दविंदर सिंहचे प्रकरण एनआयए कसे हाताळेल?

दविंदर सिंहचे प्रकरण एनआयए कसे हाताळेल?

गेल्या शनिवारी दोन दहशतवाद्यांसह ताब्यात घेतलेले जम्मू व काश्मीरचे पोलिस उपायुक्त दविंदर सिंह प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अमित शहा यांच्या गृहखात्याने तातडीने सोपवले. त्यांच्या अशा निर्णयाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेव्यवस्थेविषयी अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

गेल्या शनिवारी दविंदर सिंह याला हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सैद नवीद मुश्ताक व आणखी एका दहशतवाद्यासह श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर रविवारी जम्मू व काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दविंदर सिंह याच्या घरातून तीन एके-४७ रायफल व तीन ग्रेनेड ताब्यात घेतल्याचे सांगितले.

या अटकेवर विजय कुमार यांनी एक बाब प्रसारमाध्यमांना सांगितली की, दविंदर सिंहला एक दहशतवादी म्हणून वागणूक दिली जाईल व त्या पद्धतीने त्याची चौकशी केली जाईल.

दविंदर सिंह २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेत होता तसेच तो ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेत होता, असे विजय कुमार यांनी सांगितले. दविंदर सिंहला अटक केल्यानंतर २४ तासात हे प्रकरण जम्मू व काश्मीर पोलिसांकडून काढून घेऊन ते राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले.

गेल्या आठवड्यात गुरुवारी भारतीय परराष्ट्र खात्याच्या मदतीने काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी अमेरिकेचे भारतातील राजदूत व काही परदेशी सदस्यांचे शिष्टमंडळ काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात दविंदर सिंह सामील झाला होता.

जम्मू व काश्मीर पोलिसांनी दविंदर सिंह याला ताब्यात घेतले तेव्हा दविंदर सिंह हा श्रीनगरमधील शिवपोरा येथे एका घरामध्ये दोन दहशतवाद्यांसोबत होता. दविंदर सिंहकडे जम्मू व काश्मीरमध्ये तीन मालमत्ता आहेत आणि जम्मू व पोलिसांमधील काही सूत्रांनुसार दविंदर सिंह याच्या अशा मालमत्तांबद्दलची माहिती आयबीला गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात देण्यात आली होती. पण त्यावेळी या खात्याने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

२००१च्या संसदेवरील हल्ला प्रकरणात दविंदर सिंह याची चौकशी केली गेली नव्हती. पण या प्रकरणातील प्रमुख आरोपी अफजल गुरूने २००४मध्ये आपला वकील सुशील कुमार याला एक पत्र लिहिले होते. या पत्रात अफजल गुरुने त्यावेळी जम्मू-काश्मीर पोलिस दलातील स्पेशल ऑपरेशनमध्ये काम करत असलेल्या दविंदर सिंह याने संसदेवर हल्ला करणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला-मोहम्मदला- दिल्लीत जाण्यासाठी गाडी व त्याला एक भाड्याने फ्लॅट द्यावा असे आपल्याला सांगितले होते अशी माहिती या पत्रात दिली होती.

‘एके दिवशी बडगामचे एसएसपी अशाक हुसैन यांचा मेहुणा अल्ताफने मला दविंदर सिंहच्या घरी नेले. त्यावेळी दविंदर हा जिल्हा पोलिस प्रमुख होता. दविंदर सिंह यांनी मला एक काम करण्यास सांगितले. त्यांनी एका व्यक्तीला-मोहम्मदला- दिल्लीत घेऊन जाणे व त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे काम माझ्यावर सोपवले. मला दिल्लीची माहिती असल्याने मी दविंदर सिंहला नकार देऊ शकलो नाही. पण ज्या मोहम्मदशी माझी ओळख करून देण्यात आली तो काश्मीरी नव्हता. तेव्हाच मला शंका आली होती कारण त्याला काश्मीरी भाषा बोलता येत नव्हती. पण मी मोहम्मदला दिल्लीला घेऊन गेलो. एके दिवशी त्याने कार विकत घ्यायची आहे असे म्हटले. मग मी त्याला करोल बागेत घेऊन गेलो व तेथे कार विकत घेतली. आमच्या दिल्लीच्या मुक्कामात मोहम्मद अनेक लोकांना भेटत होता. या दरम्यान मला व मोहम्मदला दविंदर सिंहकडून अनेक फोन कॉल येत होते.’ 

एवढेच नव्हे तर अफजल गुरुने आणखी एक पोलिस अधिकारी शैंटी सिंह याचेही नाव घेतले आहे. या शैंटी सिंह व दविंदर सिंहने आपल्याला हुमहमा येथील एसटीएफ शिबिरात जबर मारहाण केली होती, असल्याचे नमूद केले होते.

अफजल गुरुने आपल्या पत्रात अल्ताफ हुसेन या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. हा अल्ताफ बडगामचे एसएसपी अशाक हुसैन (बुखारी) यांचा मेहुणा होता. अल्ताफ यांची सुटका व्हावी म्हणून अशाक हुसैनने दविंदरसिंहशी चर्चाही केली होती.

हा सगळा घटनाक्रम माहिती असूनही दविंदर सिंहची कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. अफजल गुरुने दिलेल्या माहिती नंतरही अंतर्गत सुरक्षिततेबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. आयबीनेही याची चौकशी केली नाही.

मी जेव्हा या विषयाची खोलात जाऊन माहिती घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी मला दोन गोष्टी सांगितल्या. पहिली, दविंदर सिंह हा जोपर्यंत डोईजड होत नाही तो पर्यंत तो आमच्या कामाचा होता. तो आम्हा विरोधात कसा गेला याची चौकशी केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांची थडगी उकरण्यास सुरुवात केल्यानंतर नको असलेले सापळेही बाहेर येतात.

भाजपचे एक ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी वाजपेयी सरकार सत्तेत असताना, गुप्तहेरांना दिल्या जात असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचे ऑडिट केले जावे व त्यावर संसदेचे लक्ष असावे, अशी सूचना केली होती. पण ही सूचना पंतप्रधान वाजपेयींनी धुडकावून लावली होती.

आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने दविंदर सिंहचे प्रकरण हाती घेतल्याने ही समांतर सत्ता आतील घटकांचे संरक्षण करेल का हा प्रश्न आहे. दविंदर सिंहला दहशतवाद्यासारखे वागवा असे जम्मू व काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे. पण राष्ट्रीय तपास यंत्रणा दविंदर सिंहला कशी वागणूक देईल हे सांगता येणार नाहीत. कारण दविंदर सिंहच्या संदर्भातले प्राथमिक पुरावे धक्कादायक आहेत. जर राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू व काश्मीर पोलिसांच्या भूमिकेला छेदणारी भूमिका घेतली तर या यंत्रणेवर एक बट्‌टा लागणार आहे.

स्वाती चतुर्वेदी या दिल्लीस्थित पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS