डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोप निश्चित

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोप निश्चित

अंदश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने पाच जणांवर आरोप निश्चित केले आहेत.

एक न संपणारा प्रवास
विज्ञान दिनानिमित्ताने विवेकाचा जागर करू या!
डॉ. दाभोलकर हत्या : पिस्तुल सापडले

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने पाच जणांवर आरोप निश्चित केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.

२० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील ओंकारेश्वराजवळ शिंदे पुलावर दोन हल्लेखोरांनी सकाळी चालण्यासाठी गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर ८ वर्षानंतर आज आरोप निश्चित करण्यात आले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी क्रमांक १, २, ३ आणि ५ असलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्या विरुद्ध हत्येचा कट रचल्याचा गुन्हा आणि ‘युएपीए’च्या कलम १६ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. आरोपी क्रमांक ४ असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

तावडे, अंदुरे आणि कळसकर न्यायालयीन कोठडीत आहेत. तर पुनाळेकर आणि भावे जामिनावर बाहेर आहेत.

आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीसाठी हजर होते. आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे न्यायालयात उपस्थित होते. ‘सीबीआय’कडून विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षाकडून वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. यावेळी कोरोनाचे कारण सांगत आरोपींनी वकील आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस मुदत देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने नकार देत आरोप निश्चिती झाली असून गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगून आपण निर्दोष असल्याचे सांगितले. यावर ३० सप्टेंबरला सरकारी वकील आणि बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाणार आहेत.

बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सीबीआयने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्लेखोरांच्या दाव्यातील विरोधाभासाचा संदर्भ दिला. सीबीआयने २०१६ मध्ये तावडे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तर सनातन संस्थेचे फरार असलेले सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दाभोलकरांवर हल्ला करणारे आरोपी होते, असे आरोप केले होते. २०१८ मध्ये सीबीआयने अंदुरे आणि कळसरकर यांना अटक केली आणि हल्लेखोर असल्याचे सांगितले. त्यानंतर सीबीआयने अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या तिघांना अटक केली होती. मात्र त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले नाही. २०१७ मध्ये बंगळुरूच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी कळसकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आले

या हत्येचा तपास अगोदर पुणे पोलीस करत होते. नंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. जून २०१६ मध्ये सीबीआयने सनातचे सदस्य आणि शल्यचिकित्सक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात आरोपपत्र सप्टेंबर २०१६ मध्ये दाखल करण्यात आले. तावडे हेच या हत्येच्या कटातील सूत्रधार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २०१८ मध्ये सीबीआयने सनातन संस्थेचे आणखी सदस्य सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना अटक केली. या दोघांविरोधात पुरवणी आरोपपत्र फेब्रुवारी २०१९ मध्ये दाखल करण्यात आले.  या दोघांनी गोळ्या झाडल्याचं सीबीआयणे आपल्या आरोपपत्रात सांगितले होते. त्यानंतर मे २०१९ मध्ये सीबीआयने मुंबईतील वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना अटक केली. हे दोघंही सनातन या संस्थेशी जोडलेले आहेत. त्यांच्याविरोधात नोव्हेंबर २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. पुनाळेकर आणि भावे यांनी पुरावे नष्ट करण्यात भूमिका बजावली असा आरोप सीबीआयने केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0