची पुण्यात ओंकारेश्वर देवळानजीक सकाळी हत्या झाली होती. सीबीआयच्या मते ही हत्या सचिन अंदुरे व शरद कळस्कर यांनी केली आहे.
COMMENTS